News Flash

चित्ररंग : हसत खेळत ‘धडा’

मोठय़ांना जे जमत नाही ते कित्येकदा लहान मुले सहज करून जातात, हे वैश्विक सत्यवचन म्हणता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

मोठय़ांना जे जमत नाही ते कित्येकदा लहान मुले सहज करून जातात, हे वैश्विक सत्यवचन म्हणता येईल. त्याची अनुभूतीही आपण अनेकदा घेतलेली असते. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’मधून याची पुन:प्रचीती येते, पण इतकाच साधा-सरळ अर्थ असेल तर हा निपुणचा चित्रपट कुठला? सध्या आजूबाजूला एकूणच जो वैचारिक गोंधळाचा पसारा आहे तो पाहता याच मुलांच्या मनाची निरागसता पांघरून अरे काय चाललेय? छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा किती विपर्यास कराल?, असाच जाब विचारावासा वाटतो. अर्थात, हा पसारा दूर सारण्याची क्षमताही आपल्यातच आहे, याची जाणीवही चित्रपट सहजपणे करून देतो.

एका सोसायटीत गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने लहान मुलांचे नाटक बसवण्याची योजना आखली जाते. अनू मावशीची (वृषाली कुलकर्णी) कथा, हॉकिंग म्हणजे सुहृद (आकाश कांबळे) आणि शारवी (शारवी कुलकर्णी) यांचे नेतृत्व आणि सोसायटीतल्या मुलांचा उत्साह या सगळ्यांच्या अफलातून मिश्रणातून नाटकाची घडी बसणारच इतक्यात या नाटकात धार्मिकदृष्टय़ा काहीतरी चुकीचे दाखवले आहे, असा दावा करत चार-पाच गुंड येऊन तोडफोड करतात. सोसायटीच्या कार्यक्रमातील लहान मुलांचे एक छोटेखानी नाटक किती दंगा घडवू शकते, पण नाही ज्या त्या गोष्टीवर आपली मतांची पोळी भाजून घेण्याची सवय असलेले तथाकथित राजकारणी नेते विवेकालाच चूड लावतात. प्रसंग वरवर साधा दिसतो मात्र अशाच वेळी भूमिका घेणे गरजेचे असते. आणि अनेकदा तो अविवेकी दंगा नको, गोंधळ नको म्हणून मग ज्यांना काहीएक समजून घेण्याची बुद्धी आहे त्या सर्वसामान्यांनीच माघार घ्यावी म्हणजे शांतता आणि नसलेली सुव्यवस्था सांभाळली जाईल, असा शहाजोग सल्लाही व्यवस्थेकडूनच दिला जातो. या सगळ्या गोंधळात आपले नाटक नेमके का बंद पडले, याची उत्तरे मुले शोधत राहतात. त्यातूनही त्यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे परिस्थितीचे आकलन होते तेव्हा ते काहीएक ठोस भूमिका घेतात. मुलांनी दिलेला हा धप्पा मोठय़ांनाही जागे करतो. एका साध्याशा गोष्टीतून अनेक महत्त्वाचे विचार लेखक गिरीश कुलकर्णी आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी सहजपणे मांडले आहेत. आणि ही सहजता, निरागसतेतून आलेले शहाणपणच या चित्रपटाची ताकद आहे.

योग्य-अयोग्य गोष्टींचा कोलाज मांडताना सातत्याने गंभीर भूमिका घेण्याची, गहनपणे सांगण्याची काहीच गरज नसते. रोजच्या साध्या घटनांमधूनही हे सारासार विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवता येतात, हे या सहजसुंदर शैलीतील चित्रपटाने दाखवून दिले आहे. या चित्रपटातील बालकलाकारांची फौज, त्यांच्या प्रत्येक व्यक्तिरेखेची मांडणी आणि त्याअनुषंगाने केलेली कलाकारांची निवड दोन्ही गोष्टी उत्तम जमून आल्या आहेत. त्यामुळे पडद्यावर या बाललीला पाहताना आपण चित्रपट पाहतोय असे कुठेच जाणवत नाही. ही तुमच्या-आमच्या कोणाच्याही सोसायटीत घडणारी गोष्ट आहे असेच चित्रपट पाहताना वाटत राहते. त्यामुळे हसतखेळत का होईना मारलेला हा विचारांचा धप्पा मनाला अचूक ठिकाणी लागतो. सुहृदच्या भूमिकेतील आकाश कांबळेचा विशेष उल्लेख करायला हवा. त्याच्याबरोबरची सगळीच बालमंडळी शारवी कुलकर्णी, चेत्याच्या भूमिकेतील अक्षय यादव, मिहीर, दीपाली, ऋत्विक या सगळ्याच व्यक्तिरेखा अफलातून आहेत. मोठी कलाकार मंडळी त्या अर्थाने नावापुरतीच असली तरी त्या यादीतही इरावती हर्षे, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी, छाया कदम, ज्योती सुभाष, चंद्रकांत काळे, श्रीकांत यादव असे एकापेक्षा एक चांगले कलाकार असल्याने अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट कुठेच उणा पडत नाही. तसाच तो लेखन-दिग्दर्शनातही कुठेच कमी पडलेला नाही की काहीतरी वेगळे करतोय असा उसना आवही कुठे आणलेला नाही.

उत्तम आशयाची उत्तम मांडणी असलेला हा ‘धप्पा’ निखळ मनोरंजन करतानाच विविधतेत एकता म्हणून अभिमानाने मिरवणाऱ्या आपल्या सर्वाच्याच जगण्यातला विरोधाभासही दाखवतो. आणि काहीएक ठोस भूमिका घेण्याची गरजही ठामपणे व्यक्त करतो. हसताखेळता विचारांचे अंजन देणारा हा ‘धप्पा’ चुकवता उपयोगाचा नाही..

धप्पा

दिग्दर्शक – निपुण धर्माधिकारी

कलाकार – आकाश कांबळे, शारवी कुलकर्णी, अक्षय यादव, श्रीहरी अभ्यंकर, शर्व वढवेकर, दीपाली बोरकर, अभिजीत शिंदे, नील देशपांडे, वृषाली कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, इरावती हर्षे, सुनील बर्वे, ज्योती सुभाष, छाया कदम, चंद्रकांत काळे, उमेश जगताप, श्रीकांत यादव.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:41 am

Web Title: article on dhappa new marathi movie
Next Stories
1 दोन मित्र
2 वेबवाला : संयत आणि प्रभावी
3 अखेर चाहत्यांना पाहायला मिळणार सलमान-कतरिनाचं लग्न
Just Now!
X