अभिनेता सलमान खानच्या चित्रपट कारकीर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘तेरे नाम’. सलमानच्या आजवरच्या सर्व चित्रपटांपैकी ‘तेरे नाम’ या चित्रपटामध्ये त्याने सादर केलेल्या अभिनयाला अनेकांनी दाद दिली. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री भूमिका चावला मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘तेरे नाम’ चित्रपटातील भूमिकेमूळे ती खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली.

भूमिकाने दाक्षिणात्य चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. दरम्यान तिला ‘तेरे नाम’ चित्रपटात सलमान खानसह काम करण्याची ऑफर मिळाली. तिची या चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीला उतरली. त्यानंतर भूमिकाला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.

२००४मध्ये भूमिकाने अभिषेक बच्चनसह ‘रन’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर भूमिकाने पुन्हा एकदा सलमानसह ‘सिलसिले’ आणि ‘दिल जो भी कहे’ या चित्रपटात काम केले. परंतु हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. २००७मध्ये आलेल्या ‘गांधी, माई फादर’ या चित्रपटानंतर भूमिकाने बॉलिवूडपासून ब्रेक घेतला होता. त्यानंतर भूमिकाने २०१६मध्ये ‘एमएस धोनी: द अनटोल्ड लव स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कम बॅक केला.

सध्या भूमिका चित्रपटसृष्टीमध्ये फारशी सक्रिय असल्याचे पाहायला मिळत नाही. पण आता ती लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजचे नाव ‘सब्र भ्रम है’ असे आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री कल्की कोचलिन आणि संजय सूरीदेखील दिसणार आहेत. या सरिजचे दिग्दर्शन संगीत सिवन करणार आहेत. ही वेब सीरिज ‘झी५’वर प्रदर्शित होणार आहे.