सुहास जोशी

वेबवरील मनोरंजन म्हणजे अमुक अमुक गोष्टी हव्यातच अशा ठोकताळ्याचा पायंडा पडत असताना एकदम हलक्याफुलक्या विषयाला हात घालणे हे काहीसे धाडसच म्हणावे लागेल. ना खून, ना सेक्स, ना शिव्या असं काहीतरी हिंदी वेब मनोरंजनात पाहायला मिळेल अशी अपेक्षाच ठेऊ  नये हीच सध्याची परिस्थिती आहे. पण याला छेद देणारे असे कथानक नेटफ्लिक्सच्या ‘चॉपस्टीक’ या वेबफिल्ममध्ये मांडले आहे. विषयाचे वेगळेपण हा या फिल्मचा महत्त्वाचा मुद्दा असला तरी केवळ वेगळेपणावर तरुन जावं इतका जीव त्याच्या मांडणीत नाही ही त्यातील महत्त्वाची त्रुटी. हा चित्रपट पाहण्याची इच्छा होते, पाहिलाही जातो, पण त्यातून वेगळं काही मिळाल्याची जाणीव मर्यादितच राहते.

या वेबफिल्मच्या कथानकाचा जीव अगदीच एवढासा आहे. पर्यटन कंपनीत दुभाषा कम मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या निरमा सहस्रबुद्धे (मिथिला पारकर) हिची नवीकोरी चारचाकी गाडी विकत घेतलेल्या पहिल्याच दिवशी चोरीला जाते. पोलिसात तक्रार वगैरे सोपस्कार होतात. पण त्यातून गाडी मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे लक्षात आल्यावर ती मुलगी यंत्रणाबाह्य़ व्यवस्थेचा आधार घेते. ही यंत्रणाबाह्य़ व्यवस्था म्हणजे कोणतेही कुलूप उघडण्यात पटाइत असणारा आर्टस्टि  (अभय देओल). आर्टस्टि या नावानेच ओळखलं जाणारं हे पात्र नेहमीप्रमाणे परिस्थितीमुळे या मार्गाला लागलेलं असतं. त्याला नवनवीन पदार्थ तयार करण्याची आवड असते, पण काम नवनवीन कुलुपं तोडण्याचे करत असतो. निरमाची चोरलेली गाडी अखेरीस या व्यवसायातील संघटित व्यवस्था असणाऱ्या प्रमुखाकडे पोहचते. त्या प्रमुखाचा अत्यंत लाडका असणारा बकरा नेमका त्याच गाडीत ठाण मांडून बसतो. आणि त्यामुळे गाडी मोडतोड करण्याच्या प्रक्रियेपर्यंत जातच नाही. दरम्यान, निरमा आणि आर्टिस्ट मिळून ती गाडी परत मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करतात ते म्हणजे हा चित्रपट.

तसा कथेचा परीघ मर्यादितच आहे. मात्र ती फुलवण्यासाठी सिनेमाकर्त्यांने अनेक वेगवेगळे घटक त्यामध्ये आणले आहेत. त्यासाठी विशेष प्रसंग रचले आहेत. त्यामुळे केवळ गाडी चोरीपेक्षा या मुद्दय़ांनादेखील कथेत वाव मिळतो. मात्र मूळ घटनेतील नाटय़ फुलवण्यात पुरेशी मेहनत जाणवत नाही.

वेबवरील मनोरंजनात हल्ली हिंदीमध्ये आढळणारी एक महत्त्वाची त्रुटी येथे आढळत नाही हे मुद्दाम नमूद करावे लागेल. आर्थिक मर्यादेत काम करताना अनेकदा चित्रीकरणाच्या स्थळाबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही. पण येथे बाह्य़ चित्रीकरणाचे अनेक प्रसंग उत्कृष्टरीत्या चित्रित झाले आहेत. किंबहुना त्यातील सहजपणा जाणवण्याइतपत आहे.

चटपटीत संवाद हा हल्ली अनेकदा महत्त्वाचा घटक मानला जातो. येथे तसा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी अगदी जाणीवपूर्वक केल्याचे दिसते. पण अशा संवादाचा एक थेट परिणाम असतो तो पुरेसा ठसत नाही हेदेखील त्याच वेळी होते. गाडय़ांच्या मागील काचेवर लिहिलेली वाक्य ही जीवनाभूती साहित्याचा एक थोर प्रकार असतो. त्याचा वापर अनेक ठिकाणी या चित्रपटात केला आहे. मात्र चित्रीकरणामध्ये ती दृश्यं सहजपणे न येता जाणीवपूर्वक येताना दिसतात. परिणामी ती खटकतात.

हलकेफुलके कथानक हा जरी या चित्रपटाचा सर्वात प्रभावी घटक असला तरी त्यातील नाटय़ पुरसे खुलवण्यासाठी हा मुद्दा पुरेसा पडत नाही. पटकथेच्या टप्प्यावर पात्रांच्या मांडणीत पुरेसा जीव न ओतल्याचा हा परिणाम म्हणता येईल. पण सर्व कलाकारांनी मात्र मनापासून केलेले काम जाणवते हे नक्की. मिथिला पारकरच्या आश्वासक चेहऱ्याचा सिनेमाकर्त्यांनी योग्य वापर केला आहे. पण तिच्या भूमिकेला आणखीन थोडा उठाव देणे शक्य झाले असते.

अर्थात, असे बरेवाईट अनेक मुद्दे असले तरी सद्य:स्थितीत वेबवरील मनोरंजनातील वेगळा प्रयोग म्हणून याकडे नक्कीच पाहता येईल. तुलनेने इतर सर्व प्रकारांत एका साचेबद्धपणे काम होत असताना या कथानकाचे वेगळेपण नक्कीच जाणवणारे आहे. काही ठिकाणी ते बालिश वगैरे पातळीवर जरी वाटले तरी इतर अनेक कथानकांमध्ये तार्किकतेची पुरती वाताहत केली जात असताना येथे एका किमान मर्यादेत दिलेला तार्किकतेचा बळी ग्राह्य़ ठरू शकतो. मात्र थोडे आणखीन परिश्रम घेतले असते तर नक्कीच आणखी चांगले काही तरी पाहायला मिळाले असते.

चॉपस्टिक्स

अ‍ॅप – नेटफ्लिक्स