जयेश शिरसाट

अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर असलेल्या विश्वासू व्यक्तींनीच त्याला अमली पदार्थाची चटक लावली? त्याला नशेच्या भोवऱ्यात झोकून दिले का? या प्रश्नांची उत्तरे सध्या केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथक (एनसीबी) या दोन यंत्रणा शोधत आहेत. या यंत्रणांना भविष्यात उत्तरं मिळतीलही; पण त्यानिमित्ताने सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणालाही वेगळे वळण मिळालेच आणि पुन्हा एकदा ‘बॉलीवूड-ड्रग्ज’ या गुळपीठाविषयी चर्चा रंगू लागली आहे.

नव्वदच्या दशकापासून आतापर्यंत चित्रपट-मनोरंजन विश्व आणि फॅशन इंडस्ट्रीत असलेल्या अनेकांवर अमली पदार्थाचे सेवन केल्याबद्दल कारवाई झाली आहे. कधी पोलिसांच्या हाती लागलेल्या अमली पदार्थ विक्रे त्यांमुळे या क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींचं गुपित जगजाहीर झालं आहे. तर काही जण छाप्यांदरम्यान पोलिसांना आयतेच सापडलेत. काहीनी जाहीर मुलाखतींदरम्यान आपण कुठल्या अमली पदार्थाचे सेवन करतो, त्याचा त्यांना जाणवणारा फायदाही सांगून मोकळे झालेत. त्यामुळे बॉलीवूड आणि अमली पदार्थाचं हे समीकरण नवं नाही. ते सर्वश्रुत आहे म्हणण्यापेक्षा अमली पदार्थाच्या व्यसनांनी अनेक कलाकारांची कारकीर्द संपली, हेही लोकांनी पाहिलं आहे, त्याबद्दल वाचलं आहे आणि तरीही साधारणपणे तीन वर्षांनी सुशांतच्या निमित्ताने या शिळ्या कढीला ऊत आला आहे. २०१७ मध्ये प्रसिद्ध व्हिडीओ लायब्ररीच्या मालकाला कोकेन, एलएसडीसह अटक झाली. इंडस्ट्री त्याला बकुल कोकेन या नावाने ओळखत होती. दिग्गज कलाकारांपासून स्ट्रगलर्सपर्यंत सर्वासोबत त्याची मैत्री. सोशल मीडियावर त्यानेच पोस्ट केलेली छायाचित्रे या मैत्रीचा भक्कम पुरावा देत होती. व्हिडीओ लायब्ररीच्या आडून तो बॉलीवूडला ‘प्युअर’ कोकेन पुरवतो, असा पोलिसांना संशय होता. मात्र त्याच्या या उच्चभ्रू ग्राहकांपर्यंत पोलीस पोहोचू शकले नाहीत. तपास बकुल आणि त्याच्या पुरवठादारांपर्यंतच मर्यादित राहिला. अन्यथा तीन वर्षांपूर्वीच इंडस्ट्रीतल्या भल्याभल्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागू शकला असता. पोलिसांनी भक्कम पुराव्यांची साखळी उभी केल्यामुळे बकुल जामीन मिळवू शकला नाही. या कारवाईने इंडस्ट्रीवर धाक राहील आणि अमली पदार्थाची ही पुरवठा साखळी तुटून पडेल, असा अंदाज होता. मात्र सुशांत प्रकरणात पुढे आलेल्या तपशिलांवरून तो चुकीचा ठरलाय हे सिद्ध झाले आहे.

