22 September 2019

News Flash

शिवानीमुळे आई-वडिलांची ‘ही’ इच्छा राहणार अपुरी!

इच्छा असूनही शिवानी आई-वडिलांची इच्छा पूर्ण करु शकत नाही

शिवानी सुर्वे

‘बिग बॉस मराठी’चं दुसरं पर्व होऊन आता ८० पेक्षा अधिक दिवस उलटले आहेत. त्यामुळे आता हे पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसं जेव्हा एकाच छताखाली एकत्र येतात तेव्हा काय होतं हे या शोमधून साऱ्यांच्याच लक्षात आलं असेल. या घरामध्ये एकत्र आलेल्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती तापट स्वभावी आहेत, तर काही व्यक्ती समजदार असून साऱ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणाऱ्या आहेत. त्यामुळे अनेक वेळा या घरातील प्रत्येक व्यक्तीची चर्चा होत असते. या चर्चेमध्ये शिवानी सुर्वे ही कायम अग्रस्थानावर असते. त्यातच आता घरामध्ये शिवानीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्ती तिला लग्नासाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या साऱ्या गडबडीमध्ये शिवानीने तिच्या लग्नाबद्दल आई-वडीलांची काय इच्छा आहे ते सांगितलं.

आपल्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न धमुधडाक्यात व्हावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. तशीच काहीशी इच्छा शिवानीच्या आई-वडिलांची आहे. शिवानी अजिंक्य नामक एका तरुणाला डेट करत असून सध्या शिवानीच्या घरी तिच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. शिवानीला लग्नासाठी अनेक स्थळ येत आहेत. मात्र शिवानी प्रत्येक स्थळासाठी नकार देत आहे. त्यामुळे तिच्या घरातल्यांना तिच्या लग्नाची चिंता सतावत असून तिच्या आई-वडिलांची शिवानीच्या लग्नाविषयी एक तीव्र इच्छा आहे.

वाचा : ‘केबीसी’मध्ये बिग बींनी विचारला PUBG चा फुल फॉर्म, तुम्हाला माहितीये का ?

ज्यावेळी शिवानीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस असेल त्याच्यापूर्वी शिवानीचं लग्न झालेलं असावं आणि आई-बाबांच्या अॅनिव्हर्सरीला शिवानीने तिच्या नवऱ्यासोबत यावं, असं शिवानीच्या आई-वडिलांची इच्छा आहे. शिवानीने तिच्या आई-वडिलांच्या या इच्छेविषयी वूटच्या ‘अनसीन अनदेखा’च्या क्लिपमध्ये म्हटल्याचं पाहायला मिळत आहे.  शिवानीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये आहे. मात्र शिवानी सध्या बिग बॉसच्या घरात आहे. त्यामुळे कदाचित तिच्या आई-वडिलांची ही इच्छा अपूर्णच राहणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, सध्या ‘बिग बॉस’च्या घरात शिवानीकडे स्ट्राँग स्पर्धक म्हणून पाहिलं जातं. शिवानी घरात आल्यापासून प्रत्येक दिवशी ती चर्चेत राहिली आहे. त्यामुळे तिचा फॅनफॉलोअर्सही कमालीचा वाढलेला आहे. याच कारणास्तव आता शिवानी ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकू शकेल की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First Published on August 21, 2019 4:49 pm

Web Title: bigg boss marathi 2 shivani surve parents wish incomplete ssj 93