अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अगरवालच्या जीवनावर आधारित चित्रपट दिग्दर्शिका मेघना गुलजार प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अभिनेत्री दीपिका पदुकोण यामध्ये लक्ष्मीची भूमिका साकारत आहे. २ मिनिटं २० सेकंदांचा हा ट्रेलर हृदयाला स्पर्श करणारा आहे.

लक्ष्मीच्या भूमिकेसाठी दीपिकाने प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला आहे. अॅसिड हल्ल्यानंतर बदललेलं जीवन, आरोपींना शिक्षा देण्यासाठी केलेला संघर्ष आणि अॅसिड हल्ल्यानंतर पुन्हा एकदा आयुष्यात मिळालेलं प्रेम या सर्व गोष्टींची झलक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. दीपिकासोबत विक्रांत मेस्सी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

या चित्रपटाच्या  शूटिंगच्या शेवटच्या दिवशी दीपिकाने भूमिकेसाठी वापरलेले सर्व प्रोस्थेटिक्स जाळून टाकले होते. ” या भूमिकेचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला होता. याआधी मला असा अनुभव कधीच आला नव्हता. त्या भूमिकेद्वारे मी जे काही अनुभवलं त्यातून बाहेर पडण्यासाठी तो एक मार्ग होता,” असं दीपिकाने सांगितलं होतं. पुढच्या वर्षी १० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाशी दीपिकाच्या ‘छपाक’ची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.