नाटकाचा प्रारंभ होतो तेव्हा एक (बहुधा) नुकतंच लग्न करून आलेलं जोडपं वाटावं असे दोघं तरुण-तरुणी एका घरात प्रवेश करतात. घरात दुसरं कुणीच नाहीए. त्याअर्थी त्यांनी नोंदणी पद्धतीनं लग्न करून तिथून ते थेट आपल्या या नव्या घरातच वास्तव्याला आलेले असावेत. तरुण तिला दरवाजातच थांबायला सांगून तांदूळ भरलेला ग्लास तिच्यासमोर ठेवतो आणि तिला उजव्या पायानं तो ग्लास लवंडायला सांगतो. नंतरच तो तिला घरात घेतो.

हळूहळू त्यांच्यातल्या संवादातून कळतं की, त्याचं नाव राहुल देसाई असून त्याची स्वत:ची (भागीदारीत) एक कंपनी आहे. आणि तिचं नाव आहे- सीमा.

रीतीनुसार तो तिला आपलं घर दाखवतो. पण का कुणास ठाऊक, त्यांच्यात अवघडलेपणाची एक अदृश्य भिंत असल्याचं त्यांच्या व्यवहारावरून, त्यांच्यातल्या तुटक संवादावरून वाटत राहतं. त्यांच्यात परस्परसौहार्दाचा अभाव असल्याचंही एव्हाना लक्षात येतं. तिची आवडनिवड वेगळी आहे. त्याचे आग्रह वेगळे आहेत; जे अर्थातच तिला पसंत नाहीत. तिची आवड त्यालाही खटकतेय. मग हे दोघं एकत्र कसे आले, हा प्रश्न स्वाभाविकपणेच आपल्या मनात उभा राहतो. लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात नवरा-बायकोनं परस्परांना समजून घेतानाचे हे ट्रॅक बदलतानाचे अपरिहार्य खटके असावेत असंही मधेच वाटतं. पण राहुलचे काही दुराग्रह आपल्यालाही बुचकाळ्यात पाडतात. त्याबद्दल तिचं त्याच्यावर तडकणं, कधी नाइलाजानं माघार घेणं, हे लग्नातील तडजोडीचाच भाग वाटत राहतो.

मात्र, नंतर अशा काही घटना घडतात, की आपल्याला या सगळ्याचा पुनर्विचार करावा लागतो. श्री नावाचा राहुलचा मित्र (आणि कंपनीचा भागीदार) काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्याची सही घेण्यासाठी अचानक तिथं येतो आणि त्यांच्यामधल्या असंगत बोलण्या-वागण्यातून संशयाची सुई आपल्या मनात  टिकटिकायला सुरुवात होते. या सगळ्यात काहीतरी पाणी मुरतंय असं वाटू लागतं. तशात राहुलला काही टेस्टस्संदर्भात एक अनाम फोन येतो. त्या लवकरात लवकर करण्याची हमी राहुल देतो. सीमालाही कुणाचा तरी असाच फोन येतो. तिचं अगदी निकटचं असं कुणीतरी आजारी असल्याचं त्यातून सूचित होतं. या फोननं ती अस्वस्थ होते. पण त्याबद्दल ती राहुलला काहीच सांगत नाही. राहुलही त्या घरातल्या काही गोष्टींबद्दल तिला काही सांगू इच्छित नाही. त्यांच्यातली ही लपवाछपवी आणि ताण त्यांच्या नात्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.

अर्थात यथावकाश हे कोडं उलगडतं खरं; परंतु तेही अनेक प्रश्न उभे करून!

