Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’ हा रिअॅलिटी शो अंतिम फेरीत पोहोचला असून आता फक्त सहा स्पर्धक घरात राहिले आहेत. आता बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली असून हा शो सुरु झाल्यापासून चर्चा विषय ठरला होता. या शोमध्ये टास्कपेक्षा घरातील सदस्यांमध्ये झालेल्या भांडणांमुळे तो विशेष गाजल्याचं पाहायला मिळालं. मात्र भांडणाबरोबरच घरात काही असेही स्पर्धक होते जे भांडणांव्यतिरिक्तही चर्चेत आले आणि त्यांच्यामुळे हा शो खऱ्या अर्थाने गाजला. तर पाहूयात नक्की कोण आहेत हे स्पर्धक.

१. आस्ताद काळे – अस्खलितपणे मराठी बोलणार अस्ताद सध्या बिग बॉसच्या अंतिम फेरीत पोहोचला असून अंतिम सामन्यात पोहोचणार आस्ताद हा दुसरा स्पर्धक ठरला आहे. बिग बॉसच्या घरात पाय ठेवल्यापासून सतत चर्चेत राहणारा आस्ताद त्याच्या आडमुठे स्वभावामुळे जास्त चर्चिला जाऊ लागला. आस्तादने अनेकवेळा टास्क करताना त्याच्या मर्यादा सोडून आवाजाची पातळी वाढविली होती. त्यामुळे तो प्रेक्षकांच्या नजरेमध्ये येऊ लागला होता. इतकचं नाही तर त्याच्या याच रुबाबदार स्वभावामुळे तो प्रेक्षकांचा लाडकाही झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे एकंदरीतच अनेक प्रेक्षक केवल आस्तादसाठी हा शो पाहत असल्याचं समोर आलं होतं.

२. मेघा धाडे -बिग बॉस मराठीच्या घरातील तिखट मिरची अर्थात मेघा धाडेनं आपला खेळ उत्तमरित्या खेळत घरात स्वत:चं स्थान टिकून ठेवलं आहे. म्हणूनच तिला विजेतीपदाची प्रमुख दावेदार मानलं जात आहे. मेघा अनेक वेळा रोखठोक बोलण्यामुळे चर्चेत आली. सतत बडबड करणारी मेघाने तिचा अफाट बोलण्यामुळे आणि खेळात नवनवीन युक्त्यांचा वापर केल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. इतकच नाही तर काही प्रेक्षक केवळ मेघाचा खेळ बघता यावा यासाठी बिग बॉस बघत असल्याचं समोर आला आहे. त्यामुळे मेघाने खऱ्या अर्थाने बिग बॉस गाजवलं अस म्हणणं वावग ठरणार नाही.

३.सुशांत शेलार- वैद्यकीय कारणामुळे अवघ्या काही दिवसात घराबाहेर पडलेला सुशांत त्याच्या आक्रमक स्वभावामुळे जास्त चर्चिला गेला. विशेष म्हणजे सुशांतने जेवढी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं तेवढाच तो भावूक झाल्याचंही दिसून आलं. अनेक टास्कमध्ये आपल्या गृपबरोबर झालेल्या अन्यायावर भाष्य करण्यासाठी तत्पर असलेल्या सुशांतला फार कमी काळामध्ये घराच्या बाहेर पडावं लागलं. मात्र तो जेवढे दिवस घरात होता ते सारेच दिवस त्याने गाजवल्याचं पाहायला मिळालं.

४. रेशम टिपणीस- गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी रेशम ही बिग बॉसच्या घरात आणि घराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी सतत चर्चेचा विषय ठरली होती. बिग बॉसच्या घरात राजेश आणि रेशमच्या निर्माण झालेल्या नात्यावर प्रेक्षकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं. इतकचं नाही तर अप्रत्यक्षरित्या घरातदेखील काही सदस्यांनी त्यांच्या नात्यावर आक्षेप घेतला होता.

५.राजेश शृंगारपुरे- बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यावर काही काळ शांत वाटणारा राजेश टास्क सुरु झाल्यावर खऱ्या अर्थाने घरात सक्रिय झाला होता. मात्र टास्क करताना अनेक वेळा त्याची दादागिरी होत असल्याचं पाहायला मिळालं. त्याबरोबरच राजेशमुळेच घरात दोन गट निर्माण झाल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे राजेश सतत प्रकाशझोतामध्ये येत होता.