News Flash

‘भय’भुताचा खेळ चाले

रात्री साडेदहाचा प्राइम स्लॉट आणि हॉरर मालिका हे समीकरणच मुळात मराठी टेलीव्हिजनमध्ये नव्हतं.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

रात्री साडेदहाचा प्राइम स्लॉट आणि हॉरर मालिका हे समीकरणच मुळात मराठी टेलीव्हिजनमध्ये नव्हतं. दोन वर्षांपूर्वी हे समीकरण पहिल्यांदा बसवलं गेलं झी मराठी वाहिनीवर आणि त्या स्लॉटमध्ये पहिली मालिका फिट बसली होती ती म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’. पूर्णपणे कोकणात सावंतवाडीत चित्रित झालेली, तिथली भाषा, तिथली माती घेऊन आलेली ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली. इतकी की दोन वर्षांनंतरही या मालिकेतील दत्ता, माधव, छाया, अभिराम, नीलिमा, पांडू ही प्रत्येक व्यक्तिरेखा लोकांना आजही चांगलीच लक्षात आहे. या मालिकेचे दुसरे पर्व येणार असे प्रोमो झळकू लागले आणि पुन्हा एकदा आनंदाची लहर उठली. प्रीक्वल ही संकल्पना मालिकाविश्वात पहिल्यांदाच आणणाऱ्या ‘रात्रीस खेळ चाले’चा हा दुसरा अंकही प्रेक्षकांना आवडतो आहे. भूतप्रेत संकल्पना दाखवणारी मालिका म्हणून एके काळी टीकाही सहन केली आहे, मात्र यात भय कायम असलं तरी या भयाच्या भुताचा खेळ हाच मालिकेच्या कथेचा गाभा आहे, असं दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितलं.

आकेरीतील त्याच गाजलेल्या नाईकांच्या वाडय़ात या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सुरू आहे. मालिकेची सुरुवात लहानग्या दत्ता-माधव-छाया त्रिकुटापासून झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा त्यांचे मोठे अवतार लोकांसमोर आले आहेत. पहिल्याच भागातील कलाकार या भागातही आपापल्या भूमिकांमध्ये पाहायला मिळतायेत. सध्या छायाच्या लग्नाचा विषय नाईकांच्या घरात सुरू आहे. गेल्या भागात भूत म्हणूनच वावरणारे अण्णा या भागात दुष्ट खलनायक म्हणून दरारा निर्माण करून आहेत. एक वेगळा जॉनर घेऊन आलेली ही मालिका दुसऱ्या भागात करताना त्यातील मुख्य कलाकार, दिग्दर्शक यांच्या भावना नेमक्या काय आहेत हे खुद्द नाईकांच्या वाडय़ावरच जाऊन जाणून घेता आले.

या मालिकेत दत्ता आणि माधव ही दोन भावांची जोडगोळी प्रेक्षकांना भलतीच आवडली. या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचे चेहरे तुलनेने नवीनच होते. दत्ताची भूमिका साकारणाऱ्या सुहास शिरसाट याने या मालिकेच्या आधी २०-२५ चित्रपट केले होते. टेलीव्हिजनवर ही माझी पहिलीच मालिका होती आणि या मालिकेने मला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली, असं सुहास सांगतो. दोन वर्षांनंतर आम्ही या मालिकेच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत. पहिल्या भागात तुलनेने आव्हान जास्त होतं. कारण भाषा ही मुख्य अडचण होती. मी मूळचा बीडचा असल्याने मालवणी भाषेशी दुरूनही संबंध नव्हता. त्यामुळे लोकांनी जेव्हा मालवणी मालिका असूनही त्या भाषेत कलाकार बोलत नाहीत, ही टीका केली ती योग्य होती. त्यानंतर मात्र मी गंभीर झालो आणि आमचा लेखक प्रल्हाद कुडतरकर, दिग्दर्शक राजू सावंत यांनी प्रत्येक संवाद मालवणी भाषेत लिहून देऊन माझा सराव करून घेतला. आता ही भाषा इतकी अंगवळणी पडली आहे की, मी इथलाच आहे, असं लोकांना वाटत असल्याचं सुहास म्हणतो.

