05 August 2020

News Flash

चित्र रंजन : वास्तवाची ‘कॉपी’

गावखेडय़ातील असे अनेक विषय आहेत, समस्या आहेत. ज्या खरे म्हणजे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांसमोर यायला हव्यात.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

कॉपी

गावखेडय़ातील असे अनेक विषय आहेत, समस्या आहेत. ज्या खरे म्हणजे चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांसमोर यायला हव्यात. सर्वदूर पोहोचायला हव्यात. अनेकदा असे विषय हे अनुभवातूनच रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचलेले असतात. त्यातही नवोदित दिग्दर्शक-लेखक यांच्याकडून हे विषय रुपेरी पडद्यावर जिवंत होतात. त्यामुळे या चित्रपटांच्या मांडणीत सफाई नसते. अनेकदा हे विषय सततच्या चर्चेतून लोकांच्या कानावर पडलेले असतात, मात्र त्याचे गांभीर्य त्याच पद्धतीने पोहोचते असे नाही. मात्र सफाईदार नसले तरी असे विषय चित्रपट माध्यमातून यायला हवेत, हेही तितकेच खरे आहे. नुकताच प्रदर्शित झालेला दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी दिग्दर्शित केलेला ‘कॉपी’ हा चित्रपट याच प्रकारात मोडतो.

गावागावातून शिक्षणाची असलेली अवस्था, शैक्षणिक संस्था उभारायच्या, तिथे पैसे भरून शिक्षकांना नोकरी द्यायची आणि सरकारकडून शाळेसाठीचे अनुदान घेऊन ते लाटायचे. वर्षांनुवर्ष कुठल्याही सोयीसुविधेअभावी शाळा चालवायच्या आणि विनापगार शिक्षकांकडून काम करून घ्यायचे, हे वास्तव लोकांना माहितीच नाही असे म्हणणे धाष्टर्य़ाचे ठरेल. मात्र याबाबतीत कितीही गोष्टी बातम्यांच्या स्वरूपात कानावर पडल्या किंवा वृत्तवाहिन्यांवर पाहिल्या तरी एका मर्यादेपलीकडे त्याचे गांभीर्य आपल्याला सहजी लक्षात येत नाही. शिक्षणसम्राट आणि त्यांचे गैरधंदे ही याची काळी बाजू आपल्याला माहिती असते. मात्र याच शाळांमधून कधी तरी पगार मिळेल, आपण मुलांना शिकवत राहिले पाहिजे, या प्रामाणिक विचारांनी, निष्ठेने काम करणाऱ्या शिक्षकांचे, त्यांच्या कुटुंबीयांचे भरडणे आपल्याला सहज जाणवत नाही. हीच अनास्था, उदासीनता त्यांच्यातील कित्येक शिक्षकांना अन्य मार्गाने पैसे मिळवण्यासाठी भाग पाडते. कशीही असली तरी ही गावखेडय़ातील एकुलती एक शाळा ही दूर डोंगरावरच्या वाडय़ा-वस्त्यांमधील मुलांसाठी कधी तरी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठीचा आशेचा किरण असते. पण पैसे मिळवण्याच्या भ्रष्ट कल्पनांमध्ये रमलेल्या डोक्यात हा आशा-निराशेचा विचार रुजतच नाही. शिक्षणव्यवस्था, ती चालवणारे अधिकारी, संस्थाचालक या सगळ्या मोठय़ा व्यवस्थेत चांगल्या-वाईट पद्धतीने व्यवहार घडत राहतात. यात कोणी शिक्षक गरिबीने मरतो, कोणी त्यातही तरून जातो. मात्र उद्याचे भविष्य असलेली अनेक मुले इच्छा आणि जिद्द असूनही परिस्थितीपायी त्याच वाडय़ावस्त्यांवर मजुरी करत आयुष्य कंठतात. त्यांची स्वप्ने कधीच वास्तवात येत नाहीत. एकात एक गुंतलेले हे वास्तव ‘कॉपी’ चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक द्वयीने केला आहे.

रूढार्थाने, हा एक सरळसाधा चित्रपट आहे. त्यात उत्तम दिग्दर्शकीय कौशल्य वगैरे नाही. तांत्रिकदृष्टय़ा चित्रपट कुठेही कमी पडलेला नाही. वास्तव शैलीतील मांडणीही थोडीशी सरधोपट पद्धतीची आहे. आणि त्यातले संवादही फारच पुस्तकी वाटतील असे आहेत.

अभिनेता मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे यांच्यासारखा एखाददुसरा नावाजलेला कलाकार वगळता बाकी नवीनच चेहरे आहेत. मात्र या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका चोखपणे निभावण्याचा प्रयत्न केला आहे. शिवा, प्रिया आणि प्रकाश या तीन मुलांच्या भोवतीने कथा फिरते. प्रतीक लाड, अदनेश मदुशिंगरकर आणि श्रद्धा सावंत या तीन बालकलाकारांनी या भूमिका खूप चांगल्या पद्धतीने केल्या आहेत. याशिवाय, अभिनेता अंशुमन विचारेला खूप काळाने गंभीर भूमिकेत पाहण्याची संधी हा चित्रपट देतो. जगन्नाथ निवांगुणे, मिलिंद शिंदे यांनीही आपल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका सहजपणे साकारल्या आहेत. परीक्षेत केली जाणारी कॉपी आणि त्याआधारे पास होणारी मुलं भविष्यात खरोखरच काय चित्र निर्माण करणार आहेत?, हा खरा प्रश्न आहे. मात्र त्याकडे कानाडोळा करत शिक्षणनामक व्यवस्था सगळीकडे डौलात उभी आहे, याकडे लक्ष वेधणारा हा चित्रपट कथा-पटकथा आणि मांडणीत अधिक धारदार झाला असता तर हा विषय प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचला असता. पण तरीही विषय म्हणून या चित्रपटाचे महत्त्व कमी होत नाही हेही तितकेच खरे..

* दिग्दर्शक – दयासागर वानखेडे, हेमंत धबडे.

* कलाकार – प्रतीक लाड, श्रद्धा सावंत, अदनेस मदुशिंगरकर, मिलिंद शिंदे, जगन्नाथ निवांगुणे, अंशुमन विचारे, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 12:15 am

Web Title: copy marathi movie review abn 97 2
Next Stories
1 रंगतदार ‘बाला’ख्यान
2 शिवरायांचा इतिहास, गडकिल्ले व मराठी भाषेसंदर्भात ‘फत्तेशिकस्त’च्या टीमशी गप्पा
3 पहिल्या पत्नीबाबत सैफने केला मोठा खुलासा
Just Now!
X