News Flash

‘समाजबदलातून कलाकृती घडतात’

‘फोटो प्रेम’ हा आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोन तरुण दिग्दर्शकांचा चित्रपट आहे.

|| रेश्मा राईकवार

रंगभूमी ते ओटीटी माध्यमांवरील वेबमालिका-वेबपटांपर्यंतचा पल्ला गाठणाऱ्या मराठी कलाकारांपैकी अग्रणी म्हणून अभिनेत्री नीना कु लकर्णी यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांची अभिनय क्षेत्रातील सुरुवात पंडित सत्यदेव दुबे, विजयाबाई मेहतांसारख्या गुरूंच्या हाताखाली झाली आणि आजही नवनवीन माध्यमांची आव्हाने पेलत त्या समर्थपणे या क्षेत्रात वावरत आहेत. नीना कु लकर्णी यांची मुख्य भूमिका असलेला ‘फोटो प्रेम’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आमची कलाकारांची पिढीच भाग्यवान आहे, असं त्या म्हणतात.

‘आमच्याच काळात वेगवेगळी माध्यमे आली आणि विकसित होत गेली. आम्ही रंगभूमीवर वावरलो. त्यानंतर दूरचित्रवाणीसारखे माध्यम आले, चित्रपट आले, लघुपट आले, ओटीटी माध्यमे आली. प्रत्येक माध्यमात आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. नाही तर आमच्यापेक्षाही थोर कलाकार होऊन गेले आहेत, पण त्यांना रंगभूमी सोडून दुसरे कोणतेच माध्यम उपलब्ध झाले नाहीत,’ असं त्या सांगतात. अर्थात नव्या माध्यमांची आव्हाने आपल्या पिढीने सहज पेलली यामागचं कारण सांगताना त्या म्हणतात, आमच्या सगळ्यांच्या अभिनयाचा पाया पक्का आहे. आम्हाला चांगल्या गुरूंकडून अभिनयाचे धडे मिळाले. त्यामुळे माध्यम कोणतेही असले तरी आम्हाला फरक पडला नाही. आमच्या वेळचे आम्ही सगळे कलाकार आजही त्याच उत्साहाने काम करतो आहोत. उलट नवनवीन भूमिका करण्यात आम्हाला फार रस वाटतो. वयानुसार नवनवीन तंत्रज्ञान, विषय आम्ही आत्मसात करत आहोत. मी १९८९ मध्ये ‘हमीदाबाईची कोठी’ हे नाटक केलं होतं, त्या वेळी मी त्यात शब्बोची मध्यवर्ती भूमिका के ली होती. तब्बल २१ वर्षांनी मी हेच नाटक के लं तेव्हा त्यात हमीदाबाईंची मध्यवर्ती भूमिका केली. हे वयाचे वेगवेगळे टप्पे आहेत, असं नाही म्हणणार. हा एक प्रवास आहे आणि तो करायला आवडतो म्हणून मी आजही आवडीने तो करते आहे, असं त्या म्हणतात.

‘फोटो प्रेम’ हा आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोन तरुण दिग्दर्शकांचा चित्रपट आहे. यात नीना कु लकर्णी यांनी माई ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. अत्यंत वेगळ्या विषयावरचा हा चित्रपट मी करू शके न, असा त्यांना विश्वास वाटला हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असं त्या म्हणतात. गेल्या काही वर्षांत तरुण दिग्दर्शकांनी कथा-दिग्दर्शन सगळ्याच बाबतीत एक वैविध्य आणलं आहे. पन्नास वर्षांपूर्वी असा विषय कोणाला सुचला असता असं मला वाटत नाही, असं म्हणणाऱ्या नीना कुलकर्णींनी कलाकार आणि दिग्दर्शक हे नातं वेगवेगळ्या टप्प्यावर कसं अनुभवलं याविषयीही सविस्तर अनुभव सांगितला. ‘मी सुरुवात के ली तेव्हा आमचे दिग्दर्शक आमच्यापेक्षा मोठे गुरुतुल्य असे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत गेलो. नंतरच्या काळात समवयस्क दिग्दर्शक आले. त्या वेळी एक कलाकार-दिग्दर्शक असं मैत्रीचं नातं अनुभवता आलं आणि त्यानंतर मग माझ्यापेक्षा लहान वयाच्या तरुण दिग्दर्शकांशी गाठ पडली. आत्ताच्या पिढीचे दिग्दर्शक हुशार आहेत, त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे आणि ते चित्रपट क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहतात. पूर्वी असं नव्हतं. चित्रपट फक्त त्यांची आवड नाही, ते त्यांचे ध्येय आहे. ते त्या ध्यासाने झपाटून जाऊन काम करतात. ‘फोटो प्रेम’चंच उदाहरण घ्यायचं तर या गोष्टीतली भावना मोठी आहे, पण तो एक भावनिक क्षण त्यांनी संपूर्ण लांबीच्या चित्रपटकथेत सुंदररीत्या गुंफला आहे, असं त्यांनी सांगितलं.

