‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित असलेला ‘सुई धागा’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या वरुण आणि अनुष्का या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच या दोघांनी कोलकातामध्ये प्रमोशन केलं असून अनुष्काचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. त्यामुळे ही जोडी अनेक शहरांमध्ये फिरत असून चाहत्यांची भेट घेत आहे. यावेळी कोलकातामध्ये असताना अनुष्काला पाहून तिच्या एका चाहतीला चक्क रडू कोसळलं.

कोलकाता येथे ‘सुई धागा’चं प्रमोशन सुरु असताना अनेक चाहत्यांनी अनुष्काची भेट घेतली. यावेळी १९ वर्षीय मंजिष्था करमाकर ही मुलगीदेखील अनुष्काला भेटण्यासाठी आली होती. मात्र अनुष्काला पाहताच या मुलीला रडू कोसळलं. विशेष म्हणजे मंजिष्थाला रडताना पाहून अनुष्कालाही अश्रू अनावर झाले.

दरम्यान, रडणाऱ्या मंजिष्थाला पाहून अनुष्काने तिला जवळ घेत शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बराच वेळ तिने मंजिष्थासोबत गप्पाही मारल्या. सध्या अनुष्का आणि मंजिष्थाचा हाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अनुष्का आणि वरुणचा हा चित्रपट २८ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधीच या दोघांनीही सोशल मिडियावरून या चित्रपटाच्या प्रमोशन सुरुवात केली होती. त्यानंतर आता ही जोडी प्रत्यक्ष प्रमोशन करण्यास शहरांमध्ये फिरत आहेत.