अस्मिता जोशी यांच्या मूळ कथेचं सुनील खरे यांनी ‘ती दोघं’ हे केलेलं नाटय़रूपांतर. या नाटय़रूपाचं दिग्दर्शन पुन्हा मूळ कथालेखिका अस्मिता जोशी यांनीच केलेलं आहे. ‘ती दोघं’चा प्रयोग पाहताना संहितेची रचना सत्तरच्या दशकातल्या मेलोड्रॅमॅटिक नाटकागत असल्याचं प्रत्यही जाणवतं. श्री नावाचं पात्र हे तर त्याकाळचं खास ठेवणीतलं पात्र! संहितेत अनावश्यक लुडबूड करणारं. नायक-नायिकेला उपदेशाचे डोस पाजणारं. त्यांच्या आयुष्यात पुढं काय घडणार हे ठाऊक असलेलं, किंवा जे घडायला हवं ते घडवून आणणारं. अशा ठरीव साच्यातल्या पात्रांमुळेच त्यावेळची नाटकं बटबटीत, कृत्रिम वाटत. असतही. आज २०१५ सालात.. मराठी रंगभूमी आता कितीतरी योजने पुढं निघून गेलेली असताना अशा साचेबद्ध पात्र नाटकात योजलं जातं, याला काय म्हणावं? असो. नाटकातल्या राहुल आणि सीमा यांच्यात नेमकं नातं काय आहे, या प्रश्नाचा उलगडा शेवटाकडे होतो खरा; परंतु तो तार्किकदृष्टय़ा अजिबातच न पटणारा आहे. राहुलने घटस्फोटासाठी दावा करणाऱ्या आपल्या बायकोला (शरयूला) आपण कसे भावनाशील आहोत, काळजीवाहू आहोत, हे सप्रमाण दाखवण्यासाठी सीमाला काही दिवसांकरता आपली सोबतीण (कम्पॅनियन) म्हणून या ठिकाणी बोलावलेलं असतं. आता कुठला नवरा आपल्या बायकोचा आपल्यावरील टोकाचा राग दूर करण्यासाठी असले आत्मघातकी पाऊल उचलेल? राहुलच्या बेपर्वा, आत्मकेंद्री वृत्तीपायीच त्याच्यावर उत्कट प्रेम असूनही शरयू सतत त्याच्याकडून दुखावली जाते आणि एके दिवशी याचा कडेलोट होऊन तिला घटस्फोटाचा मार्ग पत्करावा लागला आहे.. हे राहुल स्वत:च कबूल करतो आहे. आणि दुसरीकडे घटस्फोटित सीमानंही आपल्या लहानग्या मुलीच्या दुर्धर आजारावरील शस्त्रक्रियेसाठी पैशाची तजवीज करण्यासाठी राहुलचा ‘हा’ प्रस्ताव स्वीकारला आहे. आता या ‘कम्पॅनियनशिप’मध्ये या दोघांना नेमकं काय अपेक्षित होतं, हे जरी प्रत्यक्ष दाखवलं नसलं तरी त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांचे नवरा-बायकोसारखेच संबंध असावेत असं वाटतं. आता असे संबंध (कुठल्याही कारणाने का होईना!) ठेवणाऱ्या व्यक्ती निरपराध आहेत असं मानणं कसं शक्य आहे? आधीच ज्यांच्या वैवाहिक आयुष्याचा त्यांच्याच वागण्यामुळे चुथडा झालेला आहे, अशा व्यक्ती आपल्या अशा कृत्याने अधिकच गाळात जाणार नाहीतर काय? बरं, त्यांचे हे संबंध फक्त दिखाव्यापुरतेच आहेत असं क्षणभर गृहीत धरलं, तरी मग सीमाच्या गृहप्रवेशावेळी राहुलनं तिला तांदळाचं माप ओलांडायला लावलं, त्याचा अर्थ काय काढायचा? असे अनेक प्रश्न नाटक पाहताना प्रेक्षकांना पडतात. ज्यांची सयुक्तिक उत्तरं मात्र सापडत नाहीत. एकुणात, लेखक आणि दिग्दर्शक दोघंही आपल्या या नाटय़कृतीबद्दल गोंधळी अवस्थेत असल्याने त्यांच्याकडून फार अपेक्षा करणं गैर आहे. प्रयोग म्हणूनही नाटक प्रेक्षकाला गुंतवून ठेवत नाही. पात्रांचं चित्तचमत्कारिक वागणं कितीसा काळ त्यांना बांधून ठेवणार? जिचा पायाच भुसभुशीत आहे अशा कथेवरचं हे नाटक रंगमंचावर आणण्याचं धाडस कसं काय केलं गेलं, कळायला मार्ग नाही.

नाटकातली गाणी मात्र सुश्राव्य आहेत. थॅंक्स टु गीतकार मंदार चोळकर आणि संगीतकार मकरंद भागवत! प्रवीण गवळींचं नेपथ्य लक्षणीय. प्रशांत जोशींची प्रकाशयोजनाही प्रसंगानुकूल. अरुण कानविंदे यांच्या पाश्र्वसंगीताने विविध मूड्स अधोरेखित केले आहेत. सचिन देशपांडे (राहुल) आणि राधिका देशपांडे (सीमा) यांची कामंही ठीक आहेत. परंतु निष्प्राण देहाला जसा काही अर्थ नसतो, तसंच कसलं प्रयोजन नसलेल्या नाटकाचं करायचं काय?