रेश्मा राईकवार

काही गोष्टी, काही नाती अनाकलनीय असतात, अनवट असतात. तर्काच्या कसोटीवर कितीही घासलं तरी त्याचा अर्थ लागत नाही, केवळ भाव उमगतो आणि तो कायम जपून ठेवावासा वाटतो. ‘दरबान’ची गोष्ट ही अशा अनवट नात्याची आहे. ‘झी ५’वर प्रदर्शित झालेला बिपिन नाडकर्णी दिग्दर्शित ‘दरबान’ हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवर आधारित आहे. त्यांच्या कथेतला गहिरेपणा या चित्रपटातही पुरेपूर उतरला आहे. या कथेतला काळ हा सत्तरच्या दशकातला आहे, या काळाचा संदर्भही चित्रपटाला एक वेगळेपणा देऊन जातो, अर्थात या कथेतला जो भाव आहे तो कालातीत आहे आणि म्हणून आजही आपण त्याच्याशी सहज जोडले जातो.

उत्तर प्रदेशातील धनबादमध्ये १९७१च्या सुमारास घडणारी ही गोष्ट आहे. देशभरातील कोळसा खाणींना सरकारच्या पंखाखाली घेण्याचा निर्णय इंदिरा गांधी यांच्या सरकारने घेतला होता. हा संदर्भ या कथेला आहे. नरेन त्रिपाठी (हर्ष छाया) यांची कोळशाची खाण या निर्णयामुळे धोक्यात आली आहे. व्यवसायच धोक्यात आल्याने पिढीजात वाडा सोडून त्रिपाठी कु टुंब दुसरीकडे स्थलांतरित होतं. पण हे सगळं सोडून जाण्याआधी एक नातं तिथे घट्ट रुजलेलं असतं ते मात्र कायम राहातं. त्रिपाठी यांच्या वाडय़ात अनेक नोकरचाकर आहेत, मात्र त्यांचं पान रायचरणशिवाय हलत नाही. आणि रायचूशिवाय त्रिपाठींचा छोटा मुलगा अनुकूलचं विश्व पूर्ण होत नाही. कुमारवयीन रायचूवर छोटय़ा अनुकूलला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडते, त्याला बाबागाडीतून फिरवण्यापासून या दोघांच्या नात्याची सुरुवात होते. एकत्रच मोठय़ा झालेल्या रायचू आणि अनुकूलचं नातं अगदी घट्ट आहे आणि तितकं च समंजसही आहे. त्यामुळे त्रिपाठी कु टुंबाने घर सोडल्याचा निर्णय घेतल्यानंतर हे दोघेही वेगवेगळे होतात, पण तुटून पडत नाहीत. काळाचं चक्र सुरूच राहातं आणि एका नव्या टप्प्यावर या दोघांची पुन्हा भेट होते. या वेळी अनुकूलचा मुलगा सिद्धू याला सांभाळायची जबाबदारी रायचूवर येते. पुन्हा एकदा बंध तसेच जुळतात, मात्र नियती या नात्यासाठी काही तरी अघटित लिहून जाते. या अघटिताने रायचूचे अवघे आयुष्य बदलून जाते.

प्रेम आणि त्याग-समर्पणाची ही गोष्ट इतक्या सहज पद्धतीने आपल्यासमोर येते की थेट काळजाचा ठाव घेते. रायचूचा प्रामाणिकपणा, त्याचा साधा सरळ आणि प्रेमळ स्वभाव, याच स्वभावाने घट्ट नाती जोडणाऱ्या रायचूच्या आयुष्यात एका अघटिताने घडलेली उलटापालट, त्यातून आलेली असाहाय्यता आणि तरीही एक आयुष्य त्याच प्रेमाने वाढवणारा, त्याच प्रेमापोटी त्याग करणारा रायचू आपली पकड घेतो. रायचूच्या आयुष्यातील अनेक बारीकसारीक कं गोरे दिग्दर्शक बिपिन नाडकर्णी यांनी खूप प्रभावीपणे रंगवले आहेत. कथेचा प्रवाहीपणा चित्रपटातही त्याच पद्धतीने येतो. दिग्दर्शक म्हणून बिपिन यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे, याआधी त्यांनी ‘उत्तरायण’सारखा उत्तम मराठी चित्रपट दिला आहे. ‘दरबान’ पाहताना त्यांच्या वेगळ्या दिग्दर्शन शैलीची जाणीव होते. चित्रपटात निवडकच व्यक्तिरेखा आहेत. ढोबळमानाने पाहायला गेलं तर पूर्वार्धात रायचू आणि अनुकूलचं नातं, तर उत्तरार्धात रायचू आणि सिद्धू किंवा छोटे बाबू हे नातं रंगवलं आहे. पण खऱ्या अर्थाने ही कथा रायचूचीच आहे, त्यामुळे संपूर्ण चित्रपट याच व्यक्तिरेखेच्या खांद्यावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आणि रायचूची भूमिका करणाऱ्या अभिनेता शरीब हाश्मी यांनी तो तितक्याच समर्थपणे पेलला आहे. छोटय़ा भूमिकांसाठी का होईना चांगल्या कलाकारांची केलेली निवड हीसुद्धा या चित्रपटाची एक जमेची बाजू आहे. इतक्या सुंदर कथेला संगीतकार अमर्त्य बोबो राहूत यांच्या श्रवणीय संगीताची जोड मिळाली आहे. खूप काही वेगळे देण्याचा प्रयत्न या चित्रपटात नाही, त्याउलट मानवी नात्यांतील गुंतागुंत हळुवारपणे उलगडणाऱ्या या कथेतला भाव चोख पोहोचवायचे काम दिग्दर्शकाने आपल्या सहज मांडणीतून के ले आहे. रवींद्रनाथ टागोरांची सत्तरच्या दशकांत सांगितलेली ही कथा आजही आपल्याला अस्वस्थ करते, धरून ठेवते, हेच या चित्रपटाचे खरे यश आहे.

दरबान

दिग्दर्शन – बिपिन नाडकर्णी

कलाकार – शरीब हाश्मी, रसिका दुग्गल, शरद के ळकर, फ्लोरा सैनी.