‘बालाजी प्रॉडक्शन’ची डिजिटल माध्यमातील नवीन खेळी; १५० कोटींची गुंतवणूक

मालिका आणि चित्रपट निर्मितीक्षेत्रात दबदबा निर्माण करणारी एकता कपूर ‘बालाजी प्रॉडक्शन’च्या माध्यमातून ‘डिजिटल मार्केट’मध्ये प्रवेश करीत आहे. ‘अल्ट बालाजी’ या नावाने या क्षेत्रात नवी खेळी सुरू करताना दीडशे कोटींच्या गुंतवणुकीसह एकताची कंपनी यात उतरली आहे.

इतर अनेक कंपन्या या व्यासपीठावर असताना मोठमोठे कलाकार आणि स्वत:ची निर्मिती असलेले स्वत:चे कार्यक्रम घेऊन आम्ही प्रेक्षकांसमोर येणार आहोत. अडीचशे तासांचा अगदी नवीन विषयांचा दर्जेदार आशय प्रेक्षकांना देणारी ही एकमेव कंपनी आहे, असा विश्वास ‘अल्ट बालाजी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नचिकेत पंतवैद्य यांनी व्यक्त केला. टेलीकॉम कंपन्यांमुळे इंटरनेट वेगाने पसरत आहे. त्यामुळे यापुढे डिजिटल स्तरावर निश्चितच वाढ आहे. मोबाइलवरच वेगवेगळा नवा आशय शोधू पाहणारा एक मोठा वर्ग असा आहे ज्यांना तीन तासांचा चित्रपट आणि टीव्हीवरच्या दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका यांच्यामधील काहीतरी नवीन पाहण्याची इच्छा आहे.

शिवाय, हा एक मोठा वर्ग आहे जो इंटरनेटच्या माध्यमातून बिले भरण्यापासून सगळे पैशांचे व्यवहार करतो. त्यामुळे इंटरनेटवरून व्यवहार करणारी ही माणसे जवळपास ७५ ते १०० दशलक्ष एवढी आहेत. हे सगळे गणित लक्षात घेऊन जाहिरातींचा आधार न घेता केवळ वर्गणीदारांच्या माध्यमातूनच ‘अल्ट बालाजी’चा विस्तार करणार असल्याचे ते म्हणाले.

‘बालाजी प्रॉडक्शन’ हे १९९४ पासून निर्मितीच्या क्षेत्रात आहे. त्यामुळे त्यांच्याकडे नेहमी स्वत:च्या मालिका, कार्यक्रम आहेत.

आजवर कार्यक्रम वाहिन्यांना विकायला लागायचे. त्यामुळे या मालिका वाहिन्यांची मालमत्ता असायच्या. डिजिटलच्या बाबतीत तसे नाही. मालिकांचा बौद्धिक व स्वामित्व हक्क कंपनीकडेच राहिला पाहिजे, या एकाच सूत्राने या नव्या डिजिटल वाहिनीच्या कारभाराची मांडणी केली असल्याचेही ते म्हणाले.

सध्या सात शोज डिजिटलवर सुरू होणार आहेत. यात राम कपूर आणि साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असलेली ‘करले तुभी मोहोब्बत’, निम्रत कौर आणि जुही चावलाची ‘द टेस्ट केस’, याशिवाय ‘बॉयगिरी’, ‘देव डी’, ‘रोमिल अँड जुगल’ असे मोठे कलाकार आणि तितक्याच ताकदीच्या दिग्दर्शकांचे शोज यावर प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

दर पंधरा दिवसांनी एक नवी मालिका प्रेक्षकांना पाहता येईल. अशाप्रकारे अडीचशे तासांचा नवीन आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड असल्याचेही त्यांनी सांगितले.

खास ‘बालाजी कार्यक्रम’च दिसणार

डिजिटल माध्यम नवीन असल्याने आणि जाहिरातींचा आधार घेणार नसल्याने केवळ वर्गणीदारांच्या माध्यमातून अर्थार्जन साधणे हे सध्या मोठे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय डिजिटलसाठी मालिका करताना त्याची लेखन प्रक्रियाही तितकीच वेगळी असते आणि ती लक्षात घेऊन कार्यक्रमाची मांडणी करणे कित्येकदा अवघड होते. शिवाय, प्रत्येक मालिका ही दहा भागांपुरतीच मर्यादित असल्याने अशा मालिकांची निर्मिती करताना आपल्या हातात काय येणार?, हा स्टुडिओचा विचारही लक्षात घेऊन त्यांनाही समजावून देऊन काम करणे ही ‘अल्ट बालाजी’समोरची मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ज्या पद्धतीने ‘बालाजी प्रॉडक्शन’ने मालिका आणि चित्रपट निर्मितीत ठसा उमटवला. त्याच पद्धतीने डिजिटल क्षेत्रातही खास ‘बालाजी’ शैलीतील कार्यक्रमच प्रेक्षकांना पाहायला मिळतील, याची हमी त्यांनी दिली.