|| भक्ती परब

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाला १५ एप्रिलपासून सुरुवात झाली. १९ कलाकारांनी त्यात भाग घेऊन आपापल्या परीने त्यात रंगत आणली. आता या पहिल्या पर्वाचा शेवटचा दिवस उजाडलाय. कोण होणार विजेता? आस्ताद काळे, पुष्कर जोग, मेघा धाडे, सई लोकूर, शर्मिष्ठा राऊत की स्मिता गोंदकर.. उत्कंठा वाढू लागलीय. पण इथवरचा प्रवास पाहता अंतिम फेरीत पोहोचलेल्या या सहा स्पर्धक कलाकारांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने कलाकारांच्या चेहऱ्याआडचा माणूस जाणून घेता आला. सेटबाहेर पाऊ स मुसळधार बरसून मन मोकळं करत होता आणि सेटवर कित्येक दिवसांनी स्पर्धक बाहेरच्या लोकांसमोर मनं मोकळी करत होते.

सुरुवातीला खेळातला नवखेपणा, आपापसातील वाद-भांडणं, मैत्री, प्रेम, कधी मारामारी तरीही प्रेक्षकांचं मनोरंजन करायचंय याची जाणीव असं सगळं इथे स्पर्धकांनी अनुभवलं. त्याला प्रेक्षक साक्षीदार झाले. कलाकारांमधला माणूस नेमका कसा आहे, हे जाणून घेण्याची इच्छा सर्वानाच असते. ही संधी ‘बिग बॉस’मुळे प्रेक्षकांना मिळाली. पण तरीही स्पर्धकांच्या वागण्याने त्यांना कोडय़ातही टाकले, रागही आणला, कोण खोटं, कोण खरं हा विचारही करायला लावला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये ती उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली आहे. याचं कारण भावनांना आव्हान देत रंगलेला हा खेळ. माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट वागायला भाग पाडते, असं म्हणतात. इथे ‘बिग बॉस’च्या खेळात तर स्पर्धकांना पावलोपावली अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला. मोठय़ाने संगीत वाजवून उठवण्यापासून ते घरातील कामं करणं, इतर स्पर्धकांशी जुळवून घेणं, घरात दिले जाणारे टास्क आणि ते टास्क करतानाही मनोरंजन झालं पाहिजे हे लक्षात ठेवणं, घरापासून दूर, सर्व सुख-सुविधांना मुरड घालून ही स्पर्धा आहे, जिंकायला हवं, अशी इच्छाशक्ती मनात सतत जागती ठेवावी लागत होती. स्वत:चा स्वभाव, वागणं, आलेल्या परिस्थितीशी दोन हात करताना त्यांच्या भावनांचा प्रत्येक वेळी कस लागत होता.

काही कलाकारांनी ‘बिग बॉस’च्या घरात पाऊल ठेवताना हिंदी ‘बिग बॉस’चे काही भाग पाहिले होते. पण प्रत्यक्ष घरात गेल्यावर त्यांना त्यांच्याच स्वभावाची परीक्षा द्यावी लागली. खेळ जिंकण्याची भावनाच यात वरचढ होती. आणि भावनेवर जो विजय मिळवतो, त्यालाच यश मिळतं, अशी या खेळाची रचना. बाहेरून पाहणाऱ्यांना ती सोपी वाटेल, पण प्रत्यक्ष त्या खेळात उतरणाऱ्यांसाठी तितकीच कठीण. आपल्या कुठल्याही भावनेचा समोरच्याने गैरफायदा घेऊ  नये, हे धोरण ठेवून जे यशस्वी ठरलेत ते आता हे सहा स्पर्धक.

