चौकटीबाहेरचे विषय निवडत विभिन्न भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ड्रीम गर्ल’ या आगामी चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. आयुषमानच्या या चित्रपटात मराठीमधील दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर दादा कोंडके यांचे लोकप्रिय गाणे ‘ढगाला लागली कळ, पानी थेंब थेंब गळ’ याचा रिमेक करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे गाणे दादा कोंडके यांच्या ‘बोट लावीन तिथे गुदगुल्या’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात दादा कोंडकें यांच्यासोबत अभिनेत्री उशा चव्हाण मुख्य भूमिकेत होत्या. ‘ढगाला लागली कळ हे अतिशय लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे ऐकताच सर्वजण नाचू लागतात. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर या गाण्याचा रिमेक करावा ही कल्पना एकता कपूरची होती. आम्हा सर्वांना ती कल्पना आवडली आणि ड्रीम गर्ल चित्रपटाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे गाणे मदत करेल असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही हे गाणे गणेशोत्सवादरम्यान प्रदर्शित करणार आहोत’ असे चित्रपटाचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी म्हटले आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहता आयुषमान चित्रपटात (लोकेश बिष्ट) एक अशा मुलाची भूमिका साकारणार आहे जो नाटकांमध्ये महिलांच्या भूमिका साकारत असतो. लोकेश मुलींच्या गोड आणि सुमधूर आवाजात देखील बोलताना दिसतो. आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. या चित्रपटानंतर आयुषमान ‘बाला’, ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhagala lagali kal famous marathi song remake is playing in ayushman khurana dream girl avb
First published on: 21-08-2019 at 11:00 IST