आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय चित्रपटसृष्टीचं नाव आणखी एका कारणामुळे गाजत आहे, ते म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. बॉलिवूडमध्ये नावारुपास आल्यानंतर प्रियांकाने हॉलिवूडमध्येही पदार्पण करत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘क्वांटिको’ या सीरिजमधून तिचा चेहरा अनेकांच्याच ओळखीचा झाला. या क्षेत्रात तिचा आतापर्यंतचा प्रवास बराच रंजक राहिलाय.  सध्याच्या घडीला सर्वाधिक मानधन घेण्याऱ्या अभिनेत्रींच्या यादीतही तिच्या नावाचा समावेश आहे. अशा या ‘देसी गर्ल’चे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी प्रियांका नेमकी कशी दिसत होती, हे पाहण्यासाठी अनेकांमध्ये उत्सुकताही पाहायला मिळत आहे. तिचे काही फोटो अनेकांनी शेअरही केले आहेत. हे फोटो प्रियांकाच्या पहिल्यावहिल्या फोटोशूटमधील असल्याचंही म्हटलं जात आहे.

अशा या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रीच्या चाहत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. मॉडेलिंग विश्वात नावारुपास आल्यानंतर ‘थामिजान’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर ‘द हिरो’ या चित्रपटातून प्रियांकाने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिच्या भूमिकेने अनेकांचीच मनं जिंकली होती. त्यानंतर प्रियांकाच्या अभिनय कारकिर्दीचा चढता आलेखच पाहायला मिळाला होता. ‘फॅशन’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘दिल धडकने दो’, ‘बर्फी’, ‘मेरी कोम’ या चित्रपटांतील तिचा अभिनय विशेष गाजला.

desi-girl

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

बॉलिवूडमध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर प्रियांकाने ‘क्वांटिको’ या सीरिजच्या दोन्ही पर्वात मुख्य भूमिका साकारली होती. त्यासोबतच ड्वेन जॉन्सनसोबत ती ‘बेवॉच’ या चित्रपटातही झळकली होती. हा तिचा पहिलाच हॉलिवूडपट होता. अभिनय क्षेत्रासोबतच प्रियांका सध्या गायन आणि निर्मिती क्षेत्रातही नावाजली जातेय. ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेअंतर्गत आजवर तिने बऱ्याच चित्रपटांची निर्मिती केली आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाची निर्मितीही प्रियांकाच्या निर्मिती संस्थेअंतर्गत करण्यात आली होती.