आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. colon infection मुळे त्याला मंगळवारी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र बुधवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला. जबर इच्छाशक्तीच्या जोरावर कॅन्सरवर मात केल्यानंतर तो भारतात परतला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये इरफान खान उपचारानंतर पुन्हा भारतात परतला होता. दुपारी ३ वाजता इरफानवर वर्सोवा भागातील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

यादरम्यान इरफानच्या परिवारातील काही लोकं व निवडक मित्र हजर होते. Bombay Times ने दिलेल्या बातमीनुसार, अखेरचा श्वास घेण्याआधी इरफानने आई मला घ्यायला आली आहे हे शब्द उच्चारले. इरफानची आई सय्यदा बेगम यांचंही ४ दिवसांपूर्वी राजस्थानमधील जयपूर भागात निधन झालं होतं. मात्र सध्याच्या लॉकडाउन काळात इरफान आपल्या आईला अखेरचा निरोप द्यायला जाऊ शकला नव्हता. इरफानवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु होते.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.