पंकज भोसले

स्वस्तातल्या स्वस्तात चित्रपट बनवून निव्वळ तगडय़ा कल्पनेच्या आधारावर प्रेक्षकांमध्ये खळबळ माजविणारी चित्रकर्त्यांची पिढी दोन हजारोत्तर काळात अधिकाधिक निपजली. या काळात काहीशे डॉलरमध्ये बनलेले वैशिष्टय़पूर्ण चित्रपट निव्वळ कौतुकाचे धनी ठरले नाही, तर जागतिक तिकीटबारीवर कोटय़वधी रुपयांची उलाढाल त्यांनी केली. ‘पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी’, ‘गिफ्ट’, ‘पर्ज’, ‘सिनिस्टर’, ‘अपग्रेड’, ‘क्रीप’सारख्या भय-थरार चित्रपटांच्या निर्मितीमध्ये केवळ चांगली कल्पना म्हणून आर्थिक पाठबळ पुरवणारे ब्लुमहाऊस प्रॉडक्शन अलीकडे प्रकाशझोतात येऊ लागले आहे. या चित्रनिर्मिती केंद्राच्या ‘व्हिपलॅश’ आणि ‘गेटआऊट’ या दोन्ही भिन्न प्रकृतीच्या कलात्मक चित्रपटांनी अफाट नाव कमावले. त्यामुळे आता सिनेसाक्षर प्रेक्षकांकडून नामांकित स्टुडिओजच्या चित्रपटांइतकीच या चित्रसंस्थेच्या निर्मितीकडे लक्ष असते. शरीरामध्ये रोबोटिक यंत्रणा बसवून नायकाला सुपरहिरोक्षम ताकद पुरवण्याची कल्पना मांडणारा ‘अपग्रेड’, अत्यंत साध्या घटनांमधून भयपाठलागाचा विलक्षण प्रकार साधणारा ‘क्रीप’ आणि एका छिन्नमनस्क व्यक्तीच्या तब्बल २४ भंगलेल्या अवस्था दाखविणारा (मनोज नाइट शामलनचा) ‘स्प्लीट’ हे ब्लुमहाऊस प्रॉडक्शनचे या दशकातील चित्रपट आवर्जून अनुभवावे असे आहेत. या सर्व चित्रपटांचा आशय भिन्न -भिन्न असला, तरी वैशिष्टय़पूर्ण हाताळणीमुळे तयार झालेली पाहणीयता हा गुण समान आहे. विज्ञान-तंत्रज्ञान मदतीने हाणामाऱ्यांचे ब्लॉकबस्टर चित्रपट अमेरिकेत शेकडय़ांनी बनले आहेत. पण ‘अपग्रेड’मधील हाणामारीचा वेग आणि कल्पकता ही त्या ब्लॉकबस्टर चित्रपटांतील दृश्यश्रीमंतीपेक्षा वेगळा परिणाम साधते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या मैत्रीपर्वातही भयकारक नाती निर्माण कशी होऊ शकतात, याचे दचकवणारे दर्शन ‘क्रीप’मध्ये पाहायला मिळते. तर ‘स्प्लीट’मधील छिन्नमनस्क व्यक्तिरेखांचा अभिनय सोहळा चित्रपटभर गुंतवून ठेवतो.

ब्लुमहाऊस प्रॉडक्शनच्या वेगवान चित्रताफ्यात ‘स्वीटहार्ट’ या नावापासून चकवा निर्माण करणाऱ्या राक्षसपटाची ताजी भर पडली आहे. वर्षांच्या आरंभी अमेरिकी महोत्सव वर्तुळापुरता मर्यादित असलेला हा चित्रपट गेल्या आठवडय़ापासून ऑनलाइन वितरणात उपलब्ध झाला आहे. यातील कथानकात जहाजाला झालेल्या अपघातामुळे मुख्य व्यक्तिरेखेची एका निर्जन आणि दुरस्थ बेटावर रवानगी होते. त्यामुळे हा चित्रपट एकांतभयाची किंवा एकांतसाहसाची परिचित वळणे घेणार, अशी वातावरणनिर्मिती करण्यात सुरुवातीला यशस्वी होतो; अन् मग प्रेक्षकांच्या आडाख्यांना तडाखे मारत पुढे सरकू लागतो.

