करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे संपूर्ण जग सध्या त्रस्त आहे. आतापर्यंत लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टर्स आणि वैद्यकिय कर्मचारी रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच एक धाडसी डॉक्टराची स्टोरी मराठी गायक-संगीतकार अवधूत गुप्ते याने शेअर केली आहे. अमेरिकेत काम करणारा हा डॉक्टर चक्क “जय जय महाराष्ट्र” लिहिलेली टोपी घालून रुग्णांवर उपचार करत आहे.

अवश्य पाहा – विद्युत जामवालने वाढवला देशाचा मान; व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत ‘या’ यादीत मिळवलं स्थान

काय म्हणाला अवधूत?

“आज एका छोट्याश्या गोष्टिनं तू केवळ माझाच नाही, तर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरुन आणला आहेस!! आजच्या ह्या महामारीच्या कठीण काळात स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पिडीतांचे दु:ख निवारण करताना, महाराष्ट्रातून खास मागवून अमेरिकेत “जय जय महाराष्ट्र” लिहिलेली तू ही जी टोपी घातली आहेस… तो फक्त तुझ्याच नव्हे … तर माझ्या प्रत्येक मराठी बांधवाच्या शिरावर सोन्याचा शिरपेच चढवला आहेस! आज खऱ्या अर्थानं तू समर्थांचं “महाराष्ट्र धर्म वाढवावा” म्हणजे काय हे कृतीतून सिद्ध केलं आहेस. महाराजांचे नाव, त्यांचे पुतळे, त्यांचे गडकिल्ले हे जपायला हवेतच, परंतु त्याआधी त्यांची शिकवण जपायला हवी. महाराजांची पताका हाती आणि त्यांचा टिळा कपाळी लावल्यानंतर हातामध्ये नक्की कुठले शस्त्र आणि कोणाच्या विरुद्ध घ्यायचे? याचा विचार व्हायला हवा. महाराजांच्या नावाने आज आपण जे काही करत आहोत ते महाराज कुठूनही पहात असतील तर त्यांना आपला नक्की अभिमानच वाटेल ना? आपल्याला ते आशीर्वादच देतील ना? याचे आत्मपरीक्षण सतत प्रत्येक शिवप्रेमीने केले पाहिजे. आज आम्ही नुसतेच दाढी-मिशा वाढवून महाराजांची चंद्रकोर भाळी मिरवतो, परंतु खऱ्या अर्थाने ह्या विषाणूच्या नायनाटासाठी तू त्यांचे शस्त्र हाती घेतले आहेस! ह्या टोपीचा खऱ्या अर्थाने तू मानकरी आहेस!” असा ब्लॉग अवधूत गुप्ते याने फेसबुकवर पोस्ट केला आहे.

अवश्य पाहा – स्वत:च्या नावाचं फेक अकाउंट पाहून विद्युतला बसला झटका; म्हणाला…

करोनाबाधित रुग्णसंख्येने ओलांडला ११ लाखांचा टप्पा

भारतात करोनाचा शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच दिवसभरात इतक्या मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील २४ तासांत देशात तब्बल ४० हजार ४२५ नवे करोनाबाधित आढळले असून, ६८१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ११ लाख १८ हजार ०४३ वर पोहचली आहे. ३ लाख ९० हजार ४५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत सात लाखांपेक्षा जास्त जणांनी करोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत २७ हजार ४९७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.