26 January 2021

News Flash

AK vs AK review : शेवटाने घात केला..

ढोबळमानाने हा एक दिग्दर्शक आणि लोकप्रिय अभिनेता यांच्यातील संघर्ष आहे.

रेश्मा राईकवार

एक उत्तम आणि वेगळे चित्रपट करणारा दिग्दर्शक आणि एक तद्दन हिंदी चित्रपटांच्या जोरावर लोकप्रिय झालेला यशस्वी अभिनेता यांच्यातील संघर्ष कसा असू शकतो? याच संघर्षांवर चित्रपटात घडणारा चित्रपट दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवने यांनी ‘एके वर्सेस एके ’मध्ये रंगवला आहे. आपल्याकडे कलाकार लोकप्रिय झाला की तो ‘स्टार’ असतो. त्याचे जगणे, वागणे-बोलणे सगळेच वलयांकित होऊन जाते, मात्र हे वलय बाजूला के ले तर तो इतरांप्रमाणेच सर्वसामान्य माणूस आहे हे आपण विसरतो. दिग्दर्शकाच्या बाबतीत तीच गोष्ट आणखी थोडय़ा वेगळेपणाने पाहिली जाते. तो कितीही यशस्वी झाला तरी त्याला कलाकाराएवढे वलय प्राप्त होत नाही. मग यशस्वी चित्रपटामागे कलाकार असतो की दिग्दर्शक हाही प्रश्न सतावत राहतो, त्याला बगल देत ते टीमने मिळून के लेले काम असते असे उत्तर दोघांकडूनही दिले जाते. मात्र मनात श्रेयाची लढाई सुरू नसतेच असे नाही.. हा सगळा वास्तव गोंधळ काल्पनिक कथेतून अभिनव पद्धतीने मांडणारा चित्रपट म्हणून ‘एके  वर्सेस एके ’चा उल्लेख करावा लागेल.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात रंगलेला तू तू मी मीचा हा खेळ पहायला मिळतो. या चित्रपटाची कथा सांगण्यात काही हशील नाही. ढोबळमानाने हा एक दिग्दर्शक आणि लोकप्रिय अभिनेता यांच्यातील संघर्ष आहे. इथे अनिल कपूर आणि अनुराग कश्यप या दोन्ही व्यक्तिरेखा त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातले संदर्भ घेऊन काल्पनिक कथेतील पात्रं म्हणून अवतरतात आणि हीच या चित्रपटाची गंमत आहे. म्हणजे पडद्यावर जे दिसतं आहे ते खरं आहे की चित्रपटात सुरू असलेल्या चित्रपटाच्या कथानकाचा भाग आहे, हे द्वंद्व चित्रपटभर आपल्या मनात सुरू राहतं. एका जाहीर मुलाखतीदरम्यान या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडते. आणि लोकप्रिय अभिनेत्याचा तथाकथित माज उतरवण्यासाठी दिग्दर्शक एक योजना बनवतो. त्याच्या योजनेनुसार पडद्यावर आणखी एका चित्रपटाचा खेळ रंगायला लागतो. कलाकाराचा अभिनय कु ठे संपतो आणि त्याचे सामान्यपणे वागणे कधी सुरू होते, याची कल्पना करणे कठीण असते. त्याचाच फायदा घेत दिग्दर्शकाने उभा के लेला पोलीस चौकीतला प्रसंग उत्तम वठला आहे. असे अनेक प्रसंग या चित्रपटात काल्पनिक असले तरी ते वास्तवाची जाणीव करून देतात. एखादा कलाकार अडचणीत सापडतो, तो त्यातून बाहेर पडण्यासाठी लोकांची मदत घेण्यासाठी धडपडत असतो मात्र लोक त्याला तेव्हाही कलाकार म्हणूनच पाहतात. त्याला सेल्फीसाठी विचारणा के ली जाते, चित्रपटातील लोकप्रिय संवाद म्हणून दाखव-नृत्य करून दाखव याच मागण्या त्याच्याकडून के ल्या जातात. उलट त्याच गर्दीत दिग्दर्शकाचे नावही लोकांना नीटसे आठवत नाही. तो वेगळा असला तरी तो गर्दीचाच भाग असतो, अशा अनेक वास्तव गोष्टींवर दिग्दर्शकाने सहज बोट ठेवले आहे. खऱ्या-खोटय़ाचा हा खेळ या दोघांमध्ये घडवत प्रेक्षकांना कथानकात गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला असला तरी शेवटाकडे येऊन मात्र चित्रपट निराशा करतो.

अनिल कपूर आणि अनुराग कश्यप ही त्या अर्थाने सिनेमाच्या दोन वेगवेगळ्या प्रवाहात यशस्वी ठरलेली माणसे आहेत. आणि चित्रपटातही ते दोघे त्याच पद्धतीने समोर येतात त्यामुळे एरव्ही चित्रपटात दिसतील त्यापेक्षाही ते यात अधिक प्रभावीपणे दिसतात. इथे अनिल कपूर यांच्या घरातील माणसे, त्यांचा मुलगा, त्यांचा भाऊ, त्यांचा वाहनचालक यांच्याशी त्यांचा असलेला संवाद या सगळ्या गोष्टी उत्तमपणे चित्रित झाल्या आहेत. अनुराग कश्यप यांचा अभिनय याआधीही प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांतून पाहिलेला आहे, इथेही स्वत:चीच भूमिका त्यांनी उत्तम वठवली आहे. अनिल कपूर नेहमीच्या झक्कास पद्धतीने वावरले आहेत. मात्र शेवटाकडे येताना चित्रपट अधिक अतार्किक वाटतो. दीड तास पाहिलेला खेळ शेवटी कथेला जे वळण मिळते त्यात फसल्यासारखा वाटतो. उत्तम चित्रपट म्हणून याची गणना होणार नसली तरी एका अभिनव कल्पनेवर रंगवलेला हा ‘एके वर्सेस एके ’चा प्रयोग एकदा अनुभवण्यासारखा नक्कीच आहे.

एके  वर्सेस एके

दिग्दर्शक – विक्रमादित्य मोटवने

कलाकार – अनिल कपूर, अनुराग कश्यप.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 1:59 am

Web Title: anil kapoor and anurag kashyap starrer film ak vs ak review zws 70
Next Stories
1 नाटय़रंग : ‘तू म्हणशील तसं..’
2 धर्म परिवर्तनासाठी पतीकडून दबाव; अभिनेत्रीने पोलिसात केली तक्रार
3 बिग बॉसच्या घरात सलमानने केली साफसफाई, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Just Now!
X