‘कांटा लगा..’हे गाणं ऐकलं की आजही अनेकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. अभिनेत्री शेफाली जरीवाला या गाण्यात झळकली होती. या गाण्यात तिने सादर केलेल्या नृत्यकौशल्यामुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली. परंतु, या गाण्यासाठी शेफालीला त्याकाळी चांगलं मानधन मिळालं होतं. इतकंच नाही तर या गाण्यासाठी शेफालीने तिच्या वडिलांचा रागदेखील ओढावून घेतला होता.

‘कांटा लगा’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. मात्र, या गाण्यात शेफालीने काम करुन नये अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शेफालीला स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शेफालीने स्वत: याविषयी खुलासा केला आहे.
”कांटा लगा’ची ज्यावेळी ऑफर आली त्यावेळी मी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे मी या काळात फक्त माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं ही माझ्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु, मला हे गाणं करण्याची प्रचंड इच्छा होती. यासाठी मला चांगलं मानधनदेखील मिळणार होतं. तसंच मला स्वत:ला टीव्हीवर पाहायचं होतं”, असं शेफाली म्हणाली.

वाचा : निकाहनंतर सना खानने केला नावात बदल; आता मिळाली ‘ही नवीन ओळख

पुढे ती म्हणते, ‘सुरुवातीला मला गाण्यात काम करण्यासाठी वडिलांनी नकार दिला होता. मात्र, मी आईला विश्वासात घेतलं आणि मला खरंच या गाण्यात काम करायचं सांगितलं. त्यानंतर आईच्या मदतीने मी वडिलांची मनधरणी केली. विशेष म्हणजे या गाण्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं. हे गाणं तुफान हिट झालं. त्यावेळी या गाण्यासाठी मला ७ हजार रुपये मानधन देण्यात आलं होतं.

‘कांटा लगा’ या गाण्यामुळे शेफालीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले. तिने पराग त्यागीसोबत ‘नच बलिए ५’मध्ये देखील सहभाग घेतला होता. २०१८ मध्ये तिने ऑल्ट बालाजीची वेब सीरिज ‘बेबी’मध्ये काम केले. ती बिग बॉस १३मध्ये देखील भाग घेतला होता.