‘डंकर्क’, ‘इंटरस्टेलर’सारखे भव्यदिव्य चित्रपट देणाऱ्या हॉलीवूड दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलान यांची भारतभेट कधी नव्हे इतकी चर्चेची ठरली. खरं म्हणजे त्यांच्या भेटीआधीच प्रसिद्ध हॉलीवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी एका मुलाखतीदरम्यान ‘नेटफ्लिक्स’सारख्या स्ट्रीमिंग अ‍ॅप्सबद्दल आपली नाराजी व्यक्त केली होती. भविष्याच्या दृष्टीने हे अ‍ॅप म्हणजे धोक्याची सूचना असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. मात्र त्यांच्याकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही पण ख्रिस्तोफर नोलान यांनी तीन दिवसांच्या भारतभेटीत जे काही सांगितले, बॉलीवूडसह दाक्षिणात्य कलाकारांचीही भेट घेऊन त्यांनी ‘फिल्म’ फ्युचरविषयी केलेली मांडणी प्रत्येकाने ऐकली. अर्थात, नोलान यांचे चाहते जगभर पसरले आहेत तसेच ते आपल्याकडेही आहेत. शाहरुख खान असो वा अमिताभ बच्चन, कमल हसन प्रत्येकाने नोलानबरोबरचा ‘फॅन’क्षण समाजमाध्यमांवरून जाहीर केला आहे. नोलानच्या या भेटीचा आढावा घेण्यामागचे कारण एकच आहे ते म्हणजे त्यांनी इथे येऊन दिलेली हाक.. सबकुछ डिजिटल असणाऱ्या आजच्या युगात हॉलीवूडच्या चित्रपटकर्मीसह अनेकांनी पुन्हा ‘फिल्म’वर फिल्म चित्रित करण्याचे आवाहन जगभर सुरू केले आहे. पुन्हा रिळांची दुनिया उलगडण्यामागचा नेमका उद्देश काय आहे?

खूप खूप वर्षांपूर्वी चित्रपट मोठमोठय़ा रिळांवर चित्रित व्हायचे, ‘रोल’ म्हटलं की कॅमेऱ्यासमोरचं दृश्य टिपून ते कॅमेऱ्यातील रोलवर प्रिंट करत राहायचा.. आणि मग चित्रपट पूर्ण झाला की रिळांचे ते डबेच्या डबे इथून तिथे नेत सगळीक डे चित्रपट दाखवले जायचे. आता ती रिळं त्या त्या डब्यांमध्येच बंदिस्त झाली. नवी कोरी रिळं आली नाहीत, तोपर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाने चित्रपट माध्यमाचाही ताबा घेतला असल्याकारणाने चित्रपटही डिजिटली चित्रित झाले, संग्रहित झाले आणि पडद्यावरही त्याच तंत्राच्या मदतीने उमटू लागले. हा सगळा खूप वर्षांपूर्वीचा काळ आहे किंवा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आपण ऐकतो आहोत, असं मानण्याचं मुळीच कारण नाही. पण फिल्म ते डिजिटल असा प्रवास कधीच झाला आहे. चित्रपटकर्मीनी, कलाकारांनी, चित्रपटगृहांनी आणि सगळ्याच तंत्रज्ञांनी ही डिजिटल व्यवस्था मान्य केली, आपलीशी केली किंबहुना ती रुळली असताना आता पुन्हा एकदा ‘फिल्म’कडे वळण्याचा आग्रह सुरू झाला आहे. फिल्मवरचं चित्रण अवघड आहे, खूप खर्चीक आहे म्हणून ते बंद झालं आणि डिजिटलची दारं उघडी झाली, अशी परिस्थिती कधीच नव्हती. त्यामुळे आता पुन्हा ‘फिल्म’कडे वळण्याचा जो विचार आहे तो समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकावून पाहायला हवं, असं ऑस्कर अकॅडमीचे सदस्य आणि ‘एसएमपीटीई’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतीय विभागाचे अध्यक्ष उज्ज्वल निरगुडकर यांनी सांगितले.  ‘२००८ च्या दरम्यान ‘कोडॅक’ कं पनीने आर्थिक कारणास्तव आपली फिल्मनिर्मिती थांबवली. फिल्म्सची निर्मिती थांबली त्यामुळे फिल्म्स प्रोसेसिंग लॅबही बंद पडल्या आणि त्या परिस्थितीत जगभरातील चित्रपटकर्मीना डिजिटलशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे डिजिटल यंत्रणा आपलीशी केली गेली. पण फिल्मवरचं चित्रीकरण आणि डिजिटलचं चित्रीकरण यांच्या गुणवत्तेत फरक आहे. आणि याच फरकामुळे फिल्मवर जो चित्रपट आपल्याला ६ ते ८ के रिझोल्युशन फॉर्मॅटमध्ये दिसायचा तो आता डिजिटल स्वरू पात हॉलीवूडमध्ये ४ के फॉर्मॅटमध्ये तर भारतात हिंदी सोडून प्रादेशिक चित्रपटांमध्ये २ के फॉर्मॅटमध्ये पाहता येतो. याचाच अर्थ त्याचा दर्जा कमी झाला. चित्रीकरणाच्या गुणवत्तेतला हा दर्जा स्पिलबर्ग, नोलान यांच्यासारख्या आधी फिल्मवरच काम केलेल्या दिग्दर्शकांना पुन्हा फिल्मकडे वळण्यास भाग पाडतो आहे,’ असे निरगुडकर यांनी सांगितले.

