27 November 2020

News Flash

‘दररोज प्रेक्षकांना हसवणे आव्हानात्मक’

छोटय़ा पडद्यावरील विनोद, करोनामुळे मनोरंजनसृष्टीवरील परिणाम याविषयी अलीशी केलेली बातचीत ..

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

अकबर-बिरबलच्या चातुर्यकथांनी समस्त आबालवृद्धांना भुरळ घातली आहे. याच कथा आजच्या काळात नवीन स्वरूपात प्रेक्षकांना ‘स्टार भारत’वरील ‘अकबर का बल बिरबल’ या मालिकेद्वारे पाहण्यास मिळणार आहेत. छोटय़ा पडद्यावर आपल्या विनोदाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा अभिनेता अली असगर यात अकबरची भूमिका साकारत आहे. यानिमित्ताने छोटय़ा पडद्यावरील विनोद, करोनामुळे मनोरंजनसृष्टीवरील परिणाम याविषयी अलीशी केलेली बातचीत ..

गेली दोन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता अली असगर याने आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९८७ साली ‘एक दो तीन चार’ या मालिकेद्वारे केली. सहज सोप्या भाषेत समोरच्याची खिल्ली उडवण्यात त्याचा हात कोणीच धरू शकणार नाही. चित्रपट तसेच मालिकांमधून आपले नशीब अजमावत असताना ‘कॉमेडी सर्कस’, ‘कपिल शर्मा’च्या शोमध्ये नानी आणि दादीच्या भूमिकेतून तो विनोदी अभिनेता म्हणून घराघरांत लोकप्रिय झाला. आजच्या काळात करोनामुळे लोकांचे रोजगार बुडाले आहेत. यामुळे सर्वाच्याच मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही मालिका प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करेल. यात  माझ्या अकबरच्या भूमिकेला विविध पैलू आहेत. अकबरचे कुटुंब, प्रजा तसेच बिरबल यांच्यासोबत वेगळे नाते आहे. मालिकेची कथा ऐकल्यावर मी लगेच होकार दिला. ही मालिका ऐतिहासिक नसून सध्याच्या परिस्थितीवर विनोदी अंगाने भाष्य करते. यासाठी याआधी वेगवेगळ्या कलाकारांनी ही भूमिका पडद्यावर कशी साकारली याचा अभ्यास मी केला. अकबर म्हटले की साहजिकच डोळ्यासमोर ‘मुघल ए आजम’ चित्रपटातील पृथ्वीराज कपूर यांनी साकारलेली अकबराची भूमिका पहिल्यांदा नजरेसमोर येते. अकबर म्हणून त्यांची प्रतिमा मनात पक्की आहे, असे अलीने सांगितले.

करोनामुळे चार महिने मनोरंजनसृष्टीचे अर्थकारण थांबले होते. राज्य शासनाच्या परवानगीनंतर पुन्हा चित्रीकरण सुरू झाले आहे. मात्र, यामुळे मालिकेची टीम कमी करण्यात आली आहे. तसेच सेटवरील वावरही कमी झाला आहे. आम्ही सुरक्षेसाठी गरम पाणी पिणे, वाफ घेणे या उपाययोजना सातत्याने करत असतो, असे तो सांगतो. करोनाकाळात तर प्रेक्षकांना छोटय़ा पडद्यावर खिळवून ठेवणे अधिक आव्हानात्मक झाले असल्याचे मत अली असगरने व्यक्त केले. लोकांकडे दूरचित्रवाणी पाहण्यास पुरेसा वेळ नाही आणि ओटीटीमुळे इतर ठिकाणी अनेक विनोदी कार्यक्रम सुरू असतात. यात आपले वेगळेपण सिद्ध करण्याचे कसब कलाकारांचे असते. शेवटी प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणे हा माझा मुख्य हेतू असल्याचेही त्याने स्पष्ट केले. सध्याचे विनोदी कार्यक्रम हे विनोदासाठी न पाहिले जाता नव्या चित्रपटांच्या प्रसिद्धीचे माध्यम म्हणून पाहिले जातात, मात्र त्याकडेही तो सकारात्मक दृष्टीनेच पाहतो.  आधी कार्यक्रमात कलाकार येऊन चित्रपटाविषयी सांगत असत. आता मात्र आम्ही सादर करत असलेल्या विनोदाच्या माध्यमातून कलाकारांविषयी चार गोष्टी आणखी जास्त समजतात. यात कलाकारही ही मजा खिलाडूवृत्तीने घेतात. विनोद करताना प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आम्ही काळजी घेतो. त्यामुळे ही नवी देवाणघेवाण प्रेक्षकांना आवडत असल्याचेही त्याने स्पष्ट केले.

छोटय़ा पडद्यावरील महत्व

विनोदी सादरीकरण करताना टायमिंग महत्त्वाचे असते. पंधरा वर्षांपूर्वी  दूरचित्रवाणीवर विनोदी कार्यक्रम हा प्रकार लोकप्रिय नव्हता. ‘कॉमेडी सर्कस’ कार्यक्रमानंतर विनोदाकडे प्रेक्षक वळला. सध्या हिंदी तसेच प्रादेशिक भाषेत जे विनोदी कार्यक्रम आहेत त्यामुळे विनोदाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. कारण सासू-सुना, कट-कारस्थाने आणि दैनंदिन जीवनातील दु:ख याला कंटाळलेल्या प्रेक्षकांना विनोदाचा डोस आवश्यक असतो. तोच आम्ही विनोदी कार्यक्रमातून देतो. याच्याच जोडीला दर्जेदार विनोदी आशय तयार करण्याचे आव्हान आमच्यासमोर असते.

स्त्री वेशामुळे विनोदाचे स्वातंत्र्य

आता कोणत्याही विनोदी कार्यक्रमात पुरुषाने स्त्री वेश साकारलेले पात्र हमखास दिसून येते. विनोद म्हटला की, पुरुषाने स्त्री वेश धारण करणे हा अलिखित नियमच होऊन बसला आहे. पूर्वी महिलांना नायक-चित्रपटात काम करण्यास परवानगी नसल्याने पुरुषांनाच स्त्री पात्र सादर करावे लागत असे. तेव्हा नाइलाज होता. मात्र, आता हे सर्रास दिसू लागले आहे, हे तो मान्य करतो; पण स्त्री पात्र साकारताना कार्यक्रमात कलाकाराला विनोदाचे स्वातंत्र्य मिळते. मी स्त्रीचे रूप धारण करून कलाकारांशी मजा-मस्ती करतो आणि प्रेक्षकही त्याकडे गमतीने पाहतात. मात्र हेच एका अभिनेत्रीने केल्यास कार्यक्रमाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाण्याची शक्यता असते, चुकीचा संदेशही यातून जाऊ शकतो, असे मत त्याने व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2020 12:05 am

Web Title: challenging to make the audience laugh every day says actor ali asghar abn 97
Next Stories
1 चकमकींमागचे चेहरे
2 मराठी चित्रपटांची कोंडी फुटेना!
3 नशेचा विळखा..
Just Now!
X