लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होऊन सहा तासांहून अधिक काळ लोटला आहे. मागील सहा तासांमध्ये एकंदरित निकालाचा स्पष्ट अंदाज आला असला तरी अंतीम निकालासाठी आणखीन काही तास वाट पहावी लागणार आहे. असे असले तरी सकाळपासूनच वृत्तवाहिन्यांवर निवडणुकीच्या निकालांचे क्षणोक्षणांचे वार्तांकन सुरु आहे. अनेक राजकीय विश्लेषक, तज्ज्ञ आपली मते मांडताना दिसत आहेत. अशाच एका चर्चेदरम्यान उत्साहाच्या भरात एका वृत्तनिवेदकाने घाईघाईत भाजपाचे उमेदवार सनी देओल यांचा उल्लेख सनी लिओनी असा केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीनेही ट्विटवरुन यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे.

झालं असं की ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीवर एक वृत्तनिवेदक देशातील प्रमुख उमेदावार कितीने आघाडीवर आहेत यासंदर्भात माहिती देत होता. तितक्यात वाहिनीचे प्रमुख असणारे अर्णब गोस्वामी यांनी त्या निवेदकाला मध्येच थांबवत ‘सनी लिओनी… सनी देओल हे ७ हजार ५०० मतांनी आघाडीवर आहेत’ असे ओरडले. हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला.

अर्णब यांच्याकडून झालेल्या या चुकीनंतर अनेकांनी ट्विटवरुन हा व्हिडिओ शेअर केला. यावर नंतर सनीनेही ट्विटवरुन भन्नाट उत्तर दिले. सनीने केलेल्या ट्विटमध्ये तिने अर्णब यांनाच एक प्रश्न विचारला. आपल्या ट्विटमध्ये ती विचारते, ‘(मी) किती मतांनी आघाडीवर आहे?’

सनीच्या या ट्विटला अवघ्या काही तासांमध्ये दहा हजारहून अधिक जणांनी रिट्वीट केले असून 53 हजारहून अधिकजणांनी लाइक केले आहे. ट्विटखाली चक्क साडेतीन हजार जणांनी सनीला मजेदार उत्तरे दिली आहेत. एकीकडे निवडणुकीच्या आकडेवरीवरुन गंभीर चर्चा रंगलेली असतानाच दुसरीकडे या एक चुकीमुळे नेटकऱ्यांना आयतेच खाद्य मिळाले असंच या ट्विटखालील रिप्लाय वाचून म्हणता येईल.