तब्बल तीन महिने प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोने रविवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. वादग्रस्त पण प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘बिग बॉस’चे यंदाचे हे ११ वे पर्व होते. टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे यंदाच्या पर्वाची विजेती ठरली. त्याचसोबत शोमध्ये शिल्पा ‘माँ’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीने अंतिम सोहळ्यात नवा इतिहास रचला. आतापर्यंत प्रेक्षकांच्या प्रेमासह त्यांच्या मतांचा सर्वाधिक पाठिंबा मिळवणारी ती पहिली स्पर्धक ठरली आहे. इतकेच नव्हे तर ट्विटर आणि सोशल मीडियावरही तिच्याच नावाची अधिक चर्चा होती.

वाचा : ‘नमस्कार, मी बिग बॉस बोलतोय..’

‘बिग बॉस ११’च्या विजेत्याचे नाव जाहिर होण्यापूर्वीच शिल्पा शिंदे जिंकल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत्या. शिल्पाला जिंकवून देण्यासाठी जवळपास ४७ टक्के लोकांनी पाठिंबा दिला. तर हिना खानला २५ टक्के मत मिळाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, ही आकडेवारी पडताळून पाहण्यात आलेली नाही. तसेच याविषयी कोणतीही अधिकृत माहिती शोकडून आलेली नाही. शिल्पाच्या चाहत्यांनी काल सोशल मीडियावर तिला मतं मिळावी यासाठी ‘shilpa shinde for the win’ असा ट्रेण्ड सुरु केला होता. या हॅशटॅगअंतर्गत जवळपास ३५ लाख ट्विट करण्यात आले होते. हा एक अनोखा विक्रमही शिल्पाच्या नावावर झाला आहे.

सिने’नॉलेज’ वाचा : ‘अ किस बिफोर डाइंग’च्या कथेशी साम्य असलेला हिंदी चित्रपट कोणता?

बिग बॉसचे विजेतेपद पटकावणारी शिल्पा ही पाचवी महिला स्पर्धक आहे. याआधी श्वेता तिवारी, जुही परमार, उर्वशी ढोलकिया, गौहर खान या अभिनेत्रींनी ‘बिग बॉस’चे विजेतेपद मिळवले आहे.