सुहासप्रमाणेच मालवणी भाषेशी दुरान्वयानेही संबंध न आलेला कलाकार म्हणजे माधवच्या भूमिकेतील मंगेश साळवी. मी गेली २४ वर्षे मराठी-गुजराती रंगभूमीवर काम करतो आहे, तिथेच मी जास्त रमतो. त्यामुळे इतर कुठल्याही भाषेत मी काम करू शकतो; पण मालवणी भाषेत बोलणं मला फार अवघड गेलं, असं मंगेश सांगतो. आत्ताचा माधव हा तरुण आहे, त्यामुळे या भूमिकेसाठी माधवने तब्बल तीस किलो वजन कमी केलं. माधवची व्यक्तिरेखा एकच असली तरी आधीच्या भागात मी प्रौढ होतो, मला एक मोठा मुलगा होता. त्यामुळे त्या पद्धतीने माझा चष्मा लावण्याची सवय, बोलण्याची लकब मी विकसित केली होती. इथे हा माधव तरुण आहे. त्यामुळे पौगंडावस्थेतून बाहेर आल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाचा उत्साहाचा आणि थोडे नैराश्य यांचे मिश्रण असलेला हा काळ असतो. त्यानुसार हा माधव मी उभा केला आहे. अर्थात, या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा किंवा मुळातच कथा ज्या पद्धतीने बेतली गेली आहे. तशा तपशीलवार पद्धतीने कोणत्याही मालिकेत काम केले गेलेले नाही. आताचा भाग हा तांत्रिकदृष्टय़ाही तितकाच प्रगत आहे आणि मुळात पेपरवर्क इतके उत्तम झाले आहे की, कलाकारांना काम करताना कुठलीच अडचण जाणवत नसल्याचे मंगेशने सांगितले.

या मालिकेत सध्या सगळ्यात लोकप्रिय भूमिका ठरली आहे ती म्हणजे अण्णांची. गेली अनेक वर्षे रंगभूमी-मालिका-चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या माधव अभ्यंकर यांनी अण्णांची भूमिका केली आहे. एखाद्या मालिकेचा पुढचा भाग काढता येईल अशा पद्धतीने ती लिहिणं, हॉरर जॉनर असूनही तो उत्कृष्ट पद्धतीने मांडणं हे सोपं काम नव्हतं. मी लेखकाला यासाठी शंभर टक्के श्रेय देईन, असं अभ्यंकर सांगतात. मी याआधी चित्रपटातून अनेकदा खलनायकाची भूमिका केली आहे; पण अण्णांची गोष्टच वेगळी आहे. अतिशय रासवट, निडर आणि स्वत:च्याच धुंदीत जगणारा असा हा माणूस आहे. मागच्या पर्वात माझ्या वाटय़ाला फारच छोटी भूमिका होती, इथे तसं नाही. इथे तरुणपणीची भूमिका असल्याने मलाही आधी वजन कमी करावं लागलं. दीड महिन्यांत मी आठ किलो वजन कमी केलं. त्यात मी पुण्यात राहत असल्यामुळे शुद्ध मराठी भाषा बोलतो, तिथे मालवणी माणूस पहायला मिळणंही कठीण, मुंबईत आपण सहजपणे मालवणी माणसांना भेटू शकतो. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवणं हे आव्हान होतं; पण आता ते चांगलं जमतं आहे आणि ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय ते पाहता लोकांनाही ते आवडतंय, असं अभ्यंकर यांनी सांगितलं.

समाजमाध्यमांवरूनही ज्या पद्धतीने अण्णा ही व्यक्तिरेखा लोकप्रिय होते आहे ते पाहिल्यावर बरं वाटतं, असं ते म्हणतात. हिटलर किंवा चेंगेज खानबरोबर अण्णांची तुलना होते आहे. लोक विचारतात, अशी व्यक्ती असू शकते का? पण अशी चौकटीबाहेरची वेगळी व्यक्तिरेखा करायला मजा येते. कलाकाराला दुसरं काय हवं असतं. अगदी सेटवरही काही छोटय़ा-मोठय़ा भूमिकांसाठी स्त्री कलाकार हवे असतील तर त्यांचे कुटुंबीय अण्णांबरोबर काम नाही ना, असं पहिले विचारतात. इतका दरारा या अण्णांनी निर्माण केला आहे, असं ते गमतीने म्हणतात. पूर्वी चाहत्यांचं प्रेम अनुभवायला मिळायचं; पण हल्ली समाजमाध्यमांवर सगळ्या खलनायकांची चित्रं टाकून हे सगळे अण्णांच्या शाळेत शिकलेले होते, अशा पद्धतीचे मेमे दिसतात, सेल्फीचा आग्रह होतो. एक कलाकार म्हणून मी या प्रेमाचा आनंद अनुभवतो आहे. अशी एखादीच भूमिका असते जी तुम्हाला घरोघरी लोकप्रिय करून जाते, असं ते सांगतात.

