क्रिकेटच्या मैदानात उत्तुंग षटकाराने आनंद देणाऱ्या षटकाराच्या बादशहाच्या लग्नासाठी चंदीगढ सज्ज झाले आहे. युवी बुधवारी मॉडेलच्या दुनियेतून कलाकार झालेल्या हेजलसोबत विवाहबद्ध होतोय. युवीने आपल्या लग्नासाठी मित्रमंडळींना निमंत्रण देण्यासाठी छापलेल्या प्रीमियर लग्नपत्रिकांची यापूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती. लग्नासाठी छापलेल्या या प्रिमीयर लग्नपत्रिका तब्बल ३०० लोकप्रिय व्यक्तींना पाठविण्यात आल्या आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांचा यामध्ये समावेश आहे. युवराजच्या लग्नासाठी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील ३०० लोकप्रिय चेहरे युवीच्या लग्नाला उपस्थितीत राहणार हे जवळ जवळ निश्चित मानले जात आहे. यात अनुष्का शर्मा, गीता बसरा, फराह खान, नेहा धुपिया आणि बी टाउनमधील युवी आणि हेजलचे जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आपल्या लग्नसमारंभात सामिल होणाऱ्या मोजक्या पाहुण्यांसाठी युवीने खास तयारी केली आहे. खाद्याच्या मेनूमध्ये चायनिज. कॉन्टिनेटल, इटालियन आणि थाई खाण्याची मेजवानी असेल. चंदिगड पासून ५० कि.मी अंतरावर असणाऱ्या फत्तेगड साहिबमध्ये युवी-हेजल यांचा लग्न सोहळा संपन्न होणार आहे. युवी-हेजलच्या स्वागतासाठी त्याची आई शबनम या नव्या घराच्या सजावट करण्यामध्ये दंग झाल्या आहेत. सध्या युवराजची आई पंचकुलामधील मनसा देवी कॉम्पलेक्सच्या नव्या घराला सजावट करुन घेण्याची जोरदार तयारी करत आहेत. त्यामुळे ३० नोव्हेंबरला लग्नसमारंभ पार पडल्यानंतर युवी-हेजल आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात या नव्या घरातून करतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

युवी-हेजल दोघेही आपल्या जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह बंधनात अडकणार आहेत. सिंग परिवाराची या लग्न समारंभासाठी जोरदार तयारी सुरु आहे. युवीच्या लग्नात सहभागी होणाऱ्या खास पाहुण्याच्या स्वागतामध्ये युवी परिवार प्रयत्नशील दिसतोय. चंदीगड पासून ५० किमी असणाऱ्या गुरुद्वारामध्ये भव्य लग्नसमारंभ पार पडल्यानंतर युवराज-हेजल गृहनगर आणि दिल्लीमध्ये रिसेप्शन पार्टी देणार आहे. भारतीय संघ सध्या इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेत व्यस्त आहे. भारतीय संघातील खेळाडू ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. त्या हॉटेलजवळच युवराजने रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. आपल्या सहकारी खेळाडूंना रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी सुलभ व्हावे म्हणून युवीने खास लक्ष दिल्याचे दिसते.

भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू युवीच्या रिसेप्शनला हजेरी लावणार हे निश्चित असले तरी, पाहुण्या इंग्लड संघाच्या एकही खेळाडू या या कार्यक्रमात दिसणार नसल्याचे समजते. इंग्लडचा संघ सध्या भारतीय दौऱ्यावर आहे. मात्र युवराजने इंग्लंडच्या कोणत्याही खेळाडूला निमंत्रण दिलेले नाही. युवराजच्या निमंत्रणानंतर भारतीय संघाने पाच दिवसांचा कसोटी सामना चौथ्या दिवशीच जिंकला असून युवीच्या पार्टीसाठी पूर्णवेळ देण्यासाठी भारतीय संघ सुद्धा सज्ज झाला आहे.