रात्री उशिरापर्यंत रंगणाऱ्या पाटर्य़ा, दारू, अमली पदार्थाचे सेवन यांसारखी व्यसने चंदेरी दुनियेत वावरणाऱ्या कलाकारांना असणे ही आज सामान्य गोष्ट आहे. आजवर अनेक मोठमोठय़ा कलाकारांनी व्यसनाधीन होऊन आपल्या कारकिर्दीचे तीनतेरा वाजवले आहेत. अभिनेत्री डेविना मॅक्कॉलही अशाच कलाकारांपैंकी एक आहे. ती दारू आणि अमली पदार्थाच्या इतकी आहारी गेली की यातून बाहेर येण्याचा आत्मविश्वासच ती हरवून बसली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून व्यसनमुक्ती केंद्रात वैद्यकीय उपचार घेऊनही तिच्यात फारसा फरक पडलेला नाही. याचे कारण आई-वडिलांनी दिलेले सल्ले तिने कधीच ऐकले नाहीत आणि याचे परिणाम ती भोगते आहे, असे ती मानते. १९९१ साली वर्ड इज आउट या मालिकेतून डेविना मॅक्कॉलने कारकिर्दीची सुरुवात केली. तीसपेक्षा जास्त चित्रपटांत काम करणाऱ्या या अभिनेत्रीने दिग्दर्शन क्षेत्रातही उत्तम यश मिळवले. डेड सेट, बीग ब्रदर, लॉंग लॉस्ट फॅमेलीया मालिकांनी तिला विषेश लोकप्रियता मिळवून दिली. पुढे सातत्याने मिळणाऱ्या यशाची धुंदी वाढली आणि हळूहळू ती व्यसनांच्या आहारी जाऊ लागली. याचा थेट परिणाम तिच्या स्वभावावर झाला असून परिणामी तिचे नातेवाईक मित्रमंडळीही तिच्यापासून दुरावले. पुढे व्यावसायिक यशाचा आलेख खालावला. आर्थिक रसद संपुष्टात आली. सातत्याने मिळणाऱ्या अपयशाने ती इतकी खचली आहे की आता यातून ती बाहेर पडेल असे तिलाच वाटत नाही.