भावेश जोशी हे नाव ऐकताना एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचंच नाव आपण ऐकतोय, असं आपल्याला वाटू लागतं. पण, मुळात या नावाच्या मागेसुद्धा एक शक्ती दडलीये. विक्रमादित्य मोटवानी याने त्याच्या आगामी चित्रपटातून या सर्वसामान्य नावाला एक खास टच देत सुपरहिरोच्या रुपात हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. ‘भावेश जोशी सुपरहिरो’, या चित्रपटाच्या माध्यमातून हा सर्वसामान्यांमध्ये दडलेला सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, तो अनेकांचंच लक्ष वेधत आहे. हर्षवर्धन कपूर याची महत्त्वाची भूमिका असून, ‘मिर्झियाँ’नंतर हा त्याचा दुसरा चित्रपट आहे. इरॉस इंटरनॅशनल, रिलायंस एंटरटेन्मेंट, विकास बहल, मधू मंटेना आणि अनुराग कश्यप या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलरमध्येही हर्षवर्धनचा नेमका लूक पाहायला मिळत नाही. तर ट्रेलरमध्ये भरभरून साहसदृश्यं पाहायला मिळत आहेत. याशिवाय सुपरहिरोच्या वेशभूषेतील ही भूमिका चित्रपटाच्या कथेविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करते.

PHOTOS: ‘पानिपत’साठी बांधला जातोय शनिवारवाडा

हा चित्रपट हर्षवर्धन आणि विक्रमादित्य या दोघांच्याही दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. विक्रमादित्यने यापूर्वी ‘लुटेरा’, ‘उडान’, ‘ट्रॅप्ड’ हे चित्रपट साकारले होते. पण, ‘भावेश जोशी…’च्या निमित्ताने त्याने एका वेगळ्या धाटणीच्या कथानकावर काम करण्याचं धाडस दाखवलं आहे. हर्षवर्धननेही या चित्रपटातील भूमिकेसाठी बरीच मेहनत घेतल्याचं पाहायला मिळात आहे. येत्या २५ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.