‘रेडू’ या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षक-समीक्षकांचं लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक सागर वंजारीनं नववर्षाच्या मुहूर्तावर नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘रापण’ असं या चित्रपटाचं नाव असून सोशल मीडियावर त्याचा मोशन पोस्टर प्रदर्शित झाला आहे.

‘रापण’ या फेसबुक पेजवरून लाँच करण्यात आलेल्या या पोस्टरमधून समुद्राच जाळं असलेली एक होडी दिसते आणि रापण हे नाव येतं. अत्यंत नयनरम्य आणि विहंगम असं हे मोशन पोस्टर आहे. या मोशन पोस्टरमुळे आता या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं लेखन केल्याचं पोस्टरवर नमूद करण्यात आलं आहे.

वाचा : ..म्हणून रिंकूच्या ‘कागर’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले

‘रेडू’ या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळाले. सागरला प्रतिष्ठेच्या अरविंदन पुरस्काराने गौरवण्यात आले होते. स्वाभाविकच सागरच्या नव्या चित्रपटाकडे प्रेक्षक आणि समीक्षक या दोघांचेही लक्ष आहे. या चित्रपटाची कथा, कलाकार हे सर्व तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहेत. ‘रापण’च्या माध्यमातून महत्त्वाचा विषय मांडला जाणार आहे,’ असं सागरनं सांगितलं आहे.