अभिजात कलाकृती म्हणून ओळखल्या गेलेल्या रॉबिन्सन क्रूसोच्या बेटावरील २८ वर्षांच्या विजनवासाच्या कथावृक्षाला तीन शतकांत ‘ब्लू लगून’, ‘लॉर्ड ऑफ फ्लाईज’, ‘लाइफ ऑफ पाय’सारख्या फांद्या फुटल्या. देशोदेशीच्या लोककथांमध्ये निर्जन बेटांवर अडकलेल्या व्यक्तींच्या गोष्टी आहेत. अमेरिकी चित्रकर्त्यांनी या कलाकृतीवर चित्रपट केलेच; पण ‘कास्ट अवे’सारख्या चित्रपटातून आधुनिक काळातील रॉबिन्सन क्रूसोची गोष्टही मांडली. ‘स्वीटहार्ट’ पाहताना या सिनेमा/कलाकृतींची आठवण येणे स्वाभाविक आहे. चित्रपटाला आरंभ होतो तो जहाज अपघातातून बचावलेल्या आणि एका निर्जन बेटाच्या किनाऱ्यावर वाहून आलेल्या जेन (किअर्से क्लेमन्स) या इथल्या प्रमुख व्यक्तिरेखेपासून. तिच्यासोबत जहाजातील वाहून आलेली आणखी एक व्यक्ती किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर झालेल्या विचित्र जखमेमुळे गतप्राण होते. आता समोर समुद्रगाज आणि बेटावरचा निवांत निसर्ग यात एकटेच धडधाकट असल्याची जाणीव जेनला स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा स्थिर करायला लागते. संपूर्ण बेटाची छाननी करून झाल्यानंतर जेनची जगण्याची धडपड आधुनिकतेकडून आदिमतेकडे प्रवास करू लागते. दगडांपासून नारळ तोडण्यापासून ते आग तयार करण्यापर्यंत, किनाऱ्यावर आलेल्या माशांना पकडून भाजून खाण्यापर्यंत आपल्या एकांतपणाशी तिची लढाई सुकर होते. रात्र पडल्यानंतर मात्र वेगळ्याच आव्हानाचा तिला सामना करावा लागतो. मानवासारखा दोन पायांवर चालणारा आणि समुद्रात असलेल्या कृष्णविवरात राहणारा राक्षस भक्षशोधार्थ बेटावर वावरत असतो. त्याने बेटावर सहलीसाठी आलेल्या माणसांना मारल्याच्या खुणाही तिला सापडतात. या राक्षसाचे अस्तित्व उमजल्यानंतर जेन उपलब्ध सामग्रीतून सुरक्षेचे कवच आपल्याभोवती धारण करायला लागते.

निम्मा-शिम्मा चित्रपट ‘कास्ट अवे’सारखा संवादहीन सुरू राहतो. समुद्री गाज, पक्ष्यांचा ध्वनी यांमध्ये जेनचे रात्रीच येणाऱ्या राक्षसापासून बचावासाठीच्या केल्या जाणाऱ्या क्लृप्त्यांच्या कार्यवाहीचा आवाज यांचीच काय ती भर राहते. पुढे ती ज्या जहाज अपघातामधून भरकटून आलेली असते, त्यातून बचावलेले आणखी दोघे बचावबोटीद्वारे किनाऱ्यावर येतात. समुद्री राक्षसाशी सामना करून त्याच्या ताकदीची कल्पना आलेल्या जेनला या दोघांच्या सुखरूप येण्याने आनंद होतो. त्यांना तातडीने बेट सोडून दूर निघण्याची ती विनवणी करते. पण तिथल्या निसर्गसौंदर्यावर ते भाळतात आणि आरामासाठी तिथे मुक्कामाचा निर्णय घेतात. जेन सांगत असलेली समुद्री राक्षसाची गोष्ट निव्वळ भाकडकथा असल्याची समजूत करून घेऊन ते दोघे जेनला बंधक बनवितात. एकांतामुळे जेनवर मानसिक परिणाम झाला असल्याचा अर्थ लावतात. रात्र झाल्यानंतर राक्षसी कारवाईस आरंभ होतो. समुद्री राक्षस या संकल्पनेची खिल्ली उडविणाऱ्यांपैकी पहिला बळी जातो. राक्षसाच्या भक्षात लवकरच दुसऱ्याचाही क्रमांक लागतो. मग पुन्हा एकटी पडलेली जेन राक्षसाशी लढण्याच्या निर्धाराने सज्ज होते.

किअर्से क्लेमन्स या अभिनेत्रीने जेनची रांगडी भूमिका समरसून केली आहे. कथानकाचा बराच काळ समुद्री राक्षसाची छबी कॅमेऱ्यापासून अलिप्त राखून दिग्दर्शक जे. डी. डिलार्ड यांनी उत्तम भयपरिणाम साधला आहे. मॉन्स्टर मूव्हीजच्या आपल्या डोक्यात बसलेल्या पारंपरिक संकल्पनांनाही या चित्रपटामुळे तडे जाऊ शकतात. पर्यावरणाचा ऱ्हास, आधुनिक जगण्यातला निर्थकपणा, एकांतातील सुख असले फोलपट संदेश आडबाजूने मांडण्याचा या चित्रपटाचा कोणताही हेतू नाही. प्रेक्षकांसमोर निव्वळ जोरकस थरार तयार करण्याची चित्रकर्त्यांची महत्त्वाकांक्षा आहे, अन् ती बऱ्यापैकी पूर्णही झालेली आहे.