नीलेश अडसूळ

महेश कोठारे, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या त्रयीसोबत एक नाव आवर्जून जोडले जाते ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षां उसगावकर. आजवरचे त्यांचे ग्लॅमरस रूप आपल्याला परिचित आहेच, पण त्यापलीकडे जाऊन एका कर्तव्यदक्ष, कुटुंबप्रिय आणि ग्रामीण पण मातब्बर स्त्रीच्या रूपात त्या पहिल्यांदाच आपल्याला भेटणार आहेत. स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा वर्षां उसगावकर सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मड्डम सासू दढ्ढम सून’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकांमधूनही त्यांनी याआधी सासूची भूमिका साकारली आहे; परंतु कोल्हापूरच्या घरंदाज सासूचा अंदाज दाखवणारी ही भूमिका त्यांच्या आजवरच्या प्रवासाला कलाटणी देणारी ठरेल.

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
ग्रामविकासाची कहाणी

तब्बल दहा वर्षांपूर्वी याच वाहिनीवर वर्षां यांनी ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेत डॅशिंग सासू साकारली होती. त्यानंतर थेट आता त्या मालिकाविश्वात पुन:पदार्पण करीत आहेत. ‘मालिका नवीन असली तरी निर्माते आणि वाहिनी तीच आहे याचा मला आनंद आहे. चित्रपटांच्या तुलनेने मालिका मी मोजक्याच केल्या, पण त्या करताना मला घराघरांत पोहोचल्याचा आनंद मिळतो. त्या तुम्हाला काही मूल्ये देऊन जातात. चित्रपट मोठा असला तरी तो प्रत्येक गृहिणीपर्यंत पोहोचतोच असे नाही; पण मालिका मात्र मनामनांत पोहोचते म्हणून चांगल्या संहितेला कायमच माझा होकार असतो,’ असे त्या सांगतात. मालिकेतील पात्रांचे मुलींकडून, महिलांकडून अनुकरण केले जाते. त्यांचे तकिया कलाम गिरवले जातात. याच प्रवाहात माझेही पात्र आले तर मला नक्कीच आवडेल, असेही त्या म्हणाल्या.

पात्रांच्या वेगळेपणाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘प्रेक्षकांना आपलेसे करणे हे आव्हान असते आणि सातत्याने नवनवीन भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणे ही कलाकाराची जबाबदारी असते. ती जबाबदारी स्वीकारायला कायमच मला आवडते. लेखकांचे पात्र सत्यात आणण्यासाठी कलाकारांचा कस लागतो. ते सत्यात आले तर लेखकाच्या लेखणीला न्याय मिळेल, अन्यथा कागदावरचे पात्र आणि प्रत्यक्षात आलेले पात्र यांच्यात गल्लत झाली तर कलाकार म्हणून आपण कमी पडतो.’ काळासोबत बदलणाऱ्या मालिकांचा हिस्सा म्हणून वर्षां यांची शिदोरी अगदी भक्कम आहे. त्या शिदोरीतील अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, ‘कलासृष्टी झपाटय़ाने बदलली. वाहिन्या वाढल्या. दूरदर्शन, होम टीव्ही अशा वाहिन्यांवर तेव्हा मालिका लागत असत. त्यातही मी काम केले आहे; परंतु तेव्हा याला इतके व्यापक स्वरूप प्राप्त होईल असे वाटले नव्हते. आज घराघरांतील टीव्ही हे सिनेमाइतकेच ताकदीचे माध्यम झालेले आहे. तितकीच औपचारिकता इथल्या कामामध्ये आली आहे. पात्रांचे पोशाख, त्यांची शैली, ती पोहोचवण्याची पद्धत, त्यांचा वेगळेपणा या सगळ्या गोष्टींवर भरपूर मेहनत घेतली जाते. त्यामुळे हे माध्यम मला चित्रपटाइतकेच महत्त्वाचे वाटते.’

वर्षां यांनी चित्रपटात केलेले काम स्मरणीय आहे. त्यातही ‘दुनियादारी’ चित्रपटात केलेले काम आजच्या पिढीच्या चांगलेच लक्षात राहिले आहे. त्यानंतरही त्यांनी अनेक चित्रपट केले, पण दुर्दैवाने त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.  ‘झाशीची राणी’ ही भूमिका माझ्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. भूमिका केवळ अभिनयातून नाही तर अभ्यासातून घडत जाते याची तेव्हा जाणीव झाली. विविध पुस्तके, इंग्रजी लेखकांनी लिहून ठेवलेले त्यांचे वर्णन हे वाचून मी भारावून गेले. त्यांचा पेहराव, नवरा जाण्याचे दु:ख, मुलाचा वियोग, दत्तक पुत्र या पार्श्वभूमीचा अंदाज घेऊन मी ती भूमिका साकारली. जीवनाची अनमोल मूल्ये या भूमिकेने मला दिल्याचे त्यांनी नमूद केले.

कोल्हापुरातील प्रथितयश घराण्यातील ही कथा आहे; परंतु मालिकेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. श्रीमंत घरात वाढलेली नंदिनी एका गरीब पण कर्तबगार मुलाशी लग्न करते आणि दोघे मिळून नंदिनी गृहउद्योगाची सुरुवात करतात. त्याच उद्योगातून यश मिळवलेल्या नंदिनी शिर्के आज एका प्रथितयश कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुनांवर धाक, गावात रुबाब अशा नंदिनीचा मुलगा परदेशातून परततो आणि घरातल्या मोलकरीण मुलीसोबत तिचे सूत जुळतात. पुढे तिचे आणि त्याचे लग्नही होते; परंतु ते इतके सहजासहजी होणार नाही. त्यात बरेच चढउतार, ट्विस्ट येत जातील. तेच पाहण्यासाठी १७ ऑगस्टपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका रात्री ९.३० वाजता सज्ज होत आहे.

नवी पिढी आदर्शवत

आम्हीही भरपूर काम केले, पण नवी पिढी प्रचंड ऊर्जा घेऊन आली आहे. रात्री उशिरापर्यंत चित्रीकरण करून पुन्हा ते पहाटे चित्रीकरणासाठी तयार असतात. एवढय़ावर ते थांबत नाहीत, तर नाटक, चित्रपट आणि इतरही गोष्टींत योगदान देत असतात. एवढेच नाही तर प्रकाश, रंगभूषा, वेशभूषा यांचाही अभ्यास ती करून आलेली आहेत. एकदा चित्रीकरण सुरू असताना माझ्या सहकलाकाराने अचानक मला थांबवले आणि म्हणाला, ‘तुम्ही थोडय़ा दूर उभ्या राहाल का, तुमची सावली दृश्य देताना मध्ये येते आहे.’ हे ऐकल्यावर काही क्षण मला वाईट वाटले, पण नंतर नव्या पिढीला असलेल्या सजगतेचे कौतुक वाटले. अभिनयासोबतच प्रकाश, संगीत यांचे भान ठेवून ते काम करतात. तर तरुण दिग्दर्शकही मालिका अधिकाधिक सजीव आणि नैसर्गिक कशा होतील यावर भर देत आहेत. जागतिक सिनेमा आज त्यांच्या हातात आलेला असल्यामुळे कदाचित तांत्रिकदृष्टय़ाही या मुलांचे काम हॉलीवूडकडे जाणारे आहे.