अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवरील सर्वात जास्त चर्चेत असलेल्या ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अभिनेता मनोज वाजपेयी आणि सामंथा अक्कीनेनी यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये पहायला मिळणार आहेत. मात्र आता ही वेब सीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तमिळ लोकांच्या विरोधात यामध्ये चित्रण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. एमडीएमकेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार वाईको यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यामध्ये तामिळ लोकांची प्रतिमा ही नकारात्मक दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

फॅमिली मॅन २ च्या ट्रेलरमध्ये दक्षिणेतील अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी राजी नावाचं पात्र साकारते आहे. राजी ही दहशदवादी आहे आणि ती सरकारविरुद्ध लढण्यासाठी ती निघाली आहे. या सीरिजमध्ये चेन्नई शहराची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. तिथे श्रीकांत तिवारी राजीला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे या ट्रेलमध्ये दाखवण्यात आले आहे.

या सीरिजमध्ये तामिळ लोक दहशतवादी आणि आयसिसचे एजंट असल्याचे आणि त्यांचा संबंध पाकिस्तानसोबत असल्याचे दाखवण्यात आल्याचे वायको यांनी म्हटलं आहे. यामुळे तामिळ समाजातील लोकांच्या भावनांना ठेच लागली आहे. हे तामिळ संस्कृतीच्या विरुद्ध आहे. तामिळनाडूमध्ये लोकांनी या सीरिजवर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे आणि याच्या विरोधात आंदोलन करत आहेत असे वायको यांनी जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याच्याआधी अनेकांनी या सीरिजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. तमिळ लोकांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीचे वर्णन केलं आहे. तसेच यामध्ये एलटीटीईला दहशदवादी संघटना म्हटले आहे, असा दावा अनेकांनी केला होता.

ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत होती. अनेकांनी ट्रेलवर बंदी घालण्याची मागणी केली होती. लोकांनी अभिनेत्री सामंथा अक्कीनेनीला विरोध दर्शवत तिच्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.

याआधी आलेल्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली होती. प्रेक्षक दुसऱ्या सीजनची आतुरतेने वाट पाहत आहेत. ४ रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर याचा दुसरा भाग पाहायला मिळणार आहे.