पूर्वी एक कयास असाही होता, की यशाची हवा मस्तकात शिरल्याने किंवा अपयशाचं नैराश्य झाकण्याचा प्रयत्न करणारे कलाकार अमली पदार्थाचा पर्याय चोखाळतात. अविश्रांतपणे काम करताना प्रत्येक क्षणी उत्साही असावं, ताजंतवानं दिसावं या विचाराने प्रमुख कलाकारच काय, पण कलाकारांच्या मागे नाचणारे, स्टंट करणारे, एक्स्ट्राज म्हणून ओळखले जाणारे साहाय्यक कलाकार असे चित्रपटांशी संबंधित अनेक जण या ना त्या कारणाने अमली पदार्थाच्या आहारी गेले. त्वचा टवटवीत राहते, वजन कमी होतं, क्षणात एनर्जी मिळते, नैराश्य झटकता येतं, या गळी उतरवलेल्या गैरसमजुतींनी नशेला खतपाणी मिळत गेलं. अलीकडे मात्र इंडस्ट्रीत अमली पदार्थाचे सेवन हे स्टाइल स्टेटमेन्ट ठरलं आहे. त्याला नकार देणारा मूर्ख ठरवला जातो. त्याला एकटं पाडलं जातं. या इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी नेटवर्किंगची गरज आहे, वलयांकित होणं अत्यावश्यक आहे आणि अशा वलयांकित लोकांच्या कं पूत सहभागी होण्यासाठी पटो न पटो अमली पदार्थाची सवय असणं क्र मप्राप्त झालंय. दुसरा पर्याय राहिलेला नाही. पूर्वी लिमिटेड आवृत्ती असलेली मनगटी घडय़ाळं, इम्पोर्टेड कार/ बाइक आणि अन्य मर्यादित विषयांवर रंगणाऱ्या चर्चेत आता हॅश, बड, कोक, स्नो, नोज कॅण्डी, डॉट्स, विंडोपॅन, बेबीफूड, लव्ह डव्ह, अ‍ॅसिड, एक्स (अमली पदार्थाची प्रतिनामं) यांचाही सहभाग असतो.  एकेकटय़ाला गाठून त्याच्या हाती कोकेनची पुडी देणारे बकु लसारखे विक्रेते जुनाट झालेत. त्यांची जागा इव्हेन्ट मॅनेजमेन्ट किंवा सर्व्हिस इंडस्ट्रीशी जुळलेल्या चुणचुणीत तरुणांनी घेतली आहे. पबमध्ये इंडस्ट्रीतल्यांसह राजकारण, क्रीडा, उद्योग, कॉपरेरेट कंपन्या अशा विविध क्षेत्रांतल्या मंडळींना एकत्र आणायचं, एकमेकांची ओळख करून द्यायची, ती वाढवायची आणि त्यानंतर अशा समूहांना हवी ती सेवा उपलब्ध करून द्यायची. त्यानिमित्ताने स्वत:चं नेटवर्क तयार करून हवी ती कामं करून घ्यायची. मुंबईतल्या बहुतांश पब, हॉटेलांमध्ये असे तरुण भागीदार आहेत. नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसायवृद्धीचं हुनर हीच त्यांची गुंतवणूक.

‘हाऊस पार्टी’ किंवा ‘आफ्टर पार्टी’ या पार्टी अ‍ॅनिमल्सनी जन्माला घातलेल्या संज्ञाही मुंबईसारख्या शहरात जोर धरतायेत. संध्याकाळी भेटायचं, दारू-जेवण उरकू न क्लबिंग (पबमध्ये) आणि मध्यरात्री एखाद्याचं घर गाठून ड्रग डोस.. ही आफ्टर पार्टी. कलाकारच नव्हे कॉर्पोरेटमधील अनेक जण यात अडकलेले आहेत. मात्र कलाकारांसाठी या गोष्टी सहजपणे रोजच्या रोज केल्या जातात. शहरातले बहुतांश पब, क्लब हे तारांकित हॉटेल्समध्ये आहेत. विमानतळाच्या परिघात, तारांकित हॉटेलमध्ये असल्याने या आस्थापना उशिरापर्यंत सुरू असतात आणि आफ्टर पार्टीसाठी अन्य कुठे जाण्याऐवजी हॉटेलमध्येच एखादी खोली उपलब्ध होते. पार्टीत सर्वासोबत मिसळलेल्या ठरावीक व्यक्तींसाठी अमली पदार्थाची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. अशा पाटर्य़ामध्ये कुणाचाही संशय येणार नाही अशा व्यक्ती फे रीवाल्याप्रमाणे अमली पदार्थ घेऊन फिरतात. स्थानिक पोलीस, विशेष पथकं किंवा केंद्रीय यंत्रणांना खबऱ्यांमार्फत, पकडलेल्या विक्रेत्याच्या चौकशीतून या तथाकथित उच्चभ्रू ग्राहकवर्गाची माहिती मिळत असते. मात्र या वलयांकित, प्रभावशाली व्यक्तींपर्यंत पोहोचण्याआधीच विविध सत्ताकेंद्रांतून दबाव, दडपण आणलं जातं आणि काही दिवस अळीमिळी गुपचिळी बाळगली जाते आणि सगळं शांत झाल्यावर पुन्हा एकदा बॉलीवूडी कलाकार आणि अमली पदार्थाचं हे गूळपीठ रंगू लागतं पुन्हा एकदा कुठल्या दुसऱ्या कलाकाराचा चेहरा उघडेपर्यंत..