बॉलिवूडमधील काही चित्रपटांचं संगीत आजही लोकांच्या मनात तितकंच ताजं असून त्यांची गाणी आजही गुणगुणली जातात. ९० च्या दशकात आलेला ‘आशिकी’ त्यातलाच एक चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत हीट ठरला होता. यासोबतच चित्रपटाचं संगीत आणि त्यातील गाणी सर्वात जास्त गाजली. पण तुम्हाला माहिती नसेल, ही गाणी एका अल्बमसाठी तयार कऱण्यात आली होती. पण महेश भट्ट यांना ही गाणी आवडल्याने त्यांनी चित्रपट तयार करुन त्यामध्ये ही गाणी घेण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे ‘आशिकी’ फ्लॉप झाला तर असता महेश भट्ट यांनी दिग्दर्शन कायमचं सोडून असं कोऱ्या कागदावर लिहून दिलं होतं. गीतकार समीर यांनी हा किस्सा एका कार्यक्रमात सांगितला होता.

झालं असं होतं की, गुलशन कुमार त्यावेळी टी-सीरिजसाठी गाणी तयार करुन घेत होते. त्यांना टी-सीरिजच्या नावे गाण्यांची बँक तयार करायची होती. अनुराधा पौडवाल यांनी संगीतकार नदीम-श्रवण यांच्यासाठी एक गाणं गायलं होतं. हे गाणं अनुराधा पौडवाल यांना आवडल्याने त्यांनी समीर आणि नदीम-श्रवण यांना गुलशन कुमार यांना भेटण्यास सांगितलं. गुलशन कुमार यांना भेटण्यासाठी ते पोहोचले असता आपण गाण्यांचे अल्बम तयार करत असून तुम्ही त्यासाठी गाणी तयार करा असं सांगितलं. या अल्बमसाठी गुलशन कुमार यांना ‘चाहत’ असं नावही दिलं होतं.

समीर आणि नदीम-श्रवण यांनी सर्वात याआधी ‘मै दुनिया भुला दूंगा’ हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. सर्व गाणी तयार झाल्यानंतर एकदा महेश भट्ट आले असता त्यांनी ही गाणी ऐकली आणि त्यांना प्रचंड आवडली. महेश भट्ट यांनी गुलशन कुमार यांना आपण ही गाणी घेऊन एक चित्रपट तयार करतो असं सांगितलं. यानंतर चित्रपट तयार झाला. पण जेव्हा चित्रपट दाखवण्यात आला तेव्हा लोकांनी गुलशन कुमार यांना हा चित्रपट चालणार नाही, इतके वाईट चेहऱ्याचे हिरो-हिरोईन पहायला कोणी येणार नाही असं सांगितलं. यानंतर गुलशन कुमार यांनीही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला.

गुलशन कुमार चित्रपट रिलीज करणार नाहीत असं कळताच समीर यांनी महेश भट्ट यांना कळवलं. महेश भट्ट समीर आणि नदीम-श्रवण यांना घेऊन गुलशन कुमार यांच्या घरी पोहोचले. महेश भट्ट यांनी गुलशन कुमार यांना हा चित्रपट आणि गाणी जबरदस्त चालणार असल्याचं सांगितलं. यावेळी गुलशन कुमार यांनी तुम्हाला इतका आत्मविश्वास असेल तर कोऱ्या कागदावर लिहून देता का असं महेश भट्ट यांना विचारलं. महेश भट्ट यांनीदेखील कोऱ्या कागदावर जर चित्रपट चालला नाही तर दिग्दर्शन करणं आपण कायमचं सोडून देऊ असा शब्द दिला. यावेळी गुलशन कुमार यांनीदेखील महेश भट्ट यांनी जर तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे तर मीदेखील शब्द देतो की, कोणत्याही झालं नसेल इतक्या मोठ्या प्रमाणात या चित्रपटाचं मार्केटिंग करणार.

यानंतर आशिकी चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने इतिहास रचला. टी-सीरिजच्या सर्वात जास्त विकल्या गेल्याचा संगीताचा रेकॉर्ड आजही ‘आशिकी’ चित्रपटाच्या नावावरच आहे.