तसं बघायला गेलं तर तो सहाशे कोटींचा दिग्दर्शक म्हणायला हवा.. आत्तापर्यंत शंभर, दोनशे आणि त्यापुढचे कोटी क्लब हे आघाडीच्या नायकांवरून ओळखले जात होते. चित्रपटांची कोटय़वधींची कमाई करण्याची जबाबदारी ही फक्त त्या हिरोवर असायची. आता मात्र गेले ते दिन गेले.. नायकच नाही तर चित्रपटाचं दिग्दर्शन कोण करतं आहे, यावरही यशापयशाचे आराखडे ठरू लागले आहेत. त्यामुळे कलाकारांना जशी चित्रपटांची निवड करावी लागते आणि चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत त्यांचं चित्त थाऱ्यावर नसतं. तीच अवस्था दिग्दर्शकांचीही होऊ लागली आहे. काही कोटींच्या या निर्मितीचा ताण घेऊन चित्रपट दिग्दर्शनाचं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान दोनदा अनुभवणारा आणि दोन्ही वेळेला तीनशे कोटींपर्यंत मजल मारणारा दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणूनच वेगळा ठरला आहे. ‘सुलतान’ हा सलमान खानबरोबरचा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाने विक्रमी कमाई केली आणि सलमानच्या ‘एक था टायगर’चा सिक्वल अलीच्या पदरात टाकला. यशस्वी चित्रपटाच्या सिक्वलचं हेही आव्हान अलीने सुपरहिट देऊन पूर्ण केलं आहे. सध्या या यशाचा आनंद साजरा करत असला तरी आत्ता कुठे सगळ्या गोष्टी सर्वसामान्य वाटायला लागल्या आहेत, ही त्याची भावनाच त्याच्यावर किती ताण होता याची कल्पना देऊन जाते. ‘टायगर जिंदा है’ चित्रपटासाठी दिग्दर्शनाची संधी मला मिळाली खरी.. पण त्याचा आधीचा चित्रपट हा सलमान खानच्या कारकिर्दीला वळण देणारा सुपरिहट चित्रपट होता. त्यातल्या दोन्ही व्यक्तिरेखा टायगर आणि झोया याही प्रस्थापित आणि लोकप्रिय झाल्या होत्या. त्यामुळे सिक्वल करताना आधीच्या चित्रपटाचा काहीच संदर्भ न घेता केवळ या दोन व्यक्तिरेखांना नवीन कथा देत त्या पुढे न्यायच्या होत्या. शिवाय, सिक्वलसाठीची कथा आम्ही जी लिहिली होती ती अ‍ॅक्शनने भरलेली असल्याने अर्थातच निर्मितीचा खर्चही तितकाच मोठा होता. निर्मितीचा खर्च, दिग्दर्शनाचं आव्हान आणि सुपरहिटचं दडपण या सगळ्या गोष्टींचं मानगुटीवर बसलेलं भूत आता या यशामुळे उतरलं असल्याने आता आजूबाजूचं जग पूर्वीसारखं सर्वसाधारण वाटतंय, असं अली म्हणतो. अली अब्बास जफर हे नाव बॉलीवूडला नवीन नाही. अलीची सुरुवात साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनच झाली तेही यशराज प्रॉडक्शनबरोबर.. याच बॅनरखाली त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला होता तो म्हणजे ‘मेरे ब्रदर की दुल्हन’. या चित्रपटाच्या वेळी यश चोप्रा होते. त्यांना जेव्हा कथा ऐकवली तेव्हा त्यांनी तातडीने होकार दिला, पण त्यांची एकच अट असायची. कथा कुठलीही असेल, कशीही असेल त्यात भारतीय संस्कृती, मूल्यं ओतप्रोत भरलेली असली पाहिजेत. त्यांचा हा सल्ला नाही तर आग्रह  असायचा आणि तो मी कायम लक्षात ठेवत आलो आहे, असं तो सांगतो. ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ आणि ‘गुंडे’ या त्याच्या दोन्ही दिग्दर्शकीय चित्रपटांनी फार मोठं यश मिळवलं नाही. मात्र तिसऱ्या प्रयत्नात ‘सुलतान’च्या रूपाने ते साध्य झालं आणि लागोपाठ ‘टायगर जिंदा है’मुळे दुहेरी यशाचा आनंद तो सध्या घेतो आहे. या दोन्ही चित्रपटांनी आज बॉलीवूडमध्ये त्याला फार उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अगदी तरुण वयात ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांचा दिग्दर्शक ही त्याची नवी ओळख बनली आहे, याची त्याला कल्पना आहे. याबद्दल तो वेगळा विचार मांडतो. सचिन तेंडुलकरनेही     अगदी तरुण वयात विक्रमी कामगिरी केली पण म्हणजे ते एकाच प्रयत्नात त्याला साध्य झालं असं नाही. त्याच्यामागे त्याची काही वर्षांची अथक मेहनत कारणीभूत आहे. मला वाटतं आपण कठोर मेहनत घ्यायला हवी, चित्रपटांच्या बाबतीत बोलायचं झालं तर दिग्दर्शकांनी कथेवर मेहनत घ्यायला हवी, असं त्याचं म्हणणं आहे. ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशस्वी ठरला याचाच अर्थ मला जे लोकांना सांगायचं होतं ते त्यांच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचलं आहे, असे म्हणणारा अली चित्रपटाच्या यशाचं श्रेय प्रेक्षकांना देतो, त्यांच्यामुळे अजूनही चित्रपटाचं कलेक्शन सुरू असल्याचं तो नमूद करतो.

सलमान खानबरोबर दोन सुपरहिट चित्रपट दिले असल्याने त्याच्याबरोबर आपलं एक घट्ट नातं झालं आहे हे तो मानतो. मात्र दिग्दर्शक म्हणून आपल्या यशासाठी तो निर्माता आदित्य चोप्राचा विश्वास जास्त महत्त्वाचा होता, असं सांगतो. इतका मोठा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी माझ्या हातात दिला. इतकंच नाही चित्रपट कशा पद्धतीने करायचा हे ठरवायचं स्वातंत्र्यही दिलं. सलमान हा मोठय़ा भावासारखा आहे, पण आदित्य चोप्राचा पाठिंबाही तितकाच भक्कम आहे, हे सांगताना कतरिनाचं तो भरभरून कौतुक करतो. कतरिनाबरोबर मी ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटासाठी काम के लं होतं. ती खूप मेहनती कलाकार आहे. या चित्रपटासाठी तिने जी मेहनत घेतली आहे त्याला तोड नाही. चित्रपटातली सगळ्या अ‍ॅक्शनदृश्यांत ती भाव खाऊन गेली आहे आणि प्रेक्षकांनीही तिचं कौतुक केलं आहे. मला वाटतं आम्ही या चित्रपटासाठी सगळ्यांनीच जी मेहनत घेतली ती पडद्यावर पुरेपूर उतरली आहे. त्यामुळेच हा चित्रपट इतका यशस्वी ठरला, असं तो सांगतो. चित्रपट यशस्वी होवो न होवो.. प्रत्येक चित्रपटाबरोबर दिग्दर्शक म्हणून आपली जबाबदारी वाढतेच. तशी ती आत्ताही वाढली आहे असं सांगणारा हा तरुण दिग्दर्शक सध्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीत गुंतला आहे. त्याचा सलमानबरोबरचा तिसरा चित्रपट आकाराला येतो आहे. मात्र आता प्रत्येक चित्रपटाबरोबर नवं काही करून पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत, असं अली म्हणतो. त्याच्या या नव्या चित्रपटाकडे बॉलीवूडजनांचंही लक्ष असणार यात शंका नाही.

  • चित्रपटासाठी कथा-पटकथा जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही त्याच्यावर योग्य पद्धतीने काम केलं असेल तर तुमची ऐंशी टक्के कामगिरी तिथेच फत्ते होते. त्यात जर तुमच्या कथेला सलमान खानसारखा सुपरस्टार मिळाला तर मग आज तुम्ही पाहताच आहात त्याचं फलित काय आहे ते.. पण केवळ पटकथाच नाही. तर दिग्दर्शन चोख असायला हवंच.
  • चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाच्या यशात मोठी भूमिका बजावतो. ट्रेलरमधून आपल्या चित्रपटाची कथा उलगडू द्यायची नाही. मात्र चित्रपटात काय असेल याची झलक त्यातून प्रभावीपणे दिसली पाहिजे. कुठल्याही गोष्टीबद्दलचा पहिला प्रभाव पाहणाऱ्यावर परिणाम करतो. त्यामुळे ट्रेलर त्या पद्धतीने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेणारा हवा.
  • माणुसकीपेक्षा जगात कुठलीही गोष्ट मोठी नाही. आपल्या देशाची संस्कृती अशी आहे की आपण शत्रूही दारात आला तरी त्याला पहिल्यांदा पाणी विचारतो. ‘टायगर जिंदा है’मध्ये तर दहशतवादासारखा गंभीर विषय आहे. त्याच्याशी लढायचं तर सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं. आपण माणुसकीला जास्त महत्त्व देतो, आपली मूल्यव्यवस्था माणुसकीच्या तत्त्वावरच आधारलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे पाहताना त्याच भूमिकेतून पाहायला हवं. शेवटी जे योग्य आहे तेच समोर मांडलं पाहिजे, जी चुकीची गोष्ट आहे त्याचं कोणीही समर्थन केलं तरी ती चुकीचीच आहे. आणि हे ‘टायगर जिंदा है’मधून त्याच सहजतेने मांडण्याचा प्रयत्न केला जो प्रेक्षकांना भावला.