रुपेरी पडद्यावर एकावेळी दहा गुंडाना मारणारा बॉलिवूडचा ‘सिंघम’ म्हणजेच अजय देवगण त्याच्या मुलीपुढे मात्र कमी पडतो. अजयचा ‘बादशाहो’ चित्रपट गेल्याच आठवड्यात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी त्याने सहकलाकारांसह चित्रपटाची बरीच प्रसिद्धी केली. सध्या ‘बादशाहो’च्या यशाचा आनंद घेत असलेल्या या अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच तो झोपेच्या गोळ्या घेत असल्याचे सांगितले. मुख्य म्हणजे त्याच्यावर झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ कामाच्या तणावामुळे नाही तर मुलगी न्यासामुळे आलीये.

वाचा : सिने‘नॉलेज’ सनी देओलला कोणत्या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला?

अजय आणि काजोलला न्यासा आणि युग ही दोन मुलं आहेत. त्यापैकी न्यासा ही त्याची मोठी मुलगी. मोठ्या लेकीमुळेच आपली झोप उडाल्याचे अजयने ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यामागचे कारण त्याला विचारण्यात आल्यावर तो म्हणाला की, न्यासाला आम्ही शिक्षणासाठी सिंगापूरला पाठवलंय. तिच्या जाण्याने मी खूपच अस्वस्थ झालोय. तिला परदेशात जाऊन काहीच दिवस झाले आहेत. पण माझी झोप उडालीये. त्यामुळेच मी दररोज झोपेच्या गोळ्या घेतोय. माझ्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मी तिला भेटण्यासाठी जाईन.

अजयचा ‘बादशाहो’ चित्रपट प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करतोय. त्यामुळे आता अजयचा त्याच्या लेकीला भेटण्याचा मार्ग मोकळा झालाय.

वाचा : माहेरचा गणपती ‘आमचा लाडोबा गणपती’

‘बादशाहो’मध्ये अजयसोबत इलियाना डिक्रूझ, इम्रान हाश्मी, इशा गुप्ता, विद्युत जामवाल आणि संजय मिश्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रदर्शनापासून पहिल्या दोन दिवसांत चित्रपटाने २७.६३ कोटी रुपयांचा गल्ला बॉक्स ऑफिसवर जमवला.