दाक्षिणात्य चित्रपटांची वाढती लोकप्रियता पाहता येत्या काळात अनेक बॉक्स ऑफिस विक्रम मोडित निघणार अशी चिन्हं आहेत. किंबहुना त्याची नांदीही झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूच्या ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं असून, अवघ्या दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामागोमागच आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढले असून, जवळपास १२५ कोटींच्या घरात या चित्रपटाची कमाई गेली आहे.

संपूर्ण जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर ‘भारत अने नेनू’चीच भुरळ पाहायला मिळत आहे. सर्वात वेगाने २५ कोटींची कमाई करण्याच्या शर्यतीत महेश बाबूच्या या चित्रपटाने एस.एस. राजामौलींच्या ‘बाहुबली’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. ‘बाहुबली’चा हा विक्रम मोडल्यामुळे ‘भारत अने नेनू’ आणखी किती कमाई करतो याकडेच आता चाहते, समीक्षक आणि चित्रपट व्यापार विश्लेषकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा : कास्टिंग काऊचच्या मुद्द्याला राईचं पर्वत केलं जातंय- रिचा चड्ढा

सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा सुरु असून, महेश बाबूच्या लोकप्रियकतेचा चित्रपटालाही फायदा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे जगभरात सर्वाधिक लाइक्स मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत महेश बाबूचा हा चित्रपट दुसऱ्या स्थानावर आहे. राजकीय कथानकाला एक रंजक वळण देत कोरटला शिवा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.