मानसी जोशी

साधारण चार-पाच वर्षांपूर्वी ‘स्टार प्लस’ वाहिनीवर गाजलेल्या ‘ये रिश्ता क्या क हलाता है’ या मालिकेमुळे अक्षराची भूमिका साकारणाऱ्या हिना खानने प्रेक्षकांच्या मनावर आपली स्वतंत्र छाप पाडली होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मालिका सोडण्याचा निर्णय असो, अथवा ‘बिग बॉस’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये वादाला तोंड देत टिकून राहणे तसेच कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तिने केलेले पदार्पण या अनेक कारणांमुळे अभिनेत्री हिना खान हे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. टीव्हीपासून आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरू करणारी हिना वेब मालिका आणि आता रुपेरी पडद्यावरही झळकते आहे. आपल्या कामात सतत बदल आणि काही नवीन प्रयोग करत राहणे तिला मनापासून आवडते.

‘ये रिश्ता क्या केहलाता है’मधील अक्षराच्या भूमिकेने हिना खानने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.  या अभिनय प्रवासाविषयी हिना सांगते, की ‘मी ठरवून अभिनय क्षेत्रात आले नाही. मला पत्रकार व्हायचे होते. अपघातानेच मी या क्षेत्रात प्रवेश केला. ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ या मालिकेसाठी कलाकारांचा शोध सुरू होता. चंडीगडमध्ये कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली. मी शिकत असताना मैत्रिणीने मला याची माहिती सांगितली. या मालिकेसाठी दिल्लीमध्ये ऑडिशन दिल्यावर राजन शाह सरांनी मला मुंबईत बोलावले. तेथे माझी तीन ते चार लुक टेस्ट घेण्यात आली. आणि अक्षरासाठी माझी निवड झाली. सलग आठ वर्षे अक्षराची भूमिका निभावली. ती भूमिका मी अक्षरश: जगले. या आठ वर्षांच्या कालावधीत मालिकेच्या कथेत बदल झाले. एका काळानंतर अक्षराच्या भूमिकेला फारसा वाव उरला नव्हता. आणि माझ्या कामातही तोचतोचपणा येत होता. तसेच कलाकार म्हणून कामातही बदल अपेक्षित होते. म्हणूनच प्रसिद्धी आणि यश दोन्ही अमाप मिळत असतानाच मी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, असं ती सांगते. हे करणे माझ्यासाठी अत्यंत आव्हानात्मक होते, असे ती सांगते. कारण मी आर्थिकदृष्टय़ाही स्थिर होते. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत होता. मात्र, सगळे व्यवस्थित सुरू असताना हा निर्णय घेणे करिअरच्या दृष्टीने गरजेचे होते, असे तिने स्पष्ट केले.

मालिका संपल्यावर पुन्हा मालिका करण्यापेक्षा ती ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोच्या आठव्या भागात सहभागी झाली होती. या वेळेस तिने रिअ‍ॅलिटी शोच्या आठवणींना उजाळा दिला. ‘केकेके (खतरों के खिलाडी)द्वारे माझ्या मनातील भीती घालवायची होती. आजपर्यंत मी थरारक साहसी खेळ आणि स्टंट्स करेन असे वाटले नव्हते. ‘खतरों के खिलाडी’ या भागात नृत्य दिग्दर्शक शंतनू महेश्वरी विजेता ठरला आणि हिना खानने दुसरा क्रमांक पटकावला. कार्यक्रमात निया शर्मा, ऋत्विक धजनानी, रवी दुबे, करण वाही, गीता फोगट यांच्यासोबत सर्वोत्तम स्टंट्स कोण करतं आहे, यासाठी चुरशीची स्पर्धा लागायची, अशी आठवणही तिने सांगितली.