माईंची भूमिका करणाऱ्या शकुंतला नरेही अशी भूमिका दहा-वीस वर्षे काम केल्यानंतर एखादीच मिळते, असं सांगतात. मागच्या वेळीही माझ्या व्यक्तिरेखेला खूप चांगल्या छटा होत्या. आता तर मला अभिनयाचे सगळेच पैलू दाखवायला मिळतायेत, पण ही मालिका इतर हॉरर मालिकांप्रमाणे नाही, असं त्या आवर्जून सांगतात. कोकणात अशा कथा घडल्या आहेत. हे भूत नाही, माणसाच्या मनातील भीती आहे. इतर हॉरर शोप्रमाणे उगाचच भूत-पिशाच्च दाखवणारी ही मालिका नाही. ती वेगळी मालिका आहे. अशा व्यक्तिरेखा लोकांनी बघितलेल्या आहेत आणि प्रेक्षकही सांगतात, की माई, अण्णा या व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या घरामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे उगाच काही तरी विपर्यास करणारी ही मालिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. पहिल्या भागातील स्पॉटबॉयपासून कलाकारांपर्यंत सगळे तेच लोक याही भागात एकत्र आले आहेत, असे फार कमी वेळा होते आणि याचे श्रेय मालिकेचे निर्माते सुनील भोसले यांना जाते, असे शकुंतला नरे यांनी सांगितले.

या मालिकेतील नाईकांचा वाडा असेल, वाडय़ामागची विहीर असेल, नेने वकिलांचे घर अशा सगळ्या मोठय़ा पसाऱ्यात रोजचे चित्रीकरण करणे हेही एक आव्हानच आहे. या वाडय़ात वरच्या भागात आपल्याला अण्णांची, माधवची अशा वेगवेगळ्या खोल्या दिसतात. प्रत्यक्षात या वाडय़ात एकच खोली आहे ज्याच्या वेगवेगळ्या भागांचा वापर करून या खोल्या मालिकेत वेगवेगळ्या दिसतात. व्हीएफएक्स हे या मालिकेचे वैशिष्टय़ असले तरी ते जाणवू नये अशा सफाईने चित्रीकरण करणे हे खरे आव्हान आहे. या मालिकेसाठी पहिल्यांदाच पॉलीसाऊंडचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे अण्णांच्या चपलेच्या आवाजापासून बारीकसारीक गोष्टी यात स्पष्ट ऐकू येतात, असे दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितले.

‘सिक्वल नियोजित नव्हता’

या मालिकेच्या सिक्वलचा कधी विचार केला नव्हता. मात्र पहिल्या भागात अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत, भूत दिसलंच नाही, अशा लोकांच्या तक्रारी होत्या. त्यांच्या या प्रश्नांची उत्तर जोडत आम्ही कथा तयार करत गेलो. मुळात या मालिकेत भूतप्रेत नाही. रात्री रस्त्याने एकटे जातानाही आपल्या मनात उगाचच भीती असते, या भीतीचंच भूत मग आपल्यासमोर अनेक शंकाकुशंका निर्माण करतं. मालिकेत हेच सूत्र वापरलं आहे आणि ते अधिक परिणामकारक होण्यासाठी कॅमेरा, व्हीएफएक्स तंत्राचा उत्तम वापर केला आहे. उदाहरणच द्यायचे तर यात पुढच्या भागात पावसाचा प्रसंग आहे. आता पाऊस कुठून पडणार? तो प्रसंग पूर्ण व्हीएफएक्सने उभा केला आहे, मात्र तो तसा जाणवणार नाही.

-राजू सावंत, दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:40 am

Web Title: article about ratris khel chale serial
Next Stories
1 विकारविलसित
2 ‘मुंगडा’ रिमेक वादावर दिग्दर्शकांचं सडेतोड उत्तर
3 Video : मादाम तुसाँच्या परदेशी संग्रहालयामध्ये ‘देसीगर्ल’चा जलवा
Just Now!
X