भारताच्या इतिहासामध्ये २५ जून १९८३ ही तारीख सुवर्ण अक्षरामध्ये कोरली गेली आहे. लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित ‘८३’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह हा तत्कालीन कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे रणवीर सिंहला उत्तमरित्या अभिनय करता यावा यासाठी कपिल देव स्वत: त्याला क्रिकेटचे धडे देणार आहेत.

‘८३’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता जरी शिगेला पोहोचली असली तरी तो १० एप्रिल २०२० रोजी भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. १९८३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यात आला होता. या सामन्यामध्ये भारतीय संघाने रोमहर्षक विजय मिळविला होता. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये काम करणं हे एखाद्या स्वप्नपूर्तीसारखं असल्याचं काही दिवसापूर्वी रणवीर सिंहने म्हटलं होतं.

दरम्यान, या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं असून ‘चक दे इंडिया’चे दिग्दर्शक कबीर खान यांनीच ‘८३’च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उतरावा यासाठी ते कसोशीने प्रयत्न करत आहेत. यातच रणवीर क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका वठवत असल्यामुळे या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्यासाठी तो कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवत आहे. यासाठी कपिल देवही त्याला क्रिकेटमधील बारकावे शिकवत असून कोणत्या परिस्थितीमध्ये कसं सामोरं जावं याचं मार्गदर्शनही करत आहे.