सारागढीच्या युद्धावर आधारित अक्षय कुमारचा ‘केसरी’ चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होत आहे. अविश्वसनीय अशा शौर्यगाथेची कथा ‘केसरी’च्या रुपात प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि दहा हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धाची कथा या चित्रपटात आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षयनं त्याच्या मनातील खंत नुकतीच बोलून दाखवली.

‘भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचं वर्णन केलं जातं. गुगलनंही या युद्धाला धाडसी युद्धाचं नाव दिलं आहे. मात्र आजच्या पीढीला या युद्धाबद्दल माहिती नाही. १० हजार अफगाण सैनिकांसोबत २१ सैनिकांनी लढा दिला. है २१ सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत लढले त्यांनी ९०० अफगाण सैनिकांना कंठस्नान घातलं. ही कथा आजच्या मुलांना ठावूकही नाही .ब्रिटनमध्येदेखील सारागढी डे साजरा केला जातो पण आपल्या इतिहासात या युद्धाचं साधं वर्णनंही नाही. ‘ अशी खंत अक्षयनं बोलून दाखवली.

या युद्धाची कलाविश्वानं देखील दखल घेतली नाही याचं सर्वाधिक वाईट वाटतं असंही अक्षय म्हणाला. या युद्धाचा समावेश भविष्यात इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात नक्की व्हायला हवा अशी इच्छाही त्यानं व्यक्त केली.