14 August 2020

News Flash

‘बॉलीवूड शिवकालीन इतिहासाकडे वळलं ही मोठी गोष्ट’

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिके तून सरसेनापती हंबीरराव मोहितेंची महती नव्याने घराघरांत पाहिली गेली.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

मराठीत ऐतिहासिक चित्रपटांची एकच लाट आली आहे हे खरं.. याच लोकप्रिय लाटेतील चर्चेतील चित्रपट म्हणजे प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित, अभिनीत ‘सरसेनापती हंबीरराव’. या चित्रपटातून शिवकालीन इतिहासातील आणखी एक सुवर्णपान उलगडणार आहे. वाईतील या चित्रपटाच्या सेटवर असलेला मावळे, मोगल सैनिक आणि सरदारांच्या विविधरंगी पोशाखातील कलाकारांचा ताफा, प्रशिक्षित घोडे आणि त्यांच्यावर बसून घोडेस्वारीचा सराव करणारे कलाकार, ठिकठिकाणी दृश्यांच्या गरजेनुसार उभारलेले शामियाने आणि याच गर्दीत एके  ठिकाणी तंबूत कॅमेरा आणि सगळा तामझाम घेऊन बसलेले दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये. एक भव्य ऐतिहासिकपट साकारण्याच्या उद्देशाने प्रत्येक गोष्ट चोखच हवी हा ध्यास घेऊन चित्रीकरणात रमलेल्या प्रवीण तरडे यांच्याशी बातचीत करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली..

‘मुळशी पॅटर्न’ या अगदी समकालीन वास्तवावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाच्या सुपरहिट यशानंतर दिग्दर्शक म्हणून प्रवीण यांनी थेट इतिहासाकडे मोर्चा वळवला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिके तून सरसेनापती हंबीरराव मोहितेंची महती नव्याने घराघरांत पाहिली गेली. त्याच वेळी प्रवीण यांनी हंबीररावांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची घोषणा केली, त्यामुळे साहजिकच या चित्रपटाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. या जुळून आलेल्या योगाबद्दल बोलताना प्रवीण म्हणतात, ऑस्कर वाइल्डचं एक वाक्य आहे, नथिंग इज अ‍ॅक्सिडेंटल. ऐतिहासिक चित्रपट आपल्याकडे कायम यशस्वी ठरत आले आहेत आणि त्याचं श्रेय अगदी भालजी पेंढारकरांपासून अनेकांना आहे. माणसं इतिहासावर प्रेम करतात. अगदी वस्तीतल्या मुलाला आपल्याकडे जिरेटोप आणि मिशा लावल्या तरी त्याच्याकडे आदराने बघितलं जातं. तो आदर आहे इतिहासाबद्दल आणि तो घडवणाऱ्यांबद्दल.. ऐतिहासिक चित्रपट सातत्याने करत ज्यांनी महाराष्ट्रात सिनेमा जिवंत ठेवला त्या सगळ्यांना याचं श्रेय जातं. गेल्या काही वर्षांत डॉ. अमोल कोल्हेंनी सातत्याने ऐतिहासिक मालिका के ल्या. दिग्पाल लांजेकरसारखा दिग्दर्शक सातत्याने ऐतिहासिक चित्रपट करतो आहे. ‘तानाजी’सारख्या आपल्या माणसाच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाने आज देशभरातून ३०० कोटींची कमाई के ली आहे. बॉलीवूड इंडस्ट्री शिवाजी महाराज आणि त्या काळातील इतिहास पडद्यावर जिवंत करण्यासाठी पुढे आली आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता अनेक लोक ऐतिहासिक चित्रपटाकडे वळले आहेत. देश जर याची दखल घ्यायला लागला आहे, तर आपण का ऐतिहासिक चित्रपटांबाबतीत मागे का राहायचे, असा सवाल ते करतात.