बहुचर्चित ‘बिग बॉस’च्या अकराव्या भागात हिना खानचे वेगळे रूप प्रेक्षकांनी पाहिले. यात तिचे आणि शिल्पा शिंदे यांचे जोरदार भांडण झाले होते. या कार्यक्रमाविषयी बोलताना ‘बिग बॉस’ हा संकलित केलेला कार्यक्रम असल्याचे हिनाने सांगितले. या कार्यक्रमात स्पर्धकांमध्ये वाद, भांडणे आणि टीका होतातच. त्यासाठी स्पर्धकांनी मानसिकदृष्टय़ा खंबीर असणे गरजेचे आहे. प्रत्येक स्पर्धक माझ्याइतकाच सक्षम असेलच असे नाही, असा सल्लाही हिनाने शोत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना दिला.

लवकरच ती ‘लाइन’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करते आहे. कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचे पोस्टर तिने प्रदर्शित केले होते. ‘कलाकाराला मालिकेतून चित्रपटात काम करताना चेहऱ्यावरील हावभाव, संवादफेक आणि अभिनय यावर मेहनत घ्यावी लागते’, हे सांगताना हिनाने चित्रपट आणि मालिकेतील अभिनयाचे तंत्र, पद्धत यातील फरक अधोरेखित केला. ‘एकाच वेळेस कलाकार दूरचित्रवाणी आणि चित्रपटात काम करू शकत नाही. कारण मालिकेत तुम्हाला दररोज सर्वोत्तम काम करणे गरजेचे असते. याचबरोबर मालिकेत चेहऱ्यावरील भाव अधिक उत्कटतेने दाखवावे लागतात. याउलट चित्रपटात कलाकाराला कॅमेऱ्यासमोर भाव दाखवताना चेहऱ्यावर  नियंत्रण ठेवावे लागते.  मी चित्रपट आणि वेब मालिकेत काम करताना अभिनय आणि चेहऱ्यावरील हावभाव या गोष्टींवर काम केले आहे. यासाठी आजही रोज चेहऱ्याचे व्यायाम करत असल्याचे ती नमूद करते.

लुकची चर्चा

२०१९ हे वर्ष हिना खानसाठी चांगले ठरले. ‘यूके वीकली’ संस्थेने जाहीर केलेल्या सर्वात सेक्सी पन्नास आशियाई महिलांच्या यादीत तिने स्थान पटकावले. यात निया शर्मा, शिवांगी जोशी, आणि सुरभी चंदना या अभिनेत्रींचाही समावेश आहे. मे महिन्यात तिने कान चित्रपट महोत्सवात पदार्पण केले. जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या कान चित्रपट महोत्सवात तिच्या लुकची जास्त चर्चा झाली. या वेळेस एका पत्रकाराने तिच्यावर टीकाही केली होती. ‘एखादा कलाकार कानसारख्या चित्रपट महोत्सवात पदार्पण करण्यासाठी उत्सुक असतो. यासाठी त्याने घेतलेल्या मेहनतीची इतरांना कल्पना नसते. अशा वेळेस तुमच्यावर टीका झाल्यास अत्यंत वाईट वाटते, असेही हिनाने सांगितले.

ओटीटी हे नवे माध्यम

नुकतीच तिची ‘हंगामा’वर ‘डॅमेज २’ ही वेब मालिका आली असून यात तिने अध्ययन सुमनसोबत काम केले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे भविष्य आहे. ‘याआधी चित्रपट आणि टीव्ही ही दोनच माध्यमं होती. मात्र आता ओटीटी प्लॅटफॉर्म हे नवीन माध्यम उदयास येत आहे. यामुळे नवीन कार्यक्रमांची निर्मिती होते आहे. सायंकाळी घरी गेल्यावर प्रेक्षकांना टीव्हीऐवजी सर्व मोबाइलवर उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही कार्यक्रम पाहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असल्याने कलाकारांमध्येही सर्वोत्तम काम करण्याची चुरस वाढली आहे, असे मत हिना खानने व्यक्त केले.