सध्या छोट्या पडद्यावरील बिग बॉस १४ हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाने जान सानूने मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्व स्तरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यातच आता अभिनेता करण पटेल यांने प्रसिद्ध गायक व बिग बॉस १४ चा स्पर्धक राहुल वैद्य याच्यावर टीका करत त्याला कचरा असं संबोधलं आहे.

बिग बॉसचा चाहता असलेला करण पटेल कायमच या शोमधील स्पर्धकांविषयी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. मात्र, यावेळी त्याने राहुल वैद्यवर टीकास्त्र डागलं आहे. करणने इन्स्टा स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत राहुलला कचरा म्हटलं आहे. सोबतच त्याने राहुलला या पोस्टमध्ये टॅगदेखील केलं आहे.

हेही पाहा : हिंदी बिग बॉस गाजवणारे मराठी स्पर्धक

 अलिकडेच झालेल्या कॅप्टनसीच्या टास्कमध्ये राहुल वैद्य आणि जॅस्मीन भसीन यांच्यात बॅग खेचण्यावरुन वाद झाल्याचं पाहायला मिळालं. जॅस्मीनच्या हाताला लागलेलं असतानादेखील राहुलने तिच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे करण पटेल संतापला आहे.

“राहुल वैद्य बिग बॉस १४मधील सगळ्यात मोठा कचरा आहे. बाळा, कधी तरी पुरुषांवरदेखील अशी आरेरावी करुन बघ, तुझा गैरसमज नक्कीच दूर होईल. यू रॉक जॅस्मीन”, अशी पोस्ट करणने लिहिली आहे.

दरम्यान, जान सानूने मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच आता करणने राहुलवर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर नवी चर्चा रंगली आहे.