काही वर्षांपूर्वी ‘ना ना ना नारे’ म्हणत पंजाबीतून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या दलेर मेहेंदीने हिंदीत बस्तान बसवले त्याला आता दशकाहून अधिक काळ लोटला. विविध हिंदी चित्रपटांबरोबरच ‘बोले ता रा रा’ आणि अन्य हिंदी व पंजाबी गाण्यांच्या आल्बममुळे त्याने हिंदीत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. आता बऱ्याच वर्षांनंतर दलेर मेहेंदीला आपण मराठीत गायलो नाही, याची जाणीव झाली असून आगामी ‘जाणीव’ या मराठी चित्रपटासाठी त्याने एक गाणे गायले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे.
हिंदूी गायकांनी मराठी चित्रपटासाठी पाश्र्वगायन करण्याची परंपरा जुनीच आहे. अगदी मन्ना डे, हेमंत कुमार, मोहंमद रफी, किशोरकुमार या दिग्गजांपासून अलिकडच्या काळात शंकर महादेवन, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, सुखविंदर सिंग, सोनू निगम आणि अन्य अमराठी मंडळींनी मराठी गाणी गायली आहेत. त्यात आता दलेर मेहेंदीची भर पडणार आहे. आगामी ‘जाणीव’ या मराठी चित्रपटासाठी दलेरने पहिल्यांदा मराठीत पाश्र्वगायन केले असून चित्रपटातील ‘मोरया’हे गाणे गणपतीवरील आहे.
या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. महेश मांजरेकर यांनी मुहूर्ताची क्लॅप दिली. ‘ब्ल्यू आय प्रॉडक्शन’ आणि अर्णव प्रॉडक्शन यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात किरण करमरकर, अतुल परचुरे, जयवंत वाडकर, किशोर कदम, रेणुका शहाणे, उषा नाडकर्णी, सलिल अंकोला आदी कलाकार आहेत. पाच तरुणांची कथा आणि त्यांचे भावविश्व याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.