अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाही, मक्तेदारी, गटबाजीवरून वाद सुरू झाला. सुशांतसोबत ‘काइ पो चे’ या चित्रपटात भूमिका साकारलेला अभिनेता अमित साध याने नुकताच धक्कादायक खुलासा केला आहे. “याला काम देऊ नका असं म्हणत टीव्हीने माझ्यावर बंदी आणली होती”, असं त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे.

अमितने ‘क्यू होता है प्यार’ या लोकप्रिय मालिकेतून करिअरची सुरुवात केली. मात्र टीव्हीने त्याच्यावर बंदी आणल्यामुळे तो बॉलिवूडकडे वळला. बेधडकपणे बोलल्यामुळे टीव्हीवरच्या काही लोकांना त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याची तक्रार त्याने केली. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी टेलिव्हिजन सोडलं नव्हतं. उलट टीव्हीने मला बॅन केलं होतं. त्यांच्यात एकमेकांमध्ये चर्चा व्हायची की, याला काम देऊ नका. त्यामुळे मीसुद्धा कोणाची विनवणी केली नाही. काम मिळत नसेल तर मी चित्रपटांकडे वळण्याचा निर्णय पक्का केला.”

विसाव्या वर्षी अमितने छोट्या पडद्यावरील गटबाजीविरोधात लढा दिला. एका प्रसिद्ध निर्मात्याने त्याला फोन करून समजावण्याचा प्रयत्न केला तेव्हासुद्धा अमित त्याच्या मूल्यांवर ठाम राहिला. “सर चुकीचं करत असाल, तर मी नक्की लढेन”, असं उत्तर त्याने दिलं. सुदैवाने त्याच्या कामाची दखल घेणारे काही लोक त्याला भेटले आणि पुढे त्याला चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

अमितने २०१० मध्ये राम गोपाल वर्माच्या ‘फूंक २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘काई पो चे’, ‘गुड्डू रंगीला’, ‘सुलतान’, ‘सरकार ३’, ‘गोल्ड’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दमदार भूमिका साकारल्या. नुकतीच त्याची वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. ‘ब्रीद : इन्टू द शॅडोज’ या वेब सीरिजमध्ये त्याने अभिषेक बच्चन व नित्या मेनन यांच्यासोबत काम केलंय.