मात्र ऐतिहासिक पट करत असताना अनेकदा ते वास्तवापासून दूर असतात, असाच अनुभव प्रेक्षकांना येतो. ऐतिहासिक घटना साकारताना अनेकदा सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते, मात्र अनेकदा ती आवश्यक असते, असे प्रवीण तरडे यांचे मत आहे. मराठी माणसाच्या घरातील लहान मुलं कार्टून बघत असतात. त्यातले हिरो मोठे का होतात? तानाजी मालुसरे हा देशाचा हिरो व्हावा, देशभरात लोकप्रिय व्हावा यासाठी तानाजीच्या निर्माता-दिग्दर्शकांनी काहीएक सिनेमॅटिक लिबर्टी घेतली. त्यांना व्हीएफएक्सच्या साहाय्याने लढाई अधिक चमकदार दाखवली. त्यांनी घेतलेल्या या लिबर्टीमुळे सिनेमा देशभर पोहोचला. उलट आपली ताकद वाढली. तानाजी शिवभक्त होते, त्यामुळे त्यांनी शंकराचं गाणं गायलं तर गायले असतील, ते घोडा उडवताना दाखवले आहेत.. अशा प्रसंगांमुळे इतिहासाशी फारकत घेतली आहे वगैरे म्हणण्यात तथ्य नाही आणि तसंच काही चुकीचं असतं तर लोकांनी त्याला निश्चितच आक्षेप घेतला असता, आपल्याकडचे प्रेक्षक चोखंदळ आहेत. त्यांनी या चित्रपटातील भव्यदिव्यतेवर प्रेम के लं, असं मत त्यांनी व्यक्त के लं.

या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. महेशचं आणि माझं अद्वैत झालं आहे, असं ते म्हणतात. एक तर महेशने ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’सारखे ऐतिहासिक चित्रपट के ले आहेत. त्यामुळे त्याचा अनुभव दांडगा आहे. दुसरं मी खूप आक्रमक आहे. चित्रीकरणाच्या वेळी एखाद्याकडून जर चूक झाली तर ती मी खपवून घेत नाही. माझ्याकडे चुकीला माफी नसते आणि महेश इतरांच्या चुका झाल्या तरी सांभाळून घेतो, त्यांना समजावून सांगत तो पुन्हा संधी देतो. तो एका वेगळ्या वातावरणातून आला आहे. मी ग्रामीण भागातून आलो आहे. त्यामुळे थोडय़ा मोकळ्याढाकळ्या स्वभावाचा आहे. रागही पटकन येतो आणि प्रेमही तितकं च टोकाचं करतो; पण आम्ही दोघंही असे विरुद्ध स्वभावाचे आहोत आणि अशी दोन विरोधी स्वभावाची माणसंच एकत्र येऊन इतिहास घडवू शकतात जो आता आम्ही घडवतो आहे.. ‘मुळशी पॅटर्न’नंतर इतक्या गॅपने हंबीररावची तयारी सुरू झाली आहे.. मात्र हा वेळ आपल्यासाठी महत्त्वाचाच असतो, असं ते सांगतात. मी सिनेमा मुळात धंदा म्हणून काम करत नाही. मला सातत्याने काम करायचा कं टाळा येतो. मी आराम करतो, पुस्तकं  वाचतो, लिहितो आणि मुळात मी शेतकरी आहे. त्यामुळे शेतीतही काम करतो. अनेकदा शेतीची कामं संपवून मग मी सिनेमा करायला घेतो. माझे वडीलही काही दिवसांपूर्वी म्हणत होते की, अरे शेतात हरभरा पेरला आहे. तो काढायचा आहे, तर तू ये इथे.. त्यांनाही माझ्या चित्रपटांबद्दल असं भव्य काही वाटत नाही. त्यांच्याही दृष्टीने तो हरभरा काढणं महत्त्वाचं आहे, तर तू त्यासाठी ये की.. मला हे आवडतं. मी शेतीत मनापासून रमतो आणि सिनेमाही मी तितकाच मनापासून अभ्यासपूर्वक बनवतो. त्यामुळे माझा सिनेमा चांगला होतो, असं ते सांगतात. मी दोन-अडीच वर्षांतून एक सिनेमा करतो, नाही तर ‘मुळशी पॅटर्न’ हिट झाल्यावर माझ्या कार्यालयात वेगवेगळ्या कथा, प्रस्ताव घेऊन येणाऱ्यांची इतकी गर्दी होती की, मला उसंत मिळत नव्हती; पण मला अशा पद्धतीने सिनेमा करायचाच नाही. मला जे आवडेल, जे पटेल तेच मी करणार. सिनेमा हा माझा ध्यास आहे आणि तो मी त्याच ध्यासातून करत राहणार, असं प्रवीण ठामपणे सांगतात.

ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीचा खर्चही तितकाच मोठा असतो आणि तयारीही तितकीच महत्त्वाची असते, असे सांगत या चित्रपटातील ड्रोन शॉटसाठी त्याचे स्पेशालिस्ट बोलावण्यात आले आहेत, प्रत्येक माणसावर विचारपूर्वक काम के लं आहे, असं ते म्हणतात. अभिनेता गश्मीर महाजनी या चित्रपटात काम करतो आहे. तर त्याची शरीरयष्टी कशी आहे, त्याच्या भूमिके नुसार त्याची काय तयारी करून घ्यायला हवी. आता इथे प्रत्येक कलाकार गेले सहा महिने घोडेस्वारी, तलवारबाजी याचा सराव करत आहेत. आजकाल कलाकारांकडे वेळ नसतो, ते काय म्हणतात.. किती दिवसांचे चित्रीकरण आहे तेवढे दिवस आम्ही देतो; पण तू चाळीस दिवस काम करणार असशील तर तुला घोडेस्वारी येते का, तलवारबाजी येते का, येत नसेल तर तेवढा वेळ देऊन तुम्ही शिकणार का? ऐतिहासिक चित्रपटांना तेवढा वेळ द्यावाच लागतो, इथे चटचट कामं उरकता येत नाहीत. आम्ही आमच्या चित्रपटासाठी असेच कलाकार घेतले जे सहा महिने वेळ देऊ शकतील. या सहा महिन्यांत घोडेस्वारी, तलवारबाजी, दांडपट्टय़ाचा सराव, संवादफे क, तुमची भाषाशैली-देहबोली प्रत्येक गोष्टीवर काम करून घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा हा चित्रपट पाहाल तेव्हा त्यात तो जिवंतपणा तुम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी सांगितलं. ऐतिहासिक पटांसाठी कु ठलीही वेगळी भाषा वापरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले. मी प्रायोगिक रंगभूमीवरचा माणूस आहे, त्यामुळे ऐतिहासिक चित्रपट असला तरी त्यातलं बोलणं हे साधंच असणार आहे. या चित्रपटात शिवाजी महाराज अमुक अशाच पद्धतीने बोलणार, वावरणार असे मापदंड नाहीत. महाराज आपले होते, बहुजनांचे होते. ते त्या वेळी आपल्या मावळ्यांबरोबर मैत्रीने वागलेच असतील. त्यामुळे लोकांना आपलेसे वाटतील, अशाच पद्धतीचे महाराज या चित्रपटातून दिसतील, असं त्यांनी सांगितलं.

सगळ्यात सर्वाधिक मानधन घेणारा लेखक म्हणून तुमची ख्याती आहे.., असं म्हणताच, हे खरं आहे. आता कु ठे लेखक म्हणून चांगलं मानधन मिळतं आहे. आधी ते नव्हतं. आता लेखकाला त्याच्या कामानुसार योग्य मोबदला मिळतो आहे याचं समाधान असल्याचं त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2020 3:10 am

Web Title: bollywood is a big thing that goes back to the history says pravin tarde abn 97
Next Stories
1 टेलीचॅट : चांगभलं..
2 कथा ‘खतरों के खिलाडी’ची
3  पाहा नेटके : कुटुंब रंगवा नवरंजनात
Just Now!
X