‘बिग बॉस’ शोच्या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर हा खेळ काय आहे हे समजून घेण्यासाठी प्रत्येकाकडे वेळ होता. इतरांनी तो सत्कारणी लावला नाही. मी मात्र नीट अभ्यास केला. पण काही वेळा कोरी पाटी ठेवणं हेही फायद्याचं ठरतं, असं मेघा म्हणाली. ती पुढे म्हणाली की, बाहेर पडल्यावर प्रेक्षकांना वेगळी मेघा दिसेल. टास्कमुळे कुणाची मनं दुखावली जातील याची काळजी तिला वाटत नाही, कारण ती अजिबात खोटं वागत नाही. पण त्याच वेळी सई तिचं वाक्य तोडत म्हणाली की मेघा ‘बिग बॉस’शीसुद्धा खोटं बोललीय पैसे मोजून सांगताना. म्हणूनच मेघाने सगळ्या स्पर्धकांना उद्देशून सांगितलं की, मला शो संपल्यावर भेटायला येताना सगळे भाग पाहून मग भेटायला यावं. आस्ताद मात्र मेघाविषयी म्हणाला की, ती प्रेमळ आणि सगळ्यांची काळजी घेणारी व्यक्ती आहे, मग त्यावर सईसुद्धा सहमत झाली. स्मिताला सगळे गोंधळलेली असतेस, असं म्हणतात. पण स्मितानेच संवाद साधण्यात बाजी मारली. ती म्हणाली, मला बिग बॉसच्या घरात कुणावर विश्वास ठेवावा ते कळत नाही. प्रत्येक जण काही वेळा खोटं आणि काही वेळा खरं वागतात. पण आजवर घडलेल्या घटनांना मी जास्त गांभीर्याने घेत नाही, मुळात त्याचा विचार करत बसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना भांडताना किंवा कुणाच्या मागे बोलताना दिसले नाही. कारण मी मनातून शांत असते. पटकन कुणाला चांगला-वाईट प्रतिसाद देत नाही. मग मोर्चा पुन्हा एकदा मेघाकडे वळला. कारण इतर स्पर्धक मेघाविषयी हेच सांगत होते की, मेघा सांगते एक करते दुसरंच. पण मेघाचं याला उत्तर होतं की, मी माझ्या मताशी ठाम असते. तिच्या अशा बोलण्यानंतर आस्तादने त्याच्या आवडत्या भाषा विषयावर बोलायला सुरुवात केली. आस्ताद म्हणाला, भाषेवर प्रेम करायला हवं, भाषा आपल्याला खूप देते. तुम्ही ज्या भाषेत काम करता, नावारूपाला येता त्या भाषेवर प्रेम असलंच पाहिजे आणि त्यावर प्रभुत्व मिळवलंच पाहिजे. प्रत्येक कलाकाराने भाषेविषयी सजग असणं महत्त्वाचं आहे. भाषेच्या बाबतीत मी आतापर्यंत गंभीर राहिलोय. घरातील सदस्यांना वेळोवेळी भाषिक चुका समजावून सांगायचो. पण एका वळणावर पुढे ठरवलं की, बस्स याचीही खिल्ली उडवली जातेय. त्यामुळे शांत झालो. स्मिताने आपल्या मराठी बोलण्यावर विशेष मेहनत घेतली हेही त्याने पुढे सांगितलं. पुष्कर आणि सई यांच्या मैत्रीविषयी चर्चा झाली तेव्हा दोघांनीही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचं सांगितलं. आणि वारंवार मेघा आपल्याशी कसं खोटं वागली त्याचा उल्लेख या दोघांनीही केला. तेव्हा ‘माणसं कमावणं सोपं नाही’ हा पुष्करचा डायलॉग मेघाने आपला म्हणून सगळ्यांना ऐकवला. तेव्हा सगळीकडे हास्याची लकेर पसरली. सगळ्याच स्पर्धकांना रेशम टिपणीसचं जाणं पटलं नव्हतं, कारण तीही सगळ्यात तगडी स्पर्धक मानली जात होती. पण तिच्या आणि राजेशच्या नातेसंबंधावर करण्यात आलेल्या भाष्याने ती कोषात गेली होती. राजेशच्या जाण्यानंतर ती ‘बिग बॉस’ खेळाकडे खेळ म्हणून पाहात नव्हती. प्रेक्षकांचंही ती मनोरंजन न करता त्यांना गृहीत धरत होती. त्यामुळे रेशमला जावं लागलं, असं सईने सांगताच मेघा, पुष्कर आणि शर्मिष्ठाने त्याला दुजोरा दिला. याच वेळी ऋतुजा आणि सुशांत यांना आजारपणामुळे मधूनच जावं लागलं याची खंतही स्पर्धकांनी व्यक्त केली. शर्मिष्ठाला नेहमी कानामागून आली आणि तिखट झाली असे सगळे स्पर्धक ऐकवत असतात. पण यावर शर्मिष्ठाचं म्हणणं होतं की, धावती ट्रेन पकडणं सोपं नव्हतं. सगळ्याच स्पर्धकांना मनापासून खूप बोलायचं होतं. आणि ते असणारच. कारण ते पहिल्या पर्वातील अंतिम फेरीचे सहा स्पर्धक आहेत.

प्रत्येक जण घरातील वास्तव्यात काही ना काही शिकला आहे. मेघा ध्येयावर लक्ष केंद्रित करणं शिकली, सईला एक वेगळी सई ‘बिग बॉस’च्या घरात सापडली. तर संयम बाळगायला शिकलो, घरच्यांची किंमत कळली, असं पुष्कर म्हणाला. शर्मिष्ठा पटकन गोष्टी विसरून जायला शिकली, तर आस्ताद रागावर नियंत्रण ठेवणं शिकला. तो म्हणाला आपल्याकडे सॉरी, थँक यू आणि यू आर मोस्ट वेलकम अशी तीन रांजणं कायम असावीत. स्मिताचं उत्तर सगळ्यात वेगळं होतं ती म्हणाली, ‘मी निसर्गाशी नातं जोडायला शिकले, ‘बिग बॉस’च्या घरातील गार्डन परिसरात छान पक्षी वगैरे येतात. त्यांच्याशी बोलले. मी आता कुणालाही गृहीत धरणार नाही. माझ्या कमजोरींवर मात करायला शिकले.’ शेवटी सगळ्यांचा निरोप घेताना मेघाची काही वाक्यं आठवत राहिली, ‘आम्ही कलाकार आहोत मान्य आहे, पण २४ तास अभिनय करणं सोपं नाहीय. अभिनय करत नव्हते. इथे इतके कॅमेरे आहेत. पकडले गेलोच असतो, खोटं वागलो असतो तर.. खेळ हा जिंकण्यासाठीच खेळायचा असतो. आणि तेही खेळातली खिलाडूवृत्ती टिकवून ठेवून. जिंकण्याच्या भावनेने आमच्यातलं माणूसपण आम्ही गमावलं नाही. यावर सगळे कलाकार सहमत झाले होते, कारण भावना तारतेही आणि मारतेही हे त्यांनाही ठाऊ क आहे..