‘कृष्णा चली लंडन’ या मालिकेत काम करणारे अनुपम श्याम यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोरेगावमधील लाइफलाइन रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अनुपम हे आजारी आहेत. त्यांच्याकडे पुढील उपचारासाठी पैसे नसल्यामुळे त्यांचा धाकटा भाऊ अनुराग श्याम ओझा यांनी आर्थिक मदत केली आहे. पण आता त्यांच्याकडे देखील उपचारासाठी फारसे पैसे नसल्याचे समोर आले आहे.

या संदर्भात अनुराग यांनी स्पॉटबॉयला मुलाखत दिली. ‘गेल्या सहा महिन्यांपासून अनुपम हे आजारी आहेत. त्यांच्या मूत्रपिंडाला संसर्ग झाल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून ते हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती. पण त्यांना डॉक्टरांनी वेळच्या वेळी डायलिसिस करण्यास सांगितले होते. डायलिसिसचा खर्च खूप असल्यामुळे त्यांनी आयुर्वेदीक उपचार घेण्याचे ठरवले. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नाही’ असे अनुराग म्हणाले.

‘आम्ही मालाड येथी रुग्णालयात पुन्हा त्यांचे डायलिसिस सुरु केले. पण त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. म्हणून मी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणले आहे. पण माझ्याकडे त्यांच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नाहीत. आम्हाला खरज मदतीची गरज आहे’ असे ते म्हणाले.

चाहत्यांना अनुपम श्याम यांच्याबद्दल माहिती मिळतचा त्यांनी सोनू सूद आणि आमिर खानकडे मदत मागितली आहे. एका यूजरने ट्विट करत ‘अभिनेते अनुपम श्याम हे आयसीयूमध्ये आहेत. त्यांना मदतीची गरज आहे’ असे म्हणत सोनू सूद आणि आमिर खानला टॅग केले आहे. त्यानंतर त्याने आणखी एक ट्विट करत ‘त्यांना गोरेगावमधील लाइफलाइन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे’ असे म्हटले आहे.