सध्या फिल्म रिस्टोरेशनच्या कामाने आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर वेग घेतला आहे. जुने फिल्मवर असलेले चित्रपट पुन्हा नव्या स्वरूपात फिल्मवर आणून ते जतन केले जात आहेत. नोलानने स्वतंत्रपणे जगभरात चित्रपटकर्मीनी पुन्हा फिल्मकडे वळावे यासाठी मोहीम हातात घेतली आहे. भारतात रिस्टोरेशनचे काम शिवेंद्र सिंग डुंगरपूर आणि ‘फिल्म हेरिटेज फाऊंडेशन’च्या माध्यमातून केले जात आहे. नोलानची भेट ही फिल्म हेरिटेज फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केली गेली होती.

चित्रपट पुन्हा फिल्मवर चित्रित करण्यामागे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे त्याच्या चित्रीकरणाची गुणवत्ता आणि फिल्मचं आयुष्य. फिल्मवर चित्रीकरण करत असताना ‘शॅडो एक्स्पोजर’ आणि ‘ओव्हर एक्स्पोजर’मधील सगळे तपशील नीट टिपले जातात. फिल्मचं तंत्रज्ञान हे शंभर वर्षांपेक्षा जुनं आहे. त्यामानाने डिजिटल तंत्रज्ञान आठ-दहा वर्षांपूर्वीच आलेलं असल्याने ते अजूनही बाल्यावस्थेत आहे. डिजिटली शूट करत असताना तांत्रिक मर्यादा आहेत. त्यामुळे सर्जनशील चित्रपटकर्मीना किंवा युद्धपट, चरित्रपटांसारखे भव्य विषय मांडणाऱ्या चित्रपटकर्मीना फिल्मवरचं चित्रीकरण जास्त प्रभावी वाटतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे फिल्मवर चित्रित झालेल्या चित्रपटाचं आयुष्य हे डिजिटल प्रिंटपेक्षा जास्त आहे. या फिल्म शंभर वर्षे टिकू शकतात. शिवाय, त्या स्कॅन करून डिजिटल फॉर्मेटमध्ये आणणंही शक्य होतं, त्यांची गुणवत्ता वाढवणंही शक्य होतं. मात्र डिजिटल प्रिंटचं आयुष्य हे ३० वर्षे आहे. शिवाय, या प्रिंट टिकवण्यासाठी पुन्हा त्या डिजिटल फॉर्मेटमध्ये प्रिंट कराव्याच लागतात. तो खर्च अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या दोन्ही कसोटय़ांवर फिल्मचं पारडं हे डिजिटलपेक्षा जड आहे, अशी माहिती निरगुडकर यांनी दिली.

डिजिटल ते फिल्म असा आत्ताच्या काळाप्रमाणे उलटा प्रवास हा सहजसोपा आहे. त्यामागे नुकसान कमी आणि फायदे जास्त आहेत. चित्रीकरणापुरतीच फिल्मचा विषय आहे आणि सगळ्यात जास्त खर्च वितरणामध्ये येतो. वितरण डिजिटल फॉर्मेटमध्येच करावं लागणार, कारण जगभरातील चित्रपटगृहांमध्ये डिजिटल प्रोजेक्टर व्यवस्थाच बसवलेली असल्याने अंशत: डिजिटल व्यवस्था कायम राहणार आहे.

शिवाय, ‘कोडॅक’ कंपनीने पुन्हा एकदा फिल्मची निर्मिती सुरू केली असल्याने ‘कोडॅक’, ‘आयमॅक्स’ यांच्या पाठिंब्याने नोलान आणि अन्य हॉलीवूड चित्रपटकर्मीनी पुन्हा फिल्म चित्रीकरणाकडे आपला मोहरा वळवला आहे. कोडॅकने नुकत्याच फिल्मवर चित्रित झालेल्या चित्रपटांची यादीही जाहीर केली आहे. ज्यात नोलानचा ‘डंकर्क’, स्पिलबर्गचा ‘द पोस्ट’, यावर्षी ऑस्कर स्पर्धेत असलेले ‘आय, टोन्या’, ‘कॉल मी बाय युवर नेम’, ‘फँ टम थ्रेड’, ‘बेबी ड्रायव्हर’ अशा मोठमोठय़ा चित्रपटांचा समावेश आहे. ख्रिस्तोफर नोलानची भेट ही एक सुरुवात आहे, येत्या काळात पुन्हा एकदा चित्रपटांच्या रिळांची ही हरवलेली दुनिया जिवंत होईल यात शंका उरलेली नाही. त्या दिशेने वाटचाल कधीच सुरू झाली आहे..