करोनाचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न सुरु असताना परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नसल्याच चित्र दिसत आहे. करोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता १४ एप्रिलपर्यंत असणारा लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. तेव्हा त्यांनी करोनाशी लढण्यासाठी सुसज्ज असल्याचेही सांगितले. तसेच लॉकडाउनमुळे कामगार आणि गरीबांचे हाल होत असल्याचे दिसत आहे. नुकताच दिग्गज गायिका आशा भोसले यांनी लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

आशा भोसले यांनी लोकांशी संवाद साधत मदतीचे आवाहन केले आहे. आपण सर्वांनी प्रत्येकी १०० रुपये पीएम केअर्स फंडामध्ये दिले पाहिजेत. तुम्हाला १०० रुपयांचे महत्त्व माहित आहे का? जर देशातल्या १३० कोटी लोकांनी १०० रुपयांची मदत केली तर १३,००० कोटी रुपये जमा होतील. तुम्हाला १०० रुपयांपेक्षा जास्त मदत करण्याची इच्छा असेल तर तुम्ही करु शकता. ही रक्कम लोकांच्या मदतीसाठी उपयोगी पडेल असे आशा भोसले यांनी म्हटले आहे.

शेवटी आशा यांनी लोकांना या लढ्यात एकत्र येण्यासाठी तसेच त्यांना लढण्यासाठी गाणे गाऊन प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी १९५४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘जागृती’मधील आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की हे गाणे गायले आहे.

महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या २९१६ वर पोहचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात दिवसभरात करोनाची लागण होऊन ९ जणांचा मृत्यू झाला. तर २३२ रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापैकी १९०० पेक्षा जास्त रुग्ण हे मुंबईतले आहेत तर उर्वरित इतर महाराष्ट्रातले आहेत. महाराष्ट्रात १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात करोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजाराच्या पुढे गेली असून १०१९७ वर पोहोचली आहे. देशभरात ३९२ मृत्यूंची नोंद झाली आहे.