रेश्मा राईकवार

आनंदी गोपाळ

एखादी व्यक्ती थोरपणा घेऊन जन्माला येत नाही. त्यांना हा थोरपणा त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळतो. सामान्यांतून असामान्यत्वाकडे नेणारा त्यांचा माणूस म्हणून झालेला प्रवास हा थोर माणसांच्या गोष्टीत महत्त्वाचा असतो. पण अनेकदा आपल्याकडे चरित्रपटातूनच नाही तर अगदी मसाला चित्रपटांमधूनही प्रेक्षकांसमोर दिसणारा थोर नायक किंवा नायिका ही प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट अशाच स्वरूपातून दाखवली जाते. त्यांची कथाही त्याच दृष्टिकोनातून लिहिली जात असल्याने त्यानंतर ती कथा सुंदर दिसावी म्हणून दिलेली दिग्दर्शन, अभिनय, संगीत सगळ्याची जोडही भव्यदिव्य असते. या पार्श्वभूमीवर समीर विद्वांस दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक यांची पटकथा असलेला ‘आनंदी गोपाळ’ हा सुखद धक्का आहे..

परदेशात शिक्षण घेऊन आलेली भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई गोपाळ जोशी यांची जगभरात ओळख आहे, मात्र हा पहिलेपणाचा मान त्यांच्याकडे सहजपणे आला नाही. अतोनात कष्ट, संयमातून उभे राहिलेले हे स्वप्नवत सत्य प्रत्यक्षात येण्यासाठी आनंदीबाई आणि त्यांचे पती गोपाळराव या दोन्ही व्यक्तींचे सर्वस्व पणाला लागले. हा ऐतिहासिक सुवर्णक्षण उभा करण्यासाठी या दोघांच्या मनात जन्माला आलेल्या या स्वप्नाचा क्षण, त्याची रुजवात आणि स्वप्नपूर्तीसाठी झपाटून के लेले प्रयत्न, यातून या दोघांच्या नात्यात आलेले ताणतणाव आणि तरीही संघर्षांतून अधिक घट्ट होत गेलेले त्यांचे नाते अशा खूप छोटय़ा-छोटय़ा गोष्टींनी ‘आनंदी गोपाळ’ची कथा आपल्यासमोर उलगडत जाते. साध्यासुध्या ब्राह्मण कुटुंबातील यमुना वयाच्या नवव्या वर्षी तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठय़ा गोपाळरावांशी विवाह होऊन आनंदी म्हणून नव्या घरात येते. तिच्या विवाहाच्या वेळी गोपाळरावांनी एकच अट ठेवलेली असते ती म्हणजे शिक्षणाची. खेळकर वयात सातत्याने नवऱ्याकडून सुरू असलेला शिक्षणाचा धोशा न समजणारी आनंदी, चौदाव्या वर्षी मुलाला जन्म देणारी आणि त्यानंतर डॉक्टर बनायचेच हा ध्यास घेऊन पुढे जाणारी आनंदी असे अनेक टप्पे या चित्रपटात येतात. या प्रत्येक टप्प्यावर ती फक्त आनंदीची गोष्ट म्हणून समोर न येता गोपाळरावांनी त्यांना डॉक्टर बनवायचा घेतलेला ध्यास, त्यांच्या तथाकथित विक्षिप्त वागण्यामागची कारणे, त्यांचे पुरोगामी विचार, आनंदीला शिक्षण देण्याच्या हट्टाचे कारण आणि आपल्या तत्त्वांसाठी समाजाला सडेतोड उत्तरे देण्याची त्यांची तयारी दिसते.

दिग्दर्शक म्हणून अतिशय वास्तव पद्धतीने कथा मांडण्याची समीर विद्वांस यांची शैली विशेष महत्त्वाची वाटते. चरित्रात्मक गोष्टी मांडतानाचा एक वेगळा दृष्टिकोन या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात, ही कथाच मुळी १२५ वर्षांपूर्वीची असल्याने कथेनुसार काळ उभा करणे, त्यावेळची भाषा, वेशभूषा, देहबोली असे अनेक तपशील येतात. मात्र मुळात या कथेचा जो गाभा आहे त्याला महत्त्व देत बाकीच्या गोष्टी गरजेनुसार केल्या गेल्या आहेत. भाषाही त्या काळातील न वापरता नेहमीच्या पद्धतीने ठेवली आहे. काळाचा तपशील मांडताना तो अधिक उठावदार करण्यासाठी वेगळा टोन वापरता आला असता, मात्र या सगळ्याच गोष्टींचा फाफटपसारा दिग्दर्शकाने टाळलेला दिसतो. चित्रपट पाहताना त्याची उणीवही जाणवत नाही. चित्रपटाची कथा, मोजकेच पण योग्य संवाद आणि त्याला कलाकारांच्या उत्तम अभिनयाची जोड यामुळे ‘आनंदी गोपाळ’ अपेक्षित परिणाम साधतो. चौकटीतील भूमिकांपलीकडे जात ललितने गोपाळरावांची केलेली भूमिका त्याची सर्वोत्तम म्हणता येईल. इतक्या अप्रतिम पद्धतीने त्याने गोपाळरावांच्या स्वभावातील प्रत्येक गोष्ट उभी केली आहे. उत्तरार्धात तर अनेक प्रसंगात केवळ नजरेतून व्यक्त झालेले गोपाळराव चांगलेच लक्षात राहतात. त्याला तितकीच तगडी साथ आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंदने दिली आहे. आनंदीबाईंचे लहान वय, त्या लहान वयातही असलेली प्रगल्भता आणि नवऱ्याला समजून घेता घेता आनंदीबाईंमध्ये होत गेलेले बदल तिने खूप सहज आणि प्रभावीपणे साकारले आहेत. खरे तर तिच्यासाठी ही खूप मोठी भूमिका होती. मात्र, तिने ती उत्तम पद्धतीने केली आहे. या दोघांबरोबरच गीतांजली कुलकर्णीनी साकारलेल्या विमलताईही दाद देण्यासारख्याच आहेत. त्या काळातही आपल्या विचारांवर, भूमिकांवर मग त्या प्रतिगामी असल्या तरीही ठाम राहणाऱ्या स्त्रिया, आजूबाजूचा कर्मठ विचारांचा समाज या गोष्टी आहे त्या स्थितीत दिग्दर्शकाने मांडल्या आहेत. त्यामुळे एकूणच त्यावेळचा समाज आणि त्यातून उभे राहिलेले डॉक्टर आनंदीबाई जोशी नावाचे कर्तृत्ववान सोनेरी पर्व ही अभिमानाने अनुभवण्याची गोष्ट ठरते.

दिग्दर्शक – समीर विद्वांस

कलाकार – ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, गीतांजली कुलकर्णी, योगेश सोमण, क्षिती जोग, अंकिता गोस्वामी, अथर्व फडणीस.