हिंदी चित्रपटातील कथानकाप्रमाणे आकार घेणारी आणि कथानकाला पुढे नेण्यात हातभार लावणारी गाणी हा चित्रपटाचा अविभाज्य घटक असतात. त्यामुळेच अडीच तासांच्या हिंदी चित्रपटामध्ये असलेल्या गाण्यांचे अप्रुप हॉलीवूडलाही आहे. पण सध्या चित्रपटांमधील गाणी पाहता, ती कथानकाला पुढे नेण्यापेक्षा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केलेली जिंगलच वाटत असल्याची शोकांकिका गीतकार स्वानंद किरकिरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे गाण्यांच्या लिखाणामध्ये कलेपेक्षा ग्लॅमरचा प्रभाव अधिक पडत असल्याचे ते सांगतात.
‘हजारों ख्वायिशे ऐसी’ चित्रपटापासून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे स्वानंद किरकिरे मुळात दिग्दर्शक बनण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. पण या चित्रपटासाठी सुधीर मिश्रा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना सहज म्हणून ‘बावरा मन’ हे गीत लिहिले होते. ते गाणं के के मेननकडून सुधीर मिश्रापर्यंत पोहोचले. पुढे या गाण्याचा समावेश चित्रपटामध्ये करण्यात आला आणि तेथून एक गीतकार म्हणून स्वानंदच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर ‘परिणिता’, ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘पीके’सारख्या गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. या प्रवासादरम्यानच त्यांनी गायक, साहाय्यक दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध पातळ्यांवरही काम पाहिले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये हिंदी चित्रपटांमधील गाण्यांमध्ये खूप बदल घडल्याचे त्यांच्या नजरेत आले आहे. सध्या गाणी चित्रपटाच्या कथानकानुसार बनत नसून केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीला नजरेसमोर ठेवून तयार केली जात असल्याची खंत ते व्यक्त करतात. त्यामुळे कित्येकदा केवळ गाण्यातील दोन किंवा तीन शब्दांवर भर दिलेला असतो. दोन मिनिटांच्या गाण्यामध्ये तेच शब्द पुन:पुन्हा वेगवेगळ्या पद्धतीने आणण्यात गीतकार धन्यता मानतात. सध्या गाण्यांच्या निर्मितीमध्येही विविध ‘ट्रेण्ड्स’ दिसून येतात. काही काळासाठी गंभीर, वियोग गाणी प्रसिद्ध असतात, तर कधी सुफी गाण्यांना मागणी असते. चित्रपटाची गाणी गाजली की, केवळ ती गाणी पाहण्यासाठी लोक चित्रपट पाहायला येतात, या समजुतीपोटी गाण्यांच्या दर्जामध्ये नक्कीच फरक पडतो. गीतकाराला गाण्याच्या दज्र्यापेक्षा त्याच्या विक्री मूल्यावर जास्त भर द्यावा लागतो. त्यामुळे कला मरत असल्याचे ते सांगतात.
स्वानंद यांचा आतापर्यंतचा प्रवास ‘स्वानंद : एक संगीतमय शब्द मैफिल’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रथमच प्रेक्षकांसमोर उलगडला जाणार आहे. या वेळी अभिनेत्री प्रिया बापट त्यांची मुलाखत घेणार असून जयदीप बागवडकर आणि मधुरा कुंभार त्यांची गाजलेली गाणी सादर करणार आहेत. स्वत: स्वानंद आणि प्रियाही या कार्यक्रमात दोन गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या दहा वर्षांच्या आपल्या कारकीर्दीची उजळणी करण्याची संधी आपल्याला मिळाल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. सध्या आपण ‘खूप काही केले आहे, पण खूप काही करायचे शिल्लक आहे,’ अशा मधल्या टप्प्यावर असल्याचे ते सांगतात.