‘अब इस देश में गांधी के मायने बदल चुके हैं’, असं म्हणत भारतीय राजकारण आणि इतिहासातील काही महत्त्वाची पानं उलटणारा ‘इंदू सरकार’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. भारतीय राजकारणामध्ये आणीबाणीच्या दिवसांतील बऱ्याच घटना आणि प्रसंग आजही अनेकांसाठी चर्चेचा विषय आहेत. देशाच्या राजकारणामधील या अनपेक्षित आणि असंतोषपूर्ण घटनेचे पडसाद बऱ्याच गोष्टींवर उमटल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याच मुद्द्यांवर ‘इंदू सरकार’च्या ट्रेलरमधून प्रकाश टाकण्यात आला आहे.

अभिनेत्री क्रिती कुल्हारीच्या अभिनयाची सुरेख झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. त्यासोबतच नील नितीन मुकेशच्या अभिनयाचीही वेगळी बाजू अनेकांचं लक्ष वेधत आहे. या चित्रपटात नील ‘संजय गांधी’च्या भूमिकेत दिसत आहे. संजय गांधी आणि त्यांनी काढलेला नसबंदीचा आदेश ज्याचा देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कशा प्रकारे दूरगामी परिणाम झाला याची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

१९७५ चा काळ साकारण्यासाठी दिग्दर्शक मधुर भंजारकरने बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळत आहे. बरेच बारकावे टिपत त्याकाळच्या रेडिओवरील अमिन सयानींच्या आवाजालाही या ट्रेलरमध्ये स्थान मिळालं आहे. आणीबाणीच्या वेळी सर्वसामान्य जनतेला कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला होता याचं चित्रण या चित्रपटात केलं आहे. त्याच विदारक परिस्थितीची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.

गोळीबार, लाठीहल्ला, पोलीस आणि शासनाची अरेरावी जनतेसाठी कशा प्रकारे त्रासदायक ठरली होती याचाच अंदाज या ट्रेलरमधून लावता येत आहे. आक्रोश, हतबलता आणि त्यातून परिस्थितीशी दोन हात करत लढणारी एक सर्वसामान्य महिला अशा चौफेर कथानकावर ‘इंदू सरकार’ भाष्य करणार असल्याचं कळतं. ट्रेलरमधील दमदार संवाद पाहता ही या चित्रपटाच्या जमेची बाजू ठरु शकते. दरम्यान, २८ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात किर्ती कुल्हारी आणि नील नितीन मुकेशसोबतच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेरसुद्धा भूमिका साकारताना दिसणार आहेत. त्याशिवाय इंदिरा गांधींच्या भूमिकेत अभिनेत्री सुप्रिया विनोद प्रेक्षकांना एका वेगळ्या काळाची सफर घडवणार यात शंकाच नाही.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…