काळानुरूप समाजाच्याच विचारांचं प्रतिबिंब आजच्या चित्रपटांतून पडतं आहे, असं ठाम मत त्या व्यक्त करतात. ‘समाज बदलत जातो तसे त्यांचे बदलत जाणारे विषयच आपल्यासमोर येत असतात. आपण जे नवनवे विषय येत आहेत म्हणतो ते दुसरं काय असतं? ‘फोटो प्रेम’च्याच बाबतीत बोलायचं तर हा विषय तुम्हाला कसा सुचला? असा प्रश्न मी आदित्य आणि गायत्रीला विचारला होता. तेव्हा ते म्हणाले, आजकाल लोकांमध्ये फोटोचं किती वेड आहे. आपण सतत सेल्फी घेत असतो, पण असाही एक काळ होऊन गेला आहे जेव्हा एक फोटो काढणं हाही सोहळा असायचा. अशा वातावरणात वाढलेल्या बाईला आजच्या या आधुनिक काळात आपल्या फोटोतून आपली ओळख जपावीशी वाटणं, आपली ओळख पुढच्या पिढीला होईल असा एकही चांगला फोटो आपल्याकडे नाही याचीही भीती तिला वाटते आणि फोटो काढून घ्यायचीही भीती वाटते. सेल्फीच्या या जगात आपला एक फोटो काढून घेण्यासाठी धडपडणाऱ्या माईची गोष्ट ही एक प्रकारे समाजाचेच प्रतिबिंब आहे. समाजात होणाऱ्या बदलांमधूनच कलाकृती घडत जाते असं मला वाटतं आणि हे काही आज नाही. पिढ्यान्पिढ्या कलाकृती अशाच घडत आल्या आहेत.’

हिंदी-मराठी मालिकांबरोबरच फ्रेंच चित्रपटही त्यांनी के ला आहे. त्याविषयी बोलताना, फ्रेंच भाषेतील पदवीधर असल्याने फ्रेंच भाषेतील एक मालिका क रण्याची संधी मिळाली. नंतर मग मी ‘नोसेस’ नावाचा फ्रेंच चित्रपट प्रत्यक्ष तिथे जाऊन के ला. ‘द बेस्ट एक्झॉटिक मॅरीगोल्ड हॉटेल’ हा हॉलीवूडपट केला. हे अनुभव खूप काही देऊन जातात. माझी जडणघडण पाश्चात्त्य वळणाने झाली आहे. माझे आईवडील डॉक्टर, शिक्षण कॉन्व्हेंटमधून झालेलं… त्यामुळे मला अप्रूप काही वाटत नव्हतं. फ्रेंच माणसं झपाटून जाऊन काम करतात. त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. त्यानिमित्ताने तिथल्या काही लोकांशी माझी खूप छान मैत्री झाली, नवी नाती तयार झाली, असं त्यांनी सांगितलं.

‘शेवरी’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी के ली होती. माझा नवरा दिलीप याला चित्रपटनिर्मितीत खूप रस होता, तो जगला असता तर त्याने चित्रपटनिर्मिती नक्कीच के ली असती. त्याची ती इच्छा पूर्ण करावी या उद्देशाने मी हा एकच चित्रपट के ला, असं त्यांनी स्पष्ट के लं. सध्या त्या उमरगावमध्ये ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिके चं चित्रीकरण करत आहेत. जिजाऊ ही एक मोठी हस्ती होती, त्यांच्या नखाचीही सर आपल्या कोणाला येणं शक्य नाही; पण त्यांची भूमिका मला करायला मिळते आहे यासारखा दुसरा आनंद नाही. अतिशय जिद्दीने आणि मनस्वीपणे मी ती भूमिका करते आहे आणि ते लोकांपर्यंत पोहोचतं आहे हे त्यांनी दिलेल्या प्रतिसादावरून लक्षात येतं, असं त्यांनी सांगितलं. या मालिके चे नवीन भाग लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजेत आणि त्यासाठी सगळे जण नियम पाळून चित्रीकरण करत आहेत, असंही त्या म्हणाल्या.

‘फोटो प्रेम’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत असल्याने तो खूप लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त के ला. ओटीटीवर भाषेचा काही प्रश्न येत नाही. तुम्ही सबटायटल्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषांतील चित्रपट पाहू शकता. त्यामुळे चित्रपटगृह बंद असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत चित्रपट पोहोचवण्यासाठी ओटीटी हे महत्त्वाचं माध्यम ठरलं असल्याचं त्या सांगतात.

 

काळानुरूप समाजाच्याच विचारांचं प्रतिबिंब आजच्या चित्रपटांतून पडतं आहे. समाज बदलत जातो तसे त्यांचे बदलत जाणारे विषयच आपल्यासमोर येत असतात. आपण जे नवनवे विषय येत आहेत म्हणतो ते दुसरं काय असतं? ‘फोटो प्रेम’ चित्रपटाचंही तेच आहे. आजकाल लोकांमध्ये फोटोचं किती वेड आहे. आपण सतत सेल्फी घेत असतो, पण असाही एक काळ होऊन गेला आहे जेव्हा एक फोटो काढणं हाही सोहळा असायचा. अशा वातावरणात वाढलेल्या बाईला आजच्या या आधुनिक काळात आपल्या फोटोतून आपली ओळख जपावीशी वाटणं, आपली ओळख पुढच्या पिढीला होईल असा एकही चांगला फोटो आपल्याकडे नाही याचीही भीती तिला वाटते आणि फोटो काढून घ्यायचीही भीती वाटते. सेल्फीच्या या जगात आपला एक फोटो काढून घेण्यासाठी धडपडणाऱ्या माईची गोष्ट ही एक प्रकारे समाजाचेच प्रतिबिंब आहे.  -नीना कुलकर्णी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:04 am

Web Title: art changes happen through social change akp 94
Next Stories
1 कलाकारांचा कृतिपट
2 रणबीर कपूरची छायाचित्रकारांना तंबी
3 सिनेमा ऐकण्याची गोष्ट!
Just Now!
X