– श्रीराम ओक

शहरीकरण आणि ग्रामीण जीवन यावर जेव्हा-जेव्हा चर्चा होते, तेव्हा दोन्ही बाजूची मंडळी कायमच हिरिरीने या चर्चेत सहभागी होतात. शहरातील माणूस आधुनिक तंत्रज्ञानाचे गुणगाण गात असतानाच आवर्जून वाहतूकव्यवस्थेबद्दलही बोलतो. तर दुसऱ्या बाजूला ग्रामीण भागातील माणूस तेथे जपलेले माणूसपण, मिश्किलपणाबद्दल बोलत असतानाच अनेक अडीअडचणी देखील सहजतेने सांगतो. या दोन्हीकडच्या मानवी प्रवृत्तींमध्ये जमीन-आसमनाचा फरक असला, तरी जेव्हा आपण ग्रामीण भागात जातो, तेव्हा-तेव्हा तेथील हवा आपल्या जीवनात आनंददायी बदल घडवते. आपल्या वागण्यातही थोडा मोकळेपणा येतो. हाच आनंद, निखळपणा, अनुभवता येतो, तो ‘तऱ्हा एका गावाची’ या दीर्घाकांतून.

वानरवाडी नावाच्या गावात एक घटना घडते आणि त्या घटनेतून त्या गावातील विविध व्यक्तिमत्त्व पात्र रूपात रंगमंचावर अवतरतात. गझलकार, कवी अनिल कांबळे यांच्या प्रेरणा आर्ट फाउंडेशनतर्फे या दीर्घाकाचे सादरीकरण शनिवारी (२८ एप्रिल) सायंकाळी सात वाजता एस. एम. जोशी फाउंडेशन येथे होत आहे.

वानरवाडी येथील पुढारी बाबुराव खाटपे याचा मृत्यू होतो. या मृत्यूनंतर गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी दहाव्याच्या निमित्ताने जमतात. कावळा शिवल्याशिवाय दहाव्याचा विधी पार पडत नसल्यामुळे सगळे जण कावळा शिवण्याची वाट पाहत असतात. बाबुरावाच्या पिंडाला कावळा शिवण्याकरिता गावातील सरपंच, पाटील, संपूर्ण गावात एकमेव असलेला नारोभट, मास्तर अशी अनेक मातबर मंडळी नाना तऱ्हेचे प्रयत्न करतात. अगदी फडावरच्या बाईंना देखील पाचारण केले जाते, इतकेच नाही तर त्यांना लावणी सादर करायला देखील लावली जाते. इतके सगळे करूनही पिंडाला कावळा शिवत नाही, तो नाहीच. वाढते उन्ह, पोटातील कावळ्यांची कावकाव सुरू असताना पिंडाला शिवण्यासाठी असलेली कावळ्यांची वानवा यातून हा दीर्घाक उलगडत जातो. कावळा शिवत नाही, म्हणल्यानंतर त्याला शोधलेल्या पर्यायानुरूप दर्भाचा कावळ्याचा विचार घेऊन हे नाटय़ शेवटापर्यंत पोहोचते. अखेरीस पिंडाला कावळा कसा शिवतो, याचा गमतीदार किस्सा म्हणजे ‘तऱ्हा एका गावाची’ हा दीर्घाक.

या दीर्घाकाचे वैशिष्ट म्हणजे या नाटकातील कलाकार मंडळी सिंहगड रस्त्यावरील ‘सुंदर सृष्टी’ सोसायटीतील डी-५ या इमारतीतील रहिवासी आहेत. या इमारतीच्या सहा मजल्यांवर राहणारी ही सारी मंडळी या दीर्घाकाच्या निमित्ताने प्रथमच रंगमंचावर येत आहेत. याच सोसायटीत राहणारे प्रदीप प्रभुणे यांनी या नाटकाचे लेखन तसेच दिग्दर्शन केले असून ते मुख्यत: व्यावसायिक नाटय़लेखक आहे. यात सोसायटीतील पती-पत्नीच्या जोडय़ा आहेत – महेश-वृषाली कुलकर्णी, मिलिंद-मृणाल फडके, नरेंद्र-स्वाती लवाटे, अखिला-प्रसाद चपळगावकर, अमित-मयूरी ढहाणे, स्वानंद-सोनल देशपांडे, वृषकेत-हंसाली प्रभुणे, आनंद-हर्षदा जावडेकर, योगेश-गौरी गुंजाळ यांच्यासह विवेक मोघे, मंजुश्री प्रभुणे, ईरा काळे, हेमा गुंजाळ आदी कलाकारांच्या बरोबरीने काही बच्चेमंडळी देखील या दीर्घाकात रंगमंचावर येऊन जातात.

हा दीर्घाक लिहिण्यापूर्वी या रहिवाशांच्या दैनंदिन जीवनातील कौशल्य, देहबोली, वागण्याची पद्धत हे सगळे त्यांनी लक्षात घेतले. या दीर्घाकाचा सराव सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असून मुळातच शेजारी असणारी ही मंडळी या निमित्ताने अधिक आत्मीयतेने एक परिवार म्हणून बांधली गेली आहेत. फ्लॅट संस्कृती, मनाची आणि फ्लॅटची बंद कवाडे यावर कायमच भाष्य केले जाते, पण या दीर्घाकाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या या मंडळींनी फ्लॅट संस्कृतीतील शेजारपण देखील जपले आहे. कॉर्पोरट, आयटी क्षेत्रातील मंडळींना पाठांतर तसेच अभिनयाची नवी शिकवणी हा सर्वस्वी वेगळा अनुभव असल्याचे यातील कलाकार सांगतात. या निमित्ताने कलाकार मंडळींचा मालिका, चित्रपट, नाटक बघण्याचा दृष्टिकोनच बदलला असल्याची भावना देखील हे नव्या दम्याचे कलाकार आवर्जून नमूद करतात. इमारतीच्या मोकळ्या जागेत सराव करताना रंगमंचीय हालचालींसाठी कलाकारांना सोपे जावे म्हणून रंगमंचाची लांबी-रुंदी यांची सुयोग्य आखणी करून केला जाणारा सराव त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतो आहे.