कसोटी क्रिकेटला एक परंपरा असली तरी ते सध्याच्या घडीला मरणासन्न अवस्थेत असल्याचे जाणवते. याच गोष्टीचा शोध दोन क्रीडा पत्रकारांनी घेण्याचे ठरवले. याच शोधातून ‘डेथ ऑफ अ जंटलमन’ हा इंग्रजी चित्रपट साकारला असून त्यातून क्रिकेटचे वास्तव दर्शन उलगडले आहे. जॉन हॉटन आणि जेरॉड किंबर यांची ही शोधकथा पहिल्यांदाच पडद्यावर जिवंत झाली असून भारतात ती लवकरच ‘टीव्हीएफ प्ले इनबॉक्स ऑफिस’ या डिजिटल वाहिनीवर प्रदर्शित होणार आहे.
‘डेथ ऑफ अ जंटलमन’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ठरवलेले नाहीत. यात कोणी नायक किंवा नायिका नाही, कोणाला खलनायक ठरवण्याचा प्रयत्नही नाही, गाणी, संगीतही नाही, जे काही आहे ते वास्तव. कसोटी क्रिकेट संपण्याच्या मार्गावर आहे का, या गोष्टीचा शोध घेण्यासाठी हे दोन पत्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये जातात, तिथल्या सामान्य लोकांसह प्रशासकांना भेटतात. काही माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांचीही मते जाणून घेतात. चाहत्यांच्या मते कसोटी क्रिकेट कंटाळवाणे, वेळखाऊ आहे. पण तज्ज्ञांच्या मते कसोटी क्रिकेटला मुल्य, तत्वे आहेत. हे पाच दिवस क्रिकेट शिकण्यासाठी असतात, अशी कसोटी क्रिकेटची व्याख्या जाणकार करतात. पण सध्या क्रिकेट हा फक्त खेळ राहिलेला नाही आणि त्याची जाणीव या सिनेमामध्ये पदोपदी होते. या दोन पत्रकारांनाही अशी जाणीव झाली आणि चाहत्यांना नेमके काय आवडते याचा शोध त्यांनी घ्यायला सुरुवात केली.
पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर आयपीएलचा जन्म झाला. त्यानंतर चाहत्यांनी या लीगला डोक्यावर घेतले. क्रिकेट आणि बॉलीवूड या दोन गोष्टींचा मिलाप झाल्यामुळे आयपीएलला अमाप लोकप्रियता मिळाली. क्रिकेटमध्ये खेळ उरला नसून राजकारणाचा खेळ कसा सुरु झाला, याचे उत्तम दर्शन या चित्रपटामध्ये होते.
‘आयसीसी’मध्ये भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या फक्त तीन राष्ट्रांकडे आलेल्या सूत्रांमुळे खेळाच्या प्रशासनात झालेला बदल. त्याला हारून लॉरगेट यांनी केलेला विरोध आणि त्यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा रद्द केलेला दौरा, एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन सट्टेबाजीमध्ये सापडल्यानंतरही त्यांनी ‘बीसीसीआय’चे अध्यक्षपद न सोडण्याचा केलेला अट्टाहास. ‘आयसीसी’ची कमान सांभाळल्यावर हितसंबंध जपताना टीम मे यांची काढलेली विकेट आणि आपल्या ‘इंडिया सिमेंट कंपनी’चे पगारी नोकर असलेले माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा ‘आयसीसी’मध्ये झालेला प्रवेश. ललित मोदी आयपीएलपेक्षा मोठे होताना त्यांचा काढलेला काटा, या साऱ्या गोष्टींची उत्तम मांडणी या चित्रपटामध्ये आहे.
क्रिकेट हा खेळ राहिलेला नाही. तो खेळ म्हणून खेळवला जात नाही तर प्रायोजक, उद्योगपती यांच्या फायद्यासाठी कसा खेळला जातो आणि चाहत्यांचा त्यासाठी कसा वापर केला जातो, हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. श्रीनिवासन, ललित मोदी, लॉरगेट यांच्यासह माजी क्रिकेटपटू आणि समालोचकांचे या सिनेमातील भाष्य क्रिकेटची सध्याची परिस्थिती दाखवून देते. सध्याच्या घडीला क्रिकेट या खेळाचा आत्मा हरवलेला आहे, हे कटू सत्य या चित्रपटाचा गाभा आहे आणि ते दाखवताना सॅम कॉलिन्स आणि जारोड टिंबर यांनी सत्याची कास सोडलेली नाही. हा सिनेमा चाहत्यांसाठी आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. आपण क्रिकेटच्या नावाखाली नेमके काय पाहतो, याचा आत्मशोध घेणारा आहे. त्यामुळे क्रिकेटवर अपाम प्रेम करणाऱ्या आणि सत्य स्वीकारण्यासाठी तयारी असलेल्या चाहत्यांनी हा सिनेमा नक्की पाहण्यासारखा आहे. हा सिनेमा पाहिल्यावर क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टीमध्ये नक्कीच बदल